तरुण भारत

शिरसी बंद हाकेला काही एक संबंध नाही!

कारवार जिल्हा पालकमंत्री-कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी / कारवार

Advertisements

येत्या 24 तारखेला शिरसी बंदला देण्यात आलेल्या हाकेला आणि शिरसी स्वतंत्र जिल्हा निर्मितीला काही एक संबंध नाही, अशी प्रतिक्रिया कारवार जिल्हा पालकमंत्री आणि कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी नोंदविली. जिल्हय़ातील घाटमाथ्यावरील 7 तालुक्यांचा समावेश असलेल्या शिरसी स्वतंत्र जिल्हा निर्मितीसाठी 24 फेब्रुवारी रोजी शिरसी स्वतंत्र जिल्हा संघर्ष समितीने ‘शिरसी बंद’ची हाक दिली आहे. त्याचबरोबर कारवार जिल्हय़ाचे विभाजन करायचे की नाही यावरून वाद सुरू आहे.

काहांचे म्हणणे असे की, जिल्हय़ाचे अखंडत्व टिकविले पाहिजे तर अन्य काही जणांचे म्हणणे असे की, जिल्हय़ाचे विभाजन झाले पाहिजे. वादाच्या या पार्श्वभूमीवर मंत्री शिवराम हेब्बार यांना येथील पत्रकारांनी छेडले असता उपरोक्त प्रतिक्रिया नोंदवून ते पुढे म्हणाले, आता शिरसी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पुढे यल्लापूर बंदचे आवाहन करण्यात येईल आणि त्यानंतर हल्याळ बंदसाठी हाक देण्यात येईल आणि म्हणूनच बंदला आणि स्वतंत्र जिल्हा निर्मितीसाठी काही एक संबंध नाही. जिल्हा विभाजनाबद्दल एक व्यक्ती या नात्याने किंवा एक मंत्री या नात्याने अभिप्राय देणे कष्टप्रद आहे, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, जिल्हा विभाजनप्रश्नी जिल्हय़ातील आमदार, खासदार, विविध संघ-संस्थांच्या पदाधिकाऱयांशी आणि बुद्धीजीवींशी चर्चा केली पाहिजे. चर्चेनंतर जिल्हय़ाच्या विभाजनाबद्दल प्रथम विचार केला पाहिजे. त्यानंतर स्वतंत्र जिल्हय़ाचे केंद्र शिरसी, यल्लापूर अथवा हल्याळ येथे असले पाहिजे याच्याबद्दल विचार झाला पाहिजे. त्याकरिता जिल्हा निर्मितीबद्दल अद्याप निश्चित निर्णय घेण्यात आलेला नाही. जिल्हा निर्मितीबद्दल वैयक्तिक भूमिकेला स्थान नाही. सामूहिक निर्णय आणि भूमिका तीच आपली भूमिका असे स्पष्ट केले. भविष्यात सर्वजण एकत्र येऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केवळ विजय मिराशीलाच नव्हे तर सर्वांनाच आपले रक्षण आहे

काही दिवसांपूर्वी यल्लापूर तालुक्यातील एका ग्रा. पं. च्या पदाधिकाऱयांच्या निवडीवरून मोठा वाद होऊन भाजप समर्थकांच्या एक गटाने अन्य एका भाजप समर्थकांच्या गटाला मारहाण केली होती. मंत्री हेब्बार यांचे कट्टर समर्थक विजय मिराशी यांनी मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. मारहाण झालेले ग्रा. पं. सदस्य मागासवर्गीय गवळी समाजाचे असल्याने समाजाचे नागरिक विजय मिराशीच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर उतरलेल्यांमध्ये विधानपरिषद सदस्य शांताराम सिद्धी, यल्लापूरचे माजी आमदार व्ही. एस. पाटील (दोघेही भाजपचे नेते) आदींचा समावेश होता. मंत्री हेब्बार हे विजय मिराशी यांना रक्षण देत आहेत, असा गंभीर आरोप करण्यात येत होता. याबद्दल येथील पत्रकारांनी हेब्बार यांना छेडले असता ते म्हणाले, आपण केवळ विजय मिराशीलाच नव्हे तर सर्वांनाच रक्षण देत आहे. आणि म्हणूनच यल्लापूर तालुक्यातील 15 पैकी 15 ग्राम पंचायती ताब्यात घेण्यात भाजपला यश आले आहे. एका ग्रा. पं. च्या पदाधिकाऱयांच्या निवडीवरून निश्चितपणे थोडाफार गोंधळ निर्माण झाला. विषय छोटा होता. सर्व जण भाजपचेच आहेत. विषय मोठा करणे शोभून दिसत नाही आणि म्हणून येत्या काही दिवसात दोन्ही गटांना एकत्रित आणून या विषयावर पडदा टाकण्यात येईल, असेही हेब्बार यांनी स्पष्ट केले.

Related Stories

मुख्य डेनेजवाहिनी तुंबल्याने समस्या

Amit Kulkarni

परदेशात राहूनही जन्मभूमीशी नाळ कायम

Amit Kulkarni

दुकाने बंद ठेवून त्रिपुरा दंगलीचा निषेध

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंटची निवडणूक सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता

Patil_p

ग्रामीण भागात काँग्रेसनेही केला अखेरच्या दिवशी प्रचार

Omkar B

पी. बी. रोडवर दुभाजक घालण्याच्या कामाला गती

Patil_p
error: Content is protected !!