तरुण भारत

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा कार्यालयांची तोडफोड झाल्यास फौजदारी कारवाई

दोन ते दहा वर्षांपर्यत कारावासाची तरतूद

ऑनलाईन टीम / पुणे :

Advertisements

एरव्ही तसेच कोरोनाच्या काळातही वीजग्राहकांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, कर्मचारी सध्या गंभीर आर्थिक संकटामुळे नाईलाजाने थकीत वीजबिलांची वसुली व थकबाकीदारांची वीज खंडित करण्याची कारवाई करीत आहेत. या दरम्यान त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की किंवा मारहाण तसेच कार्यालयांची तोडफोड करून नासधूस झाल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा कार्यालयाची तोडफोड करू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

एकीकडे सुरळीत वीजपुरठ्यासाठी ग्राहकांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रात्रंदिवस सेवा देणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना दुसरीकडे वीजबिल वसुलीसाठी मारहाण किंवा कार्यालयातील धुडगूस सारख्या दुर्दैवी प्रकारांना सामोरे जावे लागू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सरकारी कामात अडथळा आणणे (कलम 353), कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, अपशब्द वापरणे (कलम 504), धमकी देणे (कलम 506), मारहाण करणे (कलम 332 व 333), कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करून तोडफोड करणे (कलम 427), सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, कार्यालयात गोंधळ घालणे (कलम 143, 148 व 150), अनधिकृत जमाव गोळा करणे (कलम 141 व 143) आदी प्रकारांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलमांन्वये कारवाईची तरतूद आहे. या विविध कलमांन्वये दोन ते 10 वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा कार्यालयाची तोडफोड करण्याचे प्रकार घडल्यास संबंधीतांविरुद्ध तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान इचलकंरजी (जि. कोल्हापूर) येथील महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी संबंधीत अभियंता व कर्मचाऱ्यांशी मोबाईलद्वारे थेट संवाद साधून त्यांची विचारपूस करीत मनोधैर्य वाढविले.  

वीजबिलांचा भरणा होत नसल्याने सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. थकबाकीचा भरणा करण्यासाठी चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 27 लाख 11 हजार वीजग्राहकांकडे सद्यस्थितीत 1771 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर 13 लाख 86 हजार ग्राहकांनी एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या सलग 10 महिन्यांच्या कालावधीत एकही वीजबिल भरलेले नव्हते. तरीही 31 जानेवारी 2021 पर्यंत थकबाकीसाठी एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नाही. आता नाईलाजाने गेल्या 1 फेब्रुवारीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

वीजबिलांबाबत तक्रारी निवारणासाठी सर्व कार्यालयात सेवा उपलब्ध आहे. तसेच थकबाकी भरण्यासाठी हप्त्यांची देखील सोय उपलब्ध आहे. मात्र 24x7 ग्राहकांच्या सेवेत असणाऱ्या तसेच शासकीय कर्तव्य बजावताना अभियंता व कर्मचाऱ्यांना मारहाणीचे दुर्दैवी प्रकार झाल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा भरणा करून आर्थिक संकटाच्या काळात सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये १४७ कोरोनाबाधितांची भर; एकूण संख्या २१४१ वर

Abhijeet Shinde

काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली एकजूटीची शपथ

Sumit Tambekar

मागासवर्गीय उद्योजकांचे प्रश्न सोडवणार : डॉ नितीन राऊत

Rohan_P

सोलापूर : प्रियसीच्या ञासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या

Abhijeet Shinde

सचिन वाझेविरोधात एसीबीकडे दोन तक्रारी

Abhijeet Shinde

पेगॅससची चिंता सोडा, पेंग्विनची चिंता करा; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!