तरुण भारत

सौदीच्या सैन्यात सामील होणार महिला

सैन्याने 4 पदांवरील भरतीला दिली मंजुरी- प्रारंभी शहरांमध्ये तैनात करण्यात येणार

वृत्तसंस्था/ रियाध

सौदी अरेबियात आता महिला देखील सैन्यात दाखल होऊ शकतील. संरक्षण मंत्रालयाने सुमारे दोन वर्षे चाललेल्या विचारविनिमयानंतर या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे. प्रारंभी महिलांच्या चार पदांवरील भरतीसाठी अर्जप्रक्रियेला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ शहरांमध्ये महिला सैनिकांना तैनात करण्यात येणार असून सध्या त्यांना युद्धमैदानापासून दूर ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संरक्षण मंत्रालयाने एक एकीकृत प्रवेश पोर्टल सुरू केले आहे. यात पहिल्यांदाच पुरुषांसोबत महिलांच्या अर्जालाही मंजुरी देण्यात आली आहे. सध्या सैनिकापासून सार्जंटच्या एकूण 4 पदांसाठी महिला अर्ज करू शकतील. रॉयल सौदी अरेबियन आर्मी, रॉयल सौदी एअर फोर्स, रॉयल सौदी नेव्ही, रॉयल सौदी स्ट्रटेजिक मिसाइल फोर्स आणि रॉयल आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिससाठी महिलांना अर्ज करता येणार
आहे.

अटीही निर्धारित

सैन्यात महिलांच्या भरतीसाठी काही नियम तयार करण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा वैद्यकीयदृष्टय़ा अपात्र महिला अर्ज करू शकणार नाहीत. तसेच महिलांचे वय 21 ते 41 वर्षांदरम्यान असायला हवे. उंची किमान 155 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. यापूर्वी एखाद्या शासकीय पदावर तैनात महिला अर्ज करू शकणार नाही. किमान माध्यमिक शिक्षण पूर्ण असणे अनिवार्य आहे. विदेशी नागरिकाशी विवाह करणाऱया महिलांची भरती केली जाणार नाही.

युवराज सलमान यांचे कौतुक

अनेक महिलांनी युवराज सलमान आणि सैन्याच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. 30 वर्षांपासून या मुद्दय़ावर विचार आणि चर्चा सुरू होती. पण आज युवराज सलमान यांनी चित्र बदलले आहे. सरकारी नोकरी असो किंवा सैन्य आता सर्व ठिकाणी महिला नोकरी करू शकतात असे उद्गार काही महिलांनी काढले आहेत. आमच्या इतिहासात यापूर्वी कधी महिलांना युद्धमैदानात पाठविण्याची बाबही ऐकली नव्हती. याचमुळे हा निर्णय अत्यंत मोठा आणि क्रांतिकारक असल्याचे विधान आयटी तंत्रज्ञ रहमा अल कायरी यांनी केले आहे.

Related Stories

चिनी जहाजांना जपानने पिटाळले

Omkar B

कोरोनापेक्षा अधिक घातक असणार भविष्यातील महामारी

Patil_p

तुर्कस्तान : बळी वाढले

Omkar B

26/11 च्या सूत्रधारावर वक्रदृष्टी

Patil_p

न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या महिला मंत्र्यांनी केले मल्याळममध्ये भाषण

datta jadhav

टोकियो : उच्चांकी रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!