तरुण भारत

छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय रत्नागिरीत

मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती, दीड-दोन वर्षात केंद्र पूर्णत्वाला जाणार, संशोधन अभ्यासही करता येणार
अन्य तीन शैक्षणिक निर्णयांची  घोषणा, रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक हब म्हणून विकसित होणार

प्रतिनिधी / रत्नागिरी

Advertisements

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत कोणतेही पुस्तक एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, तसेच त्यावर संशोधनात्मक अभ्यास करता यावा या हेतूने जगातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र रत्नागिरी येथे सुरु होणार आहे. दीड वर्षात हे केंद्र पूर्णत्वाला जाणार आहे. याशिवाय संस्कृत विश्वविद्यालय उपकेंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ उपकेंद्र आणि स्पर्धा परीक्षा केंद्र रत्नागिरीत सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक निर्णयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे कोकण शैक्षणिक हब व्हावे यासाठी धोरणात्मक निर्णय सामंत यांनी घेतले आहेत. येत्या दीड वर्षात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र रत्नागिरी शहरात होणार आहे. याच ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्रही सुरू करण्यात येणार आहे यासाठी आयटीआय परिसरातील २ एकर जागा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी शैक्षणिक क्षेत्रातील चार महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणाही केली.

तत्पूर्वी याठिकाणी विविध शैक्षणिक विद्यापीठ प्रमुखांबरोबर बैठकही झाली. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची ४ उपकेंद्रे सुरू करण्याचाही निर्णय झाला आहे. येत्या जूनमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे. रत्नागिरी, पुणे, औरंगाबाद आणि नांदेड या ४ ठिकाणी ही उपकेंद्रे होणार आहेत. देशातील प्राचीन भाषांचा अभ्यास व संशोधन व्हावे या हेतूने ही चार उपकेंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्कृत उपकेंदाच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. शहरातील जुन्या बीएड कॉलेजच्या जागेवर उभ्या असलेल्या इमारतीत २० हजार स्वेअरफूट जागा यासाठी देण्यात येणार आहे. या उपकेंद्राला भारतरत्न पी. व्ही. काणे यांचे नाव देण्यात येणार आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला. रत्नागिरीत मुंबई विद्यापीठ उपकेंद्रातच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच लोकमान्य टिळकांचे अभ्यासक्रम केंद्रही मुंबई विद्यापीठातच सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय रत्नागिरीतील पॉलिटेक्नीक कॉलेजचा पूर्णपणे चेहरामोहरा बदलण्यात येणार असून ही इमारत विकसित केली जाईल. याचठिकाणी इंजिनियरींग कॉलेज सेंटरही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सागरी विद्यापीठासाठी 2 सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. सारंग कुलकर्णी या समितीचे अध्यक्ष आहेत. सिंधुदुर्ग अडाळी येथेच आयुर्वेदिक संशोधन केंद्र सुरू होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

प्रमुख घोषणा !

रत्नागिरीत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र

रत्नागिरी, पुणे, औरंगाबाद व नांदेड येथे संस्कृत विश्वविद्यालय उपकेंद्रे

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्रे

रत्नागिरी पॉलिटेक्नीकचे नूतनीकरण व इंजिनियरींग कॉलेज सेंटरचा प्रारंभ

आयुर्वेदिक संशोधन केंद्र सिंधुदुर्ग अडाळी येथेच होणार

Related Stories

आता पश्चिम किनारपट्टीही वादळग्रस्त

NIKHIL_N

सुरूवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू: आशिष शेलार

Abhijeet Shinde

रत्नागिरी : स्वॅब तपासणीकरिता दिलेले एच एनर्जीचे अधिकारी कामावर

Abhijeet Shinde

जयगड बंदरातील बोटींवरील सामान शिरगांव हद्दीत टाकण्याचा प्रयत्न

Patil_p

अंगणवाडी पोषण आहार ठेकेदारावर कारवाई करा!

NIKHIL_N

सरपंचपद आरक्षण सोडत रद्द

NIKHIL_N
error: Content is protected !!