तरुण भारत

द. आफ्रिकेचा डय़ू प्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

टी-20 क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय, इन्स्टाग्रामवरुन निवृत्तीची घोषणा

जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था

Advertisements

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसने बुधवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. टी-20 क्रिकेट हे यापुढील आपले मुख्य लक्ष्य असेल, असे तो याप्रसंगी म्हणाला. आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा केला.

‘सर्व क्रिकेट प्रकारातून खेळण्याची संधी लाभली, हा मी माझा सन्मान मानतो. मागील वर्षभराचा पूर्ण कालावधी अनिश्चिततेचा होता. अनेक चढउतार सर्वांनी अनुभवले. सर्व स्तरावर खेळणे सन्मानाचे होते. पण, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे’, असे प्लेसिस आपल्या निर्णयाची घोषणा करताना म्हणाला. टी-20 क्रिकेट हा आपला सर्वोच्च प्राधान्यक्रम असेल. मात्र, वनडे क्रिकेटमध्येही मी खेळत राहू शकेन, असे 36 वर्षीय प्लेसिसने पुढे नमूद केले.

‘पुढील दोन वर्षात आयसीसीच्या दोन टी-20 विश्वचषक स्पर्धा होत आहेत आणि त्या दृष्टीने मी टी-20 क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. शक्य तितके खेळत राहण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू होण्यावर माझा पूर्ण प्रयत्न असेल’, असे प्लेसिस पुढे म्हणाला.

36 कसोटीत नेतृत्वाची धुरा

दक्षिण आफ्रिकन संघातील अव्वल खेळाडूंपैकी एक असलेल्या प्लेसिसने 69 कसोटी सामने खेळत त्यात 4163 धावांचे योगदान दिले आहे. त्याची सरासरी 40.02 इतकी असून त्याने 10 शतके व 21 अर्धशतके झळकावली आहेत. मागील वर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी व टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. प्लेसिसने 36 कसोटीत दक्षिण आफ्रिकन संघाचे नेतृत्व भूषवले आणि त्यात 18 विजय संपादन करुन दिले.

‘जर 15 वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते की, मी 69 कसोटी सामने खेळेन आणि आफ्रिकन संघाचे नेतृत्वही भूषवेन तर मी त्यावेळी त्यावर विश्वासही ठेवला नसता. कसोटी कारकिर्दीत अनेक घटकांचे मला सहकार्य लाभले. माझ्या जडणघडणीत अनेकांचा वाटा आहे. त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. जे चढउतार अनुभवले, त्यातूनच मी घडलो आहे’, असे प्लेसिस याप्रसंगी म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातच होणाऱया कसोटी मालिकेनंतर कसोटीला गुडबाय करण्याचा त्याचा प्रारंभी विचार होता. पण, ही मालिका कोव्हिड-19 च्या संकटामुळे अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकली गेली आणि त्यानंतर प्लेसिसने देखील आणखी प्रतीक्षा करण्याऐवजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. पुढील काही महिन्यात मी क्रिकेट दक्षिण आफ्रिकन मंडळाशी संवाद साधेन आणि भविष्यातील त्यात रुपरेषा ठरवली जाईल. माझ्यासाठी आतापर्यंतचा प्रवास अर्थातच उत्तम राहिला आहे. माझे कुटुंबिय, प्रशिक्षक व क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा मी आभारी आहे’, असे त्याने पुढे नमूद केले.

उजव्या हाताने फलंदाजी करणाऱया प्लेसिसने आतापर्यंत द. आफ्रिकन संघातर्फे 143 वनडे व 50 टी-20 सामने खेळले आहेत. त्याची 50 षटकांच्या क्रिकेटमधील सरासरी 47 पेक्षा अधिक व टी-20 मधील सरासरी 35.5 इतकी राहिली आहे.

प्लेसिसच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप

– / सामने / धावा / सर्वोच्च / सरासरी / शतके / अर्धशतके

कसोटी / 69 / 4163 / 199 / 40.02 / 10 / 21

वनडे / 143 / 5507 / 185 / 47.47 / 12 / 35 टी-20 / 50 / 1528 / 35.53 / 1 / 10

Related Stories

भारतीय रोईंग संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p

साईराज हुबळी टायगर्स, अलोन स्पोर्ट्स संघांचे विजय

Omkar B

प्रज्नेशला उपविजेतेपद

Omkar B

विराटची आरसीबी कर्णधारपदावरुन हकालपट्टी करा! – गौतम गंभीर

Patil_p

बाबर आझमचे अर्धशतक, पाक 2 बाद 121

Patil_p

जर्मनीच्या विजयात वेर्नरचे दोन गोल

Patil_p
error: Content is protected !!