तरुण भारत

12 डिसेंबर 1965 रोजी गोळी आर-पार गेली, पण…

देवलीतील सैनिक सहदेव देऊलकर यांची शौर्यकथा

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्यातून मिळते प्रेरणा!

Advertisements

महेंद्र पराडकर / मालवण:

12 डिसेंबर 1965 चा तो दिवस… पंजाबमधील खेमकरम सेक्टरमधील मोगा गावात पाकिस्तानी सैन्य भारतावर आक्रमण करते… भारतीय जवानही जीवाची बाजी लावत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देतात… पाकिस्तानची पळताभुई थोडी होते…पण भारतमातेचे रक्षण करणाऱया एका सैनिकाच्या उजव्या खांद्यातून शत्रू राष्ट्राची एक गोळी आर-पार गेलेली असते…त्याही परिस्थितीत तो मक्याच्या शेताचा आसरा घेत झुंज देतो…अखेर जखमी अवस्थेतील या सैनिकाला उपचारासाठी दवाखान्यात नेले जाते…आणि बरोब्बर एका वर्षाने डिसेंबर 1966 मध्ये तो पुन्हा सैन्य दलात दाखल होतो…ही शौर्यगाथा आहे, तालुक्यातील खालची देवली येथील सहदेव गोपाळ देऊलकर यांची.

देवली गावात 1940 साली जन्मलेले सहदेव देऊलकर यांचे शिक्षण दुसरीपर्यंतच झाले. नंतर ते मोलमजुरी करायचे. मालवण बंदरात प्रवासी बोटसेवा सुरू असताना ते मालवणात धक्क्यावर यायचे. एकेदिवशी मालवणातील एका हॉटेलमधून चहा पिऊन बाहेर पडत असताना सैन्यात नव्याने भरती होणाऱया सैनिकांकरिता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱयांची गाडी तेथे आली. त्यांनी सैन्यात भरती होण्याबाबत देऊलकर यांना विचारणा केली आणि मालवण पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे त्यांना धावायला सांगितले गेले. प्रत्यक्ष मैदानात शारीरिक क्षमता जाणून घेतल्यावर त्यांना बेळगाव येथील मराठा रेंजच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

1962 चा तो काळ होता. त्यानंतर मध्यप्रदेशमधील एआरसी सागर लालकुट्टी येथे त्यांना पाठविण्यात आले. तेथे सहा महिने रायफल, हातगोळय़ाचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर 28 दिवसांच्या सुट्टीवर पाठविण्यात आले. 1964 साली जोधपूरला मंडई येथे बाडमेर सेक्टरला सैन्य दलात ते सामील झाले. 12 डिसेंबर 1965 रोजी पंजाबमधील खेमकरम सेक्टरमध्ये ते कार्यरत असताना मोगा गावात पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला चढवला. यावेळी भारतीय सैन्याने जोरदार प्रतिकार करीत पाकिस्तानला नामोहरम केले. परंतु, साधारण शंभर मीटर अंतरावरील पाकिस्तानी सैनिकाच्या बंदुकीतून निघालेली एक गोळी सहदेव देऊलकर यांच्या उजव्या खांद्यातून आर-पार गेली. मात्र, गोळीच्या वेदनांनी ते डगमगले नाहीत. अखेर अन्य सैनिकांनी त्यांना अमृतसर येथील दवाखान्यात दाखल केले. यावेळी दवाखान्यात उपचार सुरू असताना युद्धात भारताची सरशी झाल्याचे वृत्त ऐकून त्यांना खूप आनंद झाला. पुढील उपचारासाठी त्यांना जालिंधरला आणण्यात आले. जालिंधरहून मेरठला आणि मेरठहून लखनऊला दाखल करण्यात आले. जखमी झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये उजवा हात कायमचा गमवावा लागतो की काय अशी भीती त्यांना वाटत होती. पण लखनऊमध्ये त्यांच्यावर पूर्णत: यशस्वी उपचार झाले आणि 12 डिसेंबर 1966 रोजी ते सैन्यात पुन्हा दाखल झाले.

1971 च्या युद्धाचेही साक्षीदार

1966 मध्ये नागालँड, 1970 मध्ये पुणे, 1972 मध्ये हैदराबादमधील लंगर हाऊसमध्ये ते कार्यरत होते. 1971 साली पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धाचेही ते साक्षीदार आहेत. त्यावेळी राजस्थानच्या मुनाबा बाडमेर सेक्टरमधील तुकडीत ते होते. पाकिस्तानी सैन्याचा पाडाव करीत भारताचे सैन्य पाकिस्तानच्या हद्दीत 75 किमी आतपर्यंत जाऊन पोहोचले होते. 4 डिसेंबर 1971 ला सुरू झालेले हे युद्ध अखेर 18 डिसेंबरला संपले. 1975 मध्ये देऊलकर यांनी काश्मीर खोऱयातील रजोरी भागात कर्तव्य बजावले. 1978 पर्यंत त्यांनी सैनिक म्हणून देशसेवा केली. या दरम्यान शिपाई आणि शिक्षण कमांडर नाईक पदावर ते कार्यरत राहिले. 1979 साली जेव्हा आणीबाणीचा काळ निर्माण झाला, तेव्हा त्यांना पाचारण करण्यात आले होते. तेव्हा पुन्हा ते देशसेवेत सहभागी झाले होते.

   संदेसे आते है…

डिसेंबर 1965 मध्ये देऊलकर जखमी झाले. त्यातून पूर्णत: बरे झाल्यानंतर 1966 रोजी त्यांचा विवाह झाला. दोन मुलगे, चार मुली असा त्यांचा परिवार आहे. पत्नी अनुसया या मूळच्या धामापूर गावच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडीलसुद्धा स्वातंत्र्यसैनिक होते. लग्नानंतर ‘बॉर्डर’ चित्रपटातील ‘संदेसे आते है…’ प्रमाणे पत्र हेच दोघांच्या संवादाचे प्रमुख माध्यम होते.

देवली गावाला शौर्याची परंपरा

देऊलकर सांगतात, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर गीतातून मला नेहमीच वेगळी प्रेरणा मिळत असे. आपल्याप्रमाणे देवली गावात अजून सात ते आठजणांनी भारतीय सैन्यात योगदान दिलेले आहे. दशरथ भिसाजी देऊलकर, बाबुराव धर्माजी देऊलकर, पांडुरंग जायबा देऊलकर, सहदेव हरी देऊलकर, रामा लक्ष्मण देऊलकर, दाजी सखाराम देऊलकर, विठोबा गोपाळ देऊलकर ही यापैकी काही नावे. स्वातंत्र्यसैनिक म्हणूनसुद्धा देवलीतील अनेकांनी लढा दिलेला आहे.

Related Stories

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट

NIKHIL_N

कोकणात औषधी वनस्पती प्रकल्पासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका

Patil_p

स्वीडनने स्वीकारली ‘नवी वाट’

NIKHIL_N

जनशताब्दी आता ‘सीएसएमटी’वरून धावणार

NIKHIL_N

‘इडा पिडा टळो…बळीचे राज्य येवो’ आळवणीने देवदिपावलीचा जागर

Abhijeet Shinde

आता खासगी वाहनांसाठी एसटीचे पेट्रोल पंप

NIKHIL_N
error: Content is protected !!