21 ते 26 फेब्रुवारी हा काळ जगभरात ‘अभियंता सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. 1951 सालापासून अमेरिकेतील ‘नॅशनल सोसायटी ऑफ प्रोफेशनल इंजिनियर्स’ नावाच्या व्यावसायिक अभियंत्यांच्या संस्थेने हा आठवडा भावी अभियांत्रिकी कार्यबल सुनिश्चित करण्यासाठी, या व्यवसायाविषयीची आवड निर्मिती करण्यासाठी व कार्यनि÷ असे सुशिक्षित अभियंते निर्माण करण्यासाठी सुरु केला होता. भारतातील सध्याच्या अभियांत्रिकी शिक्षणातील अडचणी दूर करून देशातील अभियांत्रिकी शिक्षणात आमूलाग्र बदल करवून येणाऱया काळात सुसंगत असे मॉडेल निर्मिती करण्यासाठी अभियंता सप्ताहासारखा दुसरा मुहूर्त नसावा. यावषी अभियंता सप्ताहाचा मुख्य विषय ‘उद्याचे विचार विश्व’. आपल्या देशातील अभियांत्रिकी शिक्षणासमोरील आव्हाने ओळखून नव्या परिस्थितीबद्दल वास्तववादी मूल्यांकन करून आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या समर्थनासाठी या सप्ताह उत्सवाने आपल्याला उत्तेजन द्यावे, ही अपेक्षा आहे.
अभियंता सप्ताहाच्या पूर्वसंध्येदरम्यान देशभरातील वृत्तपत्रांतून गेल्या वषीप्रमाणेच यावषीही अभियांत्रिकी शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यात मागणी-पुरवठा जुळला नसल्याची बातमी प्रसिद्ध झाली. सन 2020-21 मध्ये महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात 55,444 (44…) जागा प्रवेश प्रक्रियेच्या शेवटी रिक्त राहिल्या. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत तरी विद्यमान वर्षातील परिस्थिती बरीच होती, असे म्हणावे लागेल. त्या आधीच्या वर्षात या राज्यातील 1.28 लक्ष जागांपैकी 62,086 (49…) जागा भरल्याच गेल्या नव्हत्या. विद्यमान वर्षात अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण मंडळाने नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना उघडण्यासाठी परवानगी दिली नव्हती तर त्याउलट एका वर्षभरात राज्यातील एकूण तब्बल 5 हजार जागा भरणाऱया कित्येक अभियांत्रिकी शिक्षण संस्थांनी आपला गाशा गुंडाळला. वैद्यकीय शिक्षणानंतर आपल्या देशातील पालकांचा कल आपल्या पाल्यांनी अभियंता व्हावे याकडे आहे. म्हणूनच की काय आज देशभरातील दहापैकी सहा विद्यार्थी शाळेतून उत्तीर्ण होताना अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी घेऊन बारावीच्या परीक्षेला सामोरे जातात. ही उच्च मागणी पूर्ण करण्यासाठी आपला देश जगभरातील सर्वात मोठी तांत्रिकी शिक्षण प्रणाली चालवितो. आज देशभरातील आयआयटी संस्थांमधील 15 हजार अभियांत्रिकी जागांच्या तुलनेत देशभरातील अनुदानित व विना अनुदानित-खासगी महाविद्यालयांमध्ये तब्बल 15 लाख विद्यार्थी शिक्षणासाठी दरवषी दाखल होतात. अनुदानित व सरकारी महाविद्यालयांची कमतरता भरून काढण्यासाठी गेल्या दशकात देशातील प्रत्येक जिल्हय़ा-जिल्हय़ांमधून खासगी अभियांत्रिकी शिक्षण संस्थांचे पेव फुटले, तसा शिक्षणाचा दर्जाही घसरत गेला. कमी शुल्कात उच्च दर्जा उपलब्ध करून देणाऱया उच्च संस्थांमधील प्रवेश म्हणूनच उत्तरोत्तर स्पर्धात्मक होत आहे.
खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची लाट देशात आल्यानंतर देणगी शुल्कांचा आकडा लाखोंच्या घरात गेला. आर्थिक मोहापायी मग सोम्यागोम्या संस्था या क्षेत्रात उतरल्या व अशा सुमार संस्थांमुळे गुणवत्तेची समस्या निर्माण झाली. हल्लीच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार देशात दरवषी निर्माण होणाऱया 15 लाख अभियंत्यांपैकी सुमारे 13 लाख अभियंत्यांना बेरोजगारीचा प्रश्न सतावतो. पदवीधर अभियंते पण प्रशिक्षण नाही, कौशल्य नाही, नोकरी नाही. अशा परिस्थितीत या एकंदरीत व्यवसायाला दुष्टचक्र लागले आहे.
वास्तविक अभियांत्रिकी व्यवसाय जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाला आकार देणारा, जगणे सुसहय़ करणारा, भविष्याला अनुसरून निराकरणे व नाविन्यपूर्ण उपक्रम-सेवा प्रदान करणारा ठरावा. थोडक्मयात आपल्या देशातील अभियांत्रिकी शिक्षण प्रणालीतील गुणात्मक व परिणामात्मक अंतर लक्षात घेऊन संपूर्ण तांत्रिकी शिक्षण सुधार केल्याशिवाय आपल्यासमोर पर्यायच उरला नाही. बदलत्या काळाबरोबर आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाची स्थिती विकसित होणे अपेक्षित ठरते. नवे विषय, नवे अध्यापन तंत्र, शिकवलेल्या सिद्धांतांबरोबरच व्यावहारिक घटकांची जाण व उद्योजकतेला प्रोत्साहित करणाऱया अभियांत्रिकी शिक्षणप्रणालीची आपल्याला गरज आहे. भारतातील अभियांत्रिकी शिक्षणास गुणात्मकरित्या कसे सक्षम करता येईल. जागतिक अनुभवातून आपल्याला काय शिकता येईल व भविष्यातील ‘उद्या’साठी नव्याने तयारी अभियंता सप्ताहानिमित्ताने करता येईल. आपल्या अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीतील सर्वात मोठा दुर्गुण आपल्या अभियंत्यांकडे वैचारिक स्पष्टता नसणे व शिकवलेल्या सिद्धांताशी संबंधित अनुभूती देण्याऐवजी घोकंपट्टीवर भर देणे. सामर्थ्यवान अभियंते बनण्यासाठी शालेय शिक्षणापासूनच सुरुवात व्हायला हवी, हा विचार आपण विसरतो. यासाठी शालेय चाचण्या स्पर्धात्मक चाचण्यांच्या धर्तीवर घेतल्या जाव्यात. स्पर्धात्मक चाचण्यांमध्ये वेग, विचार व उद्दिष्ट आधारित शिक्षणाची परीक्षा घेण्यात येते, स्मृतीची नाही. केंद्रीत तयारी, विचार प्रवृत्त होण्याचा सराव, वेळेचे काटेकोर व्यवस्थापन व ज्ञानाचा कस लावणाऱया चाचण्या शालेय जीवनापासून सुरू व्हाव्यात.
वर्गात मूलभूत संकल्पना समजून घेणे, साध्या युक्त्या व शॉर्टकट तंत्राचा वापर करून संकल्पना लागू करण्याचा सराव करणे, समस्येचे निराकरण करण्याचे कौशल्य आत्मसात करणे व विश्लेषणात्मक मानसिकता तयार करण्यावर अभियांत्रिकी शिक्षणात भर दिला जावा. विज्ञान, तर्क, गणित या बरोबरीनेच सुसंवाद कौशल्य, निर्णय घेण्याची क्षमता, सर्जनशील दृष्टिकोन व संघ भावना अमलात आणण्यासाठी शिक्षण पद्धतीत सुधार व्हावा. गेली कित्येक दशके भारतातील अभियांत्रिकी विद्या शाखा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स अशा पारंपरिक विषयांमध्येच विभागल्या गेल्या असून त्यात बदल झालेला नाही. ज्ञानाचे बहुशाखेच्या दृष्टिकोनांसह सर्वसमावेशी व साक्षेपी विभागात पुन्हा रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आपल्या तंत्रशिक्षण संस्थांनी समाजातील नागरिक संस्था, संशोधन संस्था, सरकारी संस्था इत्यादींबरोबर भागीदारीसाठी प्रयत्न करावा. अभियांत्रिकी शिक्षण आजच्या सामाजिक-सांस्कृतिक मानदंडांच्या अनुषंगाने व आर्थिक-पर्यावरणीयदृष्टय़ा मानवकेंद्रीत आहेत, याची खात्री करण्यासाठी शिक्षण संस्थांनी पर्यावरणतज्ञ, अर्थतज्ञ, उद्योगपती, समाजशास्त्रज्ञ, कृषीतज्ञ व धोरणकर्त्यांशी सुसंवाद साधावा. नव्या युगाचे अभियंते जर नाविन्यपूर्ण मार्गाने सामाजिक व तांत्रिक आव्हाने सोडविण्यास सक्षम झाले नसल्यास ते रोजगारक्षम ठरूच शकणार नाहीत, हे लक्षात असावे. कोविडनंतरच्या काळात जगभरातून अभियंत्यांची मागणी पुन्हा जोर धरेल. भविष्यकाळात डिजिटल परिवर्तनाची गती वाढविण्यावर जगाचा कल असेल. जास्तीत जास्त सिद्धांतांचा व्यावहारिक उपयोग, रोजगार कुशलता व व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज भासेल.
अभियंता आठवडा उत्साहाने साजरा करतानाच आपण देशातील अभियांत्रिकी शिक्षणाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रोत्साहन व पाठिंबा देण्याचा संकल्प करूया. ‘उद्याच्या’ दिशेने जाताना उद्याची जटिल आव्हाने समजून घेऊन ती सोडविण्यासाठी सक्षम असे अभियांत्रिकी कार्यबल आपल्याला हवे आहे. अभियंता सप्ताहाच्या विद्यमान व होतकरू अभियंत्यांना शुभेच्छा!
डॉ. मनस्वी कामत