तरुण भारत

रशियाचा मेदवेदेव्ह अंतिम फेरीत

ग्रीसच्या सित्सिपसवर मात, अंतिम फेरीत जोकोविचला नमविण्याचे आव्हान

वृत्तसंस्था/मेलबर्न

रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हने ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस सित्सिपसचे आव्हान संपुष्टात आणत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. नवव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नात असणाऱया सर्बियाच्या जोकोविचशी त्याची जेतेपदासाठी रविवारी लढत होईल. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.

चौथे मानांकन असलेल्या 25 वर्षीय मेदवेदेव्हने उपांत्य सामन्यात सित्सिपसवर पूर्ण वर्चस्व राखले होते. त्याने ही लढत 7000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत 6-4, 6-2, 7-5 अशी जिंकून अंतिम फेरी गाठली. या मोसमातील त्याचा हा सलग 20 वा विजय आहे. या अपराजित घोडदौडीत तीन अजिंक्यपदांचा समावेश असून तो आता ग्रँडस्लॅम यशाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला आहे. मात्र त्याला यापूर्वी आठवेळा ही स्पर्धा जिंकणाऱया अग्रमानांकित जोकोविचचे आव्हान परतावून लावण्याचा पराक्रम करण्याची गरज आहे. विविध ग्रँडस्लॅम स्पर्धांत त्याने बऱयापैकी यश मिळविले आहे. 2019 मध्ये त्याने अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. पण त्याला एकदाही जेतेपद मिळविता आलेले नाही. ती कसर भरून काढण्याची संधी त्याला यावेळी मिळाली आहे. विशेष म्हणजे जोकोविचने यापूर्वी आठवेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि आठही वेळा त्याने जेतेपद पटकावलेले आहे. मेदवेदेव्हमध्ये त्याला पराभूत करण्याची क्षमता असून गेल्या नोव्हेंबरपासून तो फॉर्ममध्येही आहे. त्याच्यासाठी वरचढ ठरणारी बाजू म्हणजे जोकोविचविरुद्धच्या गेल्या चारपैकी तीन लढतीत मेदवेदेव्हने विजय मिळविलेला आहे.

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठणारा मेदवेदेव्ह हा तिसरा रशियन खेळाडू आहे. याआधी येवगेनी कॅफेलनिकोव्ह व मॅराट सॅफिन यांनी असा पराक्रम केला होता. ‘हा सामना निश्चितच सोपा नव्हता. तिसऱया सेटमध्ये त्याचा प्रतिकार पाहून मी थोडा हादरलो होतो. कारण हा ग्रँडस्लॅमचा उपांत्य सामना होता. पण अखेरीस मला विजय मिळविता आला, याचा मला खूप आनंद वाटतो. विशेषतः माझ्या सर्व्हवर काही अवघड क्षण निर्माण झाले होते,’ असे मेदवेदेव्ह नंतर म्हणाला. मेदवेदेव्ह व सित्सिपस यांच्यात आतापर्यंत एकूण सहा लढती झाल्या असून त्यापैकी पाचवेळा मेदवेदेव्हने विजय मिळविले आहेत.

सित्सिपसने 20 ग्रँडस्लॅम जिंकणाऱया स्पेनच्या राफेल नदालचे पाच सेट्सच्या झुंजीत आव्हान संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली होती. या चार तासांच्या थकवा आणणाऱया लढतीचा त्याच्यावर झालेला परिणाम उपांत्य सामन्यावेळी दिसून येत होता. सित्सिपसविरुद्ध तिसऱया सेटवेळी मेदवेदेव्ह दडपणाखाली आल्याचे दिसत होते. पण समतोल ढळू न देता त्याने 6-5 वर ब्रेक मिळविला आणि आपल्या सर्व्हिसवर विजय साकार केला.

महिला दुहेरीत एलिस मर्टेन्स-एरीना साबालेन्का अजिंक्य

द्वितीय मानांकन मिळालेल्या एलिस मर्टेन्स व एरीना साबालेन्का यांनी झेकच्या बार्बरा क्रेसिकोव्हा व कॅटरिना सिनियाकोव्हा यांचा 6-2, 6-3 असा पराभव करून महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. त्यांनी एकत्र खेळताना मिळविलेले हे दुसरे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. यापूर्वी 2019 मध्ये या जोडीने अमेरिकन ग्रँडस्लॅमचे जेतेपद मिळविले होते. त्यांचे हे एकूण पाचवे जेतेपद आहे. मात्र यावर्षीच्या उर्वरित ग्रँडस्लॅममध्ये त्या एकत्र खेळताना दिसणार नाहीत. साबालेन्काला एकेरीवर जास्त लक्ष केंद्रित करावयाचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दुबई व मियामी येथे होणाऱया डब्ल्यूटीए स्पर्धेत मात्र त्या एकत्रच खेळणार आहेत. ‘दुहेरीत हालचाली कमी कराव्या लागत असल्याने तेवढी ताकद खर्च करावी लागत नसली तरी एकेरीसाठी मला ती राखून ठेवायची आहे,’ असे साबालेन्का म्हणाली. एकेरीत बेलारुसची साबालेन्का सध्या सातव्या क्रमांकावर आहे तर बेल्जियमची मर्टेन्स 16 व्या क्रमांकावर आहे. येथील स्पर्धेतही त्यांनी एकेरीत भाग घेतला होता. पण दोघीही चौथ्या फेरीत पराभूत झाल्या होत्या.

शुक्रवारी झालेल्या दुहेरीच्या अंतिम फेरीत त्यांनी तीनदा चॅम्पियनशिप पॉईंट्स वाया घालविले. चौथ्या वेळी साबालेन्काने बिनतोड सर्व्हिस करीत गुण मिळविला आणि नंतर सिनियाकोव्हाने परतीचा बॅकहँड फटका वाईड मारल्याने त्यांचे जेतेपद निश्चित झाले. दोघींनी नेहमीप्रमाणे एकत्रित ट्रॉफी हातात घेऊन उंच उडी घेत जेतेपद साजरे केले.

Related Stories

राजस्थान रॉयल्सच्या फिरकी सल्लागारपदी ईश सोधी

Patil_p

हरभजनचा पुढाकार, 5000 कुटुंबांची उचलली जबाबदारी

Patil_p

द. आफ्रिकेचा डय़ू प्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

क्रिकेटपटू कुशल मेंडीसला अटक

Patil_p

अष्टपैलू अक्षर पटेलला कोरोना

Patil_p

नापोलीचा सलग पाचवा विजय

Patil_p
error: Content is protected !!