तरुण भारत

मण्णूरला जोडणाऱया मुख्य रस्त्याची दुर्दशा

वाहनचालकांची गैरसोय, ग्रामस्थांमध्ये संताप : ठिकठिकाणी अवकाळी पावसाचे पाणी साचून तलावसदृष्य परिस्थिती

वार्ताहर / हिंडलगा

Advertisements

गेल्या काही महिन्यांपासून रेंगाळत चाललेले रस्त्याचे काम आणि त्यातच गुरुवार दि. 17 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे हिंडलग्यापासून मण्णूर गावाला जोडणाऱया मुख्य रस्त्याची अक्षरशः दैना उडाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने सर्वत्र तलावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम खाते आणि लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभारामुळे मण्णूर रस्ता रुंदीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. वर्षभरापूर्वी सदर रस्त्याचे उद्घाटन झाले आहे. पण, काम मात्र पूर्ण कधी होणार आणि दगड धुळीच्या साम्राज्यापासून मुक्ती कधी मिळणार? असा प्रश्न आता मण्णूर व गोजगा ग्रामस्थांना पडला आहे. पूर्वीचा रस्ता पूर्णतः जेसीबीच्या साहाय्याने उखडून त्यावर खडी व माती टाकण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काम बंद ठेवून कंत्राटदार गायब झाला आहे. याचा फटका मण्णूर, गोजगा, बेकीनकेरे व इतर गावातील नागरिकांना बसत असून, दैनंदिन प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय परिसरात असलेल्या क्वारीतील खडी व दगडांची अवजड वाहतूक करणाऱया वाहनांमुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात धुळीचे लोळ उडत असून, पाठीमागून प्रवास करणे मुश्किल बनले आहे. अशातच गुरुवारी झालेल्या पावसामुळे समस्येत आणखीनच भर पडली आहे.

आंबेवाडीला वळसा घालून प्रवास करण्याचा वाहनधारकांचा प्रयत्न

अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्याला तलावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पाण्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे येथून प्रवास करण्याचा धोका पत्करण्याऐवजी आंबेवाडीला वळसा घालून मण्णूरला जाणेच वाहनधारक पसंत करू लागले आहेत. तरीदेखील बांधकाम खाते व लोकप्रतिनिधींनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम त्वरित सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मण्णूर व गोजगा ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Stories

आरपीडी कॉर्नर परिसरात सांडपाण्याचे डबके

Amit Kulkarni

माजी सैनिकांसाठी मराठा इन्फंट्रीमध्ये भरती

Amit Kulkarni

मिसळ महोत्सवाला खवय्यांचा उत्तम प्रतिसाद

Patil_p

सर्वसामान्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक

Omkar B

आरएसएसचे राजशेखर हिरेमठ यांचे निधन

Patil_p

संतिबस्तवाड येथील बसवेश्वर मंदिराचा कॉलम भरणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!