तरुण भारत

चेन्नईचा हिशेब चेन्नईतच चुकता!

दुसऱया कसोटीत भारताचा 317 धावांनी धमाकेदार विजय

@ चेन्नई / वृत्तसंस्था

Advertisements

अक्षर पटेल (5-60) व रविचंद्रन अश्विन (3-53) या फिरकीपटूंनी गोंधळलेल्या इंग्लिश फलंदाजीला मोठे खिंडार पाडल्यानंतर यजमान भारतीय क्रिकेट संघाने येथील दुसऱया कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाचा 317 धावांनी एकतर्फी फडशा पाडला आणि 4 सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली. विजयासाठी 482 धावांचे कठीण आव्हान असताना इंग्लंडचा डाव सर्वबाद 164 धावांमध्येच गुंडाळला गेला. अष्टपैलू योगदान देणाऱया रविचंद्रन अश्विनला सामनावीर पुरस्काराने गौरवले गेले.

या धमाकेदार विजयामुळे भारतीय संघ विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱया स्थानी झेपावला असून यामुळे संघाने अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्याच्या आशाअपेक्षा आणखी पल्लवित झाल्या आहेत. कर्णधार कोहलीचा हा मायदेशातील 21 वा विजय असून धोनीच्या या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. जूनमध्ये खेळवल्या जाणाऱया विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी भारताला इंग्लंडविरुद्ध आणखी किमान एक सामना जिंकावा लागेल व एक सामना बरोबरीत राखला तरी चालू शकेल.

‘त्या’ टीकेचीही ऐशीतैशी

चेन्नईत या लढतीसाठी फिरकीला पोषक खेळपट्टीवर विशेषतः इंग्लिश माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली होती. पण, रोहित शर्मा, रहाणे, अश्विन, विराट कोहली, रिषभ पंत व पदार्पणवीर अक्षर पटेल यांनी दमदार फलंदाजीचे धडे साकारत या सर्व टीकेचा जणू रोखठोक समाचार घेतला. अगदी पाहुण्या संघाकडून 9 व्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या मोईन अलीनेच 18 चेंडूत 43 धावांची टी-20 स्टाईलने आतषबाजी केली. यामुळे त्या टीकेची ऐशीतैशी झाली.

सध्याचा भारतीय संघ बुमराहसारख्या अव्वल गोलंदाजाला व़िश्रांती दिली असताना देखील विजय खेचून आणण्याइतका मजबूत आहे, हे या लढतीच्या निमित्ताने अधोरेखित झाले. रोहितने इथे भक्कम पायाभरणी केली आणि अश्विन-अक्षर यांनी त्यावर उत्तम कळस चढवला. एरवी यष्टीरक्षणासाठी टीकेचे मुख्य केंद्र ठरत आलेल्या रिषभ पंतने या सामन्यात मात्र विशेषतः दुसऱया डावात अतिशय अव्वल दर्जाचे यष्टीरक्षण साकारले. अश्विनच्या गोलंदाजीवर त्याने डॅन लॉरेन्सला ज्या शिताफीने यष्टीचीत केले, ते निव्वळ लक्षवेधी ठरले.

लॉरेन्स क्रीझबाहेर येत आहे, याची जाणीव होताच अश्विनने उत्तम फ्लाईटेड चेंडू टाकला आणि लॉरेन्सच्या दोन्ही पायातून चेंडू मागे येताच पंतने तो कलेक्ट करत यष्टीवर जणू झडपच घातली. जागतिक दर्जाचा इंग्लिश फलंदाज बेन स्टोक्स (51 चेंडूत 8 धावा) येथे कोणताही चमत्कार करु शकला नाही. अक्षर व अश्विन यांच्या काटेकोर माऱयासमोर स्टोक्सला तासभर क्रीझवर असताना देखील केवळ 8 धावांवरच समाधान मानावे लागले.

एकाकी झुंज देणाऱया रुटला कुलदीपच्या गोलंदाजीवर डीप पॉईंटवरील सिराजने सोपे जीवदान दिले. पण, भारताच्या सुदैवाने हे जीवदान फारसे महागडे ठरले नाही. अक्षरला आपले 90 टक्के चेंडू रफमध्ये टाकण्यात यश लाभले आणि ओली पोपला (12) त्याने बाद केले. डीप मिडविकेटवरील इशांतने त्याचा सोपा झेल घेतला. यष्टीरक्षक-फलंदाज बेन फोक्सला कुलदीपने (2-25) बाद केले. रुटची (92 चेंडूत 33) 2 तास 13 मिनिटांची झुंज अखेर अक्षर पटेलने संपुष्टात आणली. रुटने बॅट पुढे सरसावत फटका मारण्याच्या प्रयत्नात स्लीपकडे सोपा झेल दिला. नंतर कुलदीपच्या गोलंदाजीवर पंतने आणखी एक उत्तम यष्टीरक्षण साकारत मोईन अलीला यष्टीचीत केले आणि भारताच्या धडाकेबाज विजयावर शिक्कामोर्तब झाले.

नरेंद्र हिरवाणीच्या लक्षवेधी पदार्पणाला उजाळा

अक्षर पटेलने ओली स्टोनला बाद करत डावातील 5 वा बळी मिळवला आणि पदार्पणातच लक्षवेधी कामगिरी साकारली. त्याच्या या पराक्रमामुळे 33 वर्षांपूर्वी नरेंद्र हिरवाणीने पदार्पणातच 5 बळी घेतले होते, त्याला देखील उजाळा मिळाला. हिरवाणीने 11 ते 15 जानेवारी 1988 या कालावधीत विंडीजविरुद्ध पदार्पण करताना पहिल्या डावात 61 धावांमध्ये चक्क 8 फलंदाज गारद केले होते. योगायोगाने ती कसोटी देखील चेन्नईमध्येच झाली होती.

मायदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे कर्णधार

कर्णधार / कसोटी सामने / विजय / पराभव / बरोबरी

महेंद्रसिंग धोनी / 30 / 21 / 3 / 6

विराट कोहली / 28 / 21 / 2 / 5.

धोनी-विराट यांची कसोटीतील एकत्रित कामगिरी

कर्णधार / सामने / विजय / पराभव / बरोबरी

महेंद्रसिंग धोनी / 60 / 27 / 18 / 15

विराट कोहली / 58 / 34 / 14 / 10.

धावफलक

भारत पहिला डाव ः सर्वबाद 326.

इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 134.

भारत दुसरा डाव ः सर्वबाद 286.

इंग्लंड दुसरा डाव ः रोरी बर्न्स झे. कोहली, गो. अश्विन 25 (42 चेंडूत 4 चौकार), डॉम सिबली पायचीत गो. पटेल 3 (25 चेंडू), डॅन लॉरेन्स यष्टीचीत पंत, गो. अश्विन 26 (53 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), जॅक लीच झे. रोहित, गो. पटेल 0 (1 चेंडू), जो रुट झे. रहाणे. गो. पटेल 33 (92 चेंडूत 3 चौकार), बेन स्टोक्स झे. कोहली, गो. अश्विन 8 (51 चेंडू), ओली पोप झे. इशांत, गो. पटेल 12 (20 चेंडू), बेन फोक्स झे. पटेल, गो. कुलदीप 2 (9 चेंडू), मोईन अली यष्टीचीत पंत, गो. कुलदीप 43 (18 चेंडूत 3 चौकार, 5 षटकार), ओली स्टोन पायचीत गो. पटेल 0 (5 चेंडू), स्टुअर्ट ब्रॉड नाबाद 5 (10 चेंडूत 1 चौकार). अवांतर 7. एकूण 54.2 षटकात सर्वबाद 164.

गडी बाद होण्याचा क्रम

1-17 (सिबली, 8.2), 2-49 (रोरी बर्न्स, 15.6), 3-50 (लीच, 16.6), 4-66 (लॉरेन्स, 25.1), 5-90 (बेन स्टोक्स, 37.6), 6-110 (ओली, 43.5), 7-116 (बेन फोक्स, 48.3), 8-116 (रुट, 49.2), 9-126 (स्टोन, 51.1), 10-164 (मोईन अली, 54.2).

गोलंदाजी

इशांत शर्मा 6-3-13-0, अक्षर पटेल 21-5-60-5, रविचंद्रन अश्विन 18-5-53-3, मोहम्मद सिराज 3-1-6-0, कुलदीप यादव 6.2-1-25-2.

कोटस

पहिल्या कसोटीत जी खेळपट्टी होती, त्या तुलनेत येथील खेळपट्टी खूपच भिन्न स्वरुपाची होती. अर्थात, केवळ फिरकीला पोषक खेळपट्टी म्हणून मी अजिबात यशस्वी ठरलेलो नाही. त्या बरोबरीनेच गती व वैविध्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात यश लाभले.

-भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन

कोटस

नाणेफेकीचा कौल फारसा महत्त्वाचा होता, असे मला अजिबात वाटत नाही. फिरकीला पोषक खेळपट्टी असतानाही आम्ही या सामन्यात 600 पेक्षा अधिक धावा जमवल्या. अगदी दुसऱया डावातही आम्ही 300 धावांच्या उंबरठय़ावर पोहोचलो होतो.

-भारतीय कर्णधार विराट कोहली

धावाच्या फरकाने भारताचे सर्वात मोठे कसोटी विजय

धावांचा फरक / प्रतिस्पर्धी / ठिकाण / तारीख

337 धावा / द. आफ्रिका / दिल्ली / 3 डिसेंबर 2015

321 धावा / न्यूझीलंड / इंदोर / 8 ऑक्टोबर 2016

320 धावा / ऑस्ट्रेलिया / मोहाली / 18 ऑक्टोबर 2008

318 धावा / विंडीज / नॉर्थ साऊंड / 22 ऑगस्ट 2019

317 धावा / इंग्लंड / चेन्नई / 13 फेब्रुवारी 2021

304 धावा / श्रीलंका / गॅले / 26 जुलै 2017

रोटेशन पॉलिसीला दोष देणार नाही- जो रुट

इंग्लंडच्या रोटेशन पॉलिसीनुसार, जेम्स अँडरसन व जोस बटलरसारख्या स्टार खेळाडूंना येथे खेळवले गेले नाही व संघाला 317 धावांनी नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. मात्र, दस्तुरखुद्द कर्णधार जो रुटने आपण रोटेशन पॉलिसीला दोष देणार नाही, असे स्पष्ट केले. ‘हाताशी जो संघ आहे, तो घेऊन आपल्याला जे शक्य आहे, ते करण्याचा माझा प्रयत्न असतो. या संघातही काही उत्तम, अनुभवी खेळाडू आमच्याकडे होते’, असे रुट सामना संपल्यानंतर म्हणाला.

‘कोव्हिड-19 च्या संकटामुळे आव्हानात्मक परिस्थिती आहे. या प्रतिकूल परिस्थितीत जितके क्रिकेट होते आहे ते स्वागतार्ह आहे. त्यामुळे, माझे पूर्ण लक्ष सहकाऱयांकडून उत्तम कामगिरी साकारुन घेण्यावर राहिले आहे. यापुढील दोन लढतीत देखील आम्ही याचसाठी प्रयत्नशील असणार आहोत’, असे त्याने पुढे नमूद केले.

मोईन अली मायदेशी परतणार, जोफ्रा आर्चर तंदुरुस्त

येथील दुसऱया कसोटी सामन्यात 226 धावात 8 बळी (पहिल्या डावात 4-128, दुसऱया डावात 4-98) मिळवणारा इंग्लंडचा अव्वल फिरकी गोलंदाज मोईन अली आता रोटेशन पॉलिसीनुसार, मायदेशी परतणार असून यामुळे अहमदाबादमधील तिसऱया कसोटीत पाहुण्या संघाला त्याची उणीव जाणवू शकते. अर्थात, मोईन अली मायदेशी परतणार असला तरी जोफ्रा आर्चर तंदुरुस्त झाला असून तो आगामी सामन्यांसाठी उपलब्ध असेल, असे इंग्लिश कर्णधार जो रुट म्हणतो.

दिवस-रात्र कसोटीसाठी इंग्लिश संघात बेअरस्टो, वूडचा समावेश

अहमदाबादमध्ये खेळवल्या जाणाऱया तिसऱया कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो व जलद गोलंदाज मार्क वूड यांना पाचारण केले आहे. जॉनी बेअरस्टोला यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आली होती. लंकेतील 2 कसोटी सामन्यात त्याने अनुक्रमे 47, नाबाद 35, 28 व 29 धावांचे योगदान दिले होते. वूडला देखील लंकेविरुद्ध मालिकेनंतरच विश्रांती दिली गेली. तेथे पहिल्या कसोटीत तो एकही बळी घेऊ शकला नाही तर दुसऱया कसोटीत त्याला 2 बळी घेता आले होते.

तिसऱया कसोटीसाठी इंग्लिश संघ ः जो रुट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

जागतिक मानांकनात भारताची दुसऱया स्थानी झेप

इंग्लंडविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्यात 317 धावांनी धमाकेदार विजय संपादन केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी मानांकन यादीत दुसऱया स्थानी झेपावला आहे. चेपॉकवर मालिका बरोबरीत आणणाऱया विजयासह भारताने 69.7 टक्के गुण प्राप्त केले. शिवाय, 460 एकंदरीत गुणांची कमाई केली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित करणारा न्यूझीलंडचा संघ या यादीत अव्वल असून त्यांच्या खात्यावर 70.0 टक्के गुण व 420 एकंदरीत गुण आहेत. भारताचे गुण न्यूझीलंडपेक्षा अधिक असले तरी टक्केवारी गुणाचा निकष महत्त्वाचा असल्याने त्यानुसार न्यूझीलंडचा संघ अव्वल तर भारतीय संघ यादीत दुसऱया स्थानी विराजमान आहे.

जागतिक मानांकन यादीतील पहिले चार संघ

संघ / टक्केवारी / गुण / मालिका / सामने

                                                        विजय / पराभव / अनिर्णीत

न्यूझीलंड / 70.0 / 420 / 5 / 7/4/0

भारत / 69.7 / 460 / 6 / 10 / 4 / 1

ऑस्ट्रेलिया / 69.2 / 332 / 4 / 8 / 4 / 2

इंग्लंड / 67.0 / 442 / 6 / 11 / 5 / 3.

Related Stories

कार्लसन ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया सर्वोत्तम संघाची फिंचकडून निवड

Patil_p

13 वर्षीय निशिया जपानची सर्वात तरुण सुवर्णकन्या

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा पराभव

Patil_p

ऑलि रॉबिन्सन ससेक्सतर्फे खेळणार

Patil_p

भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे

Patil_p
error: Content is protected !!