तरुण भारत

मिरचीचा ठसका झाला कमी

ब्याडगी मिरची 220 रुपये किलोपासून 320 पर्यंत उपलब्ध

@ प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

मिरचीने गाठलेला चारशेचा टप्पा गृहिणींसाठी तिखटाचा ठसका वाढविणारा होता. परिणामी मिरची महागल्याने प्रत्येक पदार्थात टाकण्यात येणाऱया तिखटासाठी महिलांनी हात आखडता घेतल्याचे दिसून आले. लॉकडाऊन व कोरोनाकाळात वाढलेल्या मिरचीच्या दरामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. मात्र आता मिरचीचा ठसका कमी झाला असून मागील आठवडय़ापासून मिरचीचे दर उतरले आहेत. चारशेचा टप्पा गाठलेली मिरची आता आवाक्यात आली असून ब्याडगी मिरची 220 रुपये किलोपासून एक नंबर ब्याडगी 320 पर्यंत मिळत आहे. यामुळे यात्रा, लग्न समारंभांच्या निमित्ताने करण्यात येणाऱया तिखटाच्या पार्श्वभूमीवर मिरचीचे दर उतरल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कोरोनाकाळात सर्व लॉकडाऊन असल्याने सर्वजण घरातच होते. परिणामी विविध खाद्यपदार्थ तयार करून खाण्यात आले. परिणामी यंदा तिखट लवकर संपले अशा चर्चा करत लॉकडाऊन संपताच मिरची खरेदीला जोर आल्याचे दिसून आले. मात्र त्यावेळी मिरचीचा दर किलो 350 च्या वर जाऊन पोहोचल्याने अक्षरशः गृहिणींचे बजेट कोलमडून गेले. पाच किलो मिरची आणून तिखट करणाऱया महिलांनी दोन किलो मिरचीवरच समाधान मानले. पुढे दर वाढतच गेल्याने चारशेचा टप्पा पार केल्याचे दिसून आले.

मागील आठवडय़ाभरापासून मिरचीचे दर कमी झाले आहेत. मिरची बाजाराचा आढावा घेतला असता एक नंबर ब्याडगी मिरची 300 ते 320 रुपये किलो असल्याचे दिसून आले. जवारी मिरची 160 ते 180 रु. किलो आहे. तसेच काश्मिरी मिरची 400 रु. किलो आहे. बेळगावमध्ये प्रामुख्याने ब्याडगी मिरचीची हुबळी, गदग, बळ्ळारी, ब्याडगी, रायचूर या भागातून आवक होते. सध्या  बाजारात मिरचीची आवक वाढली असून दर कमी झाले आहेत. पुढे दर स्थिर राहतील अथवा आणखी कमी होण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.

  दर कमी झाल्याने समाधान

प्रामुख्याने मार्च ते मे महिना लग्न समारंभाचा मानला जातो. यामुळे लग्न सोहळय़ांच्या पार्श्वभूमीवर मिरचीची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातून महिलावर्गाकडून मोठय़ा प्रमाणात मिरच्यांची खरेदी केली जात आहे. परंपरेनुसार शुभकार्य झाल्यानंतर वर्षभर तिखट केले जात नसल्याने मिरची खरेदीला जोर आला आहे. गतवर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मिरची बाजारातील उलाढाल मंदावली होती. मात्र आता सर्व सुरळीत होत असताना मिरचीची मागणी वाढण्याबरोबरच दरही कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

महाराष्ट्राने कणखर भूमिका घ्यायला हवी!

Amit Kulkarni

मृग नक्षत्राच्या काळात पावसाचा केवळ शिडकावाच

Patil_p

कर्नाटक: सीईटी केंद्रे कंटेनमेंट झोन अंतर्गत येऊ नयेत

Abhijeet Shinde

ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन कमी पडू देऊ नका!

Amit Kulkarni

दिवाळी पाडव्यामुळे कोटय़वधीची उलाढाल

Patil_p

कंग्राळी खुर्दमध्ये कोरोना चाचणी शिबिर

Omkar B
error: Content is protected !!