तरुण भारत

सहावी-आठवीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून पूर्णवेळ

प्राथमिक-माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांची माहिती

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमित सुरू असून पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सोमवार दि. 22 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू केले जाणार आहे. बेंगळूर शहर-जिल्हा आणि कर्नाटक-केरळ सीमेवरील शाळा वगळता उर्वरित सर्व भागातील सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा दररोज पूर्णवेळ भरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांसाठी विद्यागम पद्धतीने शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसौध येथे मंगळवारी पार पडलेल्या कोविड सल्लागार समिती, शिक्षण खाते आणि आरोग्य खात्यातील अधिकाऱयांच्या बैठकीनंतर प्राथमिक-माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्यामुळे बेंगळूर शहर जिल्हा आणि केरळ सीमेवरील राज्यातील शाळा 22 तारखेपासून सुरू केल्या जाणार नाहीत. आरोग्य खात्यातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांसाठी सोमवार दि. 22 फेब्रुवारीपासूनच विद्यागम सुरू होणार आहे. विद्यागमला मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन पूर्ण प्रमाणात शाळा भरविण्याचा निर्णय आगामी दिवसात घेण्यात येईल. सध्या हे वर्ग शाळेमध्ये सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही. 22 पासून सुरू होणाऱया सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाईनवर देखील अभ्यास सुरू ठेवता येणार आहे. शाळेत हजर होणाऱया विद्यार्थ्यांना पालकांचे संमती पत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही सुरेशकुमार यांनी सांगितले.

बेंगळूर शहर आणि केरळ सीमाभागातील केवळ आठवी इयत्तेचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. केरळमधून येणारे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना कोविड चाचणी सक्तीची आहे. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तरच त्यांना परवानगी देण्यात येईल. नववी ते बारावी बरोबरच आता सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होत असल्याने मागासवर्ग आणि समाजकल्याण खात्यातील विद्यार्थी वसति गृहे पुन्हा सुरू होणार आहेत. त्यासाठी तयारी करण्याची सूचना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अनुकूलतेसाठी अधिक बसेस सोडण्याची विनंतीही परिवहन खात्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात कोविड तांत्रिक सल्लागार समितीची आतापर्यंत पाचवेळा बैठक झाली आहे. नोव्हेंबरमध्ये बैठकीवेळी डिसेंबरमध्ये हिवाळा असल्याने परवानगी मिळाली. जानेवारीमध्ये दहावी आणि बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले. त्यानंतर नववी आणि अकरावीचे वर्गही पूर्ण प्रमाणात सुरू करण्यात आले. या वर्गांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सहावी, सातवी आणि आठवीचे वर्ग विद्यागम अंतर्गत दिवसाआड वर्ग सुरू झाले. दरम्यान राज्यभरात पालकांकडून उर्वरित वर्गही सुरू करण्याची मागणी झाली. याची दखल घेत सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग पूर्णवेळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

15 जुलैपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार

कोरोना परिस्थितीमुळे 2020-21 हे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले आहे. परिणामी दहावी-बारावीच्या परीक्षाही लांबणीवर पडल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाचा विचार करून 15 जुलैपासून 2021-22 हे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.

Related Stories

दहावी परीक्षेचे वेळापत्रक 2 दिवसात जाहीर करणार

Amit Kulkarni

देवेगौडा दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

कोविड पॉझिटिव्ह नर्सिंग विद्यार्थ्यांची संख्या वाढली

Abhijeet Shinde

कर्नाटक : शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग

Abhijeet Shinde

कर्नाटक टीईटी निकाल २०२१ जाहीर

Abhijeet Shinde

धर्मांतर विरोधी कायदा ख्रिश्चनांना लक्ष्य करण्यासाठी नाही : मुख्यमंत्री बोम्माई

Sumit Tambekar
error: Content is protected !!