तरुण भारत

खासगीकरणासाठी ४ बँकांची निवड

सरकारी सूत्रांची माहिती, लवकरच घोषणा होणे शक्य

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

केंद्र सरकारने खासगीकरणावर भर दिला असून चार बँकांची यासाठी निवड केलेली आहे, अशी सूत्रांनी महिती दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशी त्यांची नावे असल्याचे समजते. यासंबंधी अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र ती लवकरच होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. मात्र या वृत्तावर केंद्र सरकारच्या अर्थ विभागाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

यापैकी 2 बँकांचे 2021-2022 या आर्थिक वर्षात खासगीकरण केले जाईल.  काही दिवसांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पातही याचे सुतोवाच करण्यात आले होते. मात्र बँकांची नावे घोषित करण्यात आली नव्हती. आता कोणत्या बँकांचे खासगीकरण करायचे हे निश्चित करण्यात आले असून खासगीकरणाचा कार्यक्रमही ठरविण्यात आला आहे. खासगीकरण याचा अर्थ सरकार या बँकांमधील आपली गुंतवणूक निम्म्यापेक्षा अधिक प्रमाणात कमी करणार आहे.

खासगीकरणासाठी पहिल्या टप्प्यात छोटय़ा आणि मध्यम आकाराच्या बँकांची निवड करण्यात आली आहे. खासगीकरणाचा परिणाम पाहण्यासाठी अशा बँका निवडण्यात येत आहेत. तथापि, स्टेट बँका ऑफ इंडिया या सर्वात मोठय़ा सार्वजनिक बँकेचे खासगीकरण करण्यात येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले. ही धोरणात्मक बँक असल्याने ती सरकार आपल्याच हाती ठेवणार आहे.

अमूलाग्र परिवर्तन करणार

सध्या बँक क्षेत्राला थकित कर्जांच्या समस्येने विळखा घातलेला आहे. अनुत्पादक मालमत्तेचे संकटही आहे. कोरोना काळात थकबाकीची समस्या अधिकच वाढल्याचे दिसून आले आहे. या बँकांचे याच आर्थिक वर्षात खासगीकरण करण्याची तयारी करण्यात आलेली होती. तथापि कर्मचारी संघटनांचा विरोध होण्याची शक्यता अर्थ विभागाच्या काही अधिकाऱयांनी व्यक्त केल्याने सावधपणाने पावले उचलण्यात येत आहेत. संघटनांच्या म्हणण्यानुसार बँक ऑफ इंडियात 50 हजारांच्या वर कर्मचारी आहेत. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियात 33 हजार, इंडियन ओव्हरसीज बँकेत 26 हजार आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 13 हजार कर्मचारी आहेत.

महाराष्ट्र बँकेचे प्रथम खासगीकरण

बँक ऑफ महाराष्ट्र ही 13 हजार कर्मचारी असणारी लहान बँक आहे. मोठय़ा बँकांपेक्षा छोटय़ा बँकांचे खासगीकरण करणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे कदाचित बँक ऑफ महाराष्ट्रचा खासगीकरणात प्रथम क्रमांक लावण्यात येईल, अशी शक्यता आहे. मात्र यावरही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सोमवारपासून या बँकेच्या कर्मचाऱयांनी दोन दिवसांचा संप सुरू केला आहे.

कर्मचाऱयांना विश्वासात घेणार

बँक खासगीकरणाला कर्मचारी संघटना कसा प्रतिसाद देतात यावर खासगीकरणाचा वेग अवलंबून राहील अशीही माहिती सूत्रांनी दिली. विशेषतः या अभियानाचे राजकीय परिणाम कसे होतील, याकडे सरकारचे बारकाईने लक्ष आहे. बँकेच्या कर्मचाऱयांची संख्या आणि संघटनांचे प्राबल्य या बाबीही महत्वाच्या मानल्या जातील. कर्मचारी व त्यांच्या संघटनांना विश्वासात घेऊनच पुढची पावले उचलण्यात येतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Related Stories

केदारनाथ धामची कवाडं उघडली

datta jadhav

देशात मागील 6 महिन्यातील निच्चांकी रुग्णवाढ

datta jadhav

पेगॅसस प्रकरणी आज आदेश देणार

Patil_p

केरळातील बळींचा आकडा 31 वर

Patil_p

दिल्ली : उद्योग विहारमधील चप्पल फॅक्टरीला लागली आग

Rohan_P

लॉक डाऊन 2 : गृहमंत्रालयाकडून गाईडलाईन जारी

prashant_c
error: Content is protected !!