तरुण भारत

अक्षम्य ढिलाईचे शिकार

वाढती रुग्ण संख्या, दुसऱया लाटेची अफवा आणि बदलत्या स्ट्रेनची शक्याशक्यता या सर्वातून मेटाकुटीस आलेले सामान्यांचे  दैनंदिन जीवन. या सर्व गोंधळाला सरकारी पातळीवरील तसेच सर्वसामान्यांनी हलक्यात घेतलेली कोरोना बाबतची अक्षम्य ढिलाई कारणीभूत आहे.

सध्या मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीने वाढत आहेत. रविवारची दैनंदिन कोरोना नोंद राज्यात 6,971 तर मुंबईत 921 इतकी होती. ही संख्या दुसऱया उद्रेकाची भीती घालत आहे. अशी आकडेवारी मध्यंतराच्या काळात कोरोना प्रतिबंधाचे नियम  सामान्यांनी मोडले असल्याचे सांगत आहे. तर सरकारी यंत्रणा देखील चाकोरीबाहेर न जाता निव्वळ कार्यालयीन सोपस्कार करत होते का असा सवाल ही आकडेवारी उपस्थित करत आहे. याचा अर्थ दोन्ही पातळीवर ढिलाई वावरत असल्याचे निष्पन्न होत आहे.

मुंबईत चारशेवर आलेली रुग्ण संख्या पुन्हा हजाराच्या संख्येकडे झेपावत आहे. ही दुपटीने वाढणारी संख्या एका दिवसात आली नाही. मधल्या काळात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे वाटत असतानाच अचानक वाढू लागला. मुळात कोरोना संपलेला नाही हेच सगळे विसरून गेले. कित्येकांना कोरोना पूर्वीचे जीवन आणि कोरोना नंतरचे जीवन आजही सारखे वाटत आहे. मात्र जीवनातील बदल आणि महामारीने होणारे परिणाम याचा गंभीर विचार करण्याची वेळ सध्या येऊन ठेपली आहे. ही ढिलाई सर्वसामान्य आणि सरकारी अशा दोन्ही पातळीवर स्पष्ट जाणवत होती. रुग्ण वाढ होत असताना देखील राज्यात तसेच  मुंबईतही काँटॅक्ट ट्रेसिंगला फाटा देण्यात आला. कोरोना चाचण्या करण्यास पुढे येत नसल्याने कोण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह याचीही ओळख करणे याच कालावधीत थांबले. रुग्णसंख्या ओसरली, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग थांबले तर चाचण्यांचे प्रमाण कमी झाले.

या सर्वाचा परिणाम आजच्या रुग्णवाढीत दिसून येत आहे. सरकारी यंत्रणाच सैल झाल्याने आधीच बेफिकीर असलेले सामान्यजन मोकाट झाले. नाका-तोंडावरून हनुवटीवर आलेला मास्क याच बेफिकिरीमुळे गायब झाला. सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजले. लोकल सुरु झाल्याने नियम तोडून विनाकारण फिरणाऱयांची संख्या वाढली. या सर्वांवर कोणाची जरब राहिली नाही. मुळात लोकल सुरु झाल्याने रुग्ण संख्या वाढली हे अर्धसत्य असून सर्वांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे आणि सॅनिटायझर वापरणे हे कोरोना प्रतिबंधाचे प्राथमिक नियम पायदळी तुडवल्याने रुग्णसंख्या वाढली. लोकल सुरु होण्यासोबत आंतरराष्ट्रीय, आंतरराज्यीय तसेच जिल्हांतर्गत प्रवासीदेखील याच काळात वाढले. अर्थचक्रासाठी सरकारने शिथिल केलेली टाळेबंदी आता पुन्हा कडक होईल असे चित्र निर्माण झाले आहे.  मुंबईतील रुग्ण संख्या गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातील रुग्ण संख्येसोबत स्पर्धा करेल अशी भीती असतानादेखील उपनगरातला माणूस ल नपत्रिकेला लागणारा कागद जर गिरगावातच जाऊन शोधण्याच्या हट्टाला पेटला तर कसे होणार? ताळे बंदी सैल झाली म्हणून काही जन ल नसोहळे, कौटुंबिक गाठीभेटी उरकताना दिसत आहेत. हे करत असताना कोणीही काळजी घेताना दिसून येत नाही. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग याचे प्राथमिक नियम तरी पाळतो का याचे भान उरले नाही.

 मागच्या जून महिन्यात हेच मास्क आणि सॅनिटायझर मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणेवर टीका होत होती. आता तर त्याच्या किंमतीवर सरकारने नियंत्रण आणले, तरीही त्याचा वापर जबाबदारीने होताना दिसून येत नाही. सरकारी यंत्रणेने नियम करावेत आणि ते पाळण्यास जबरदस्तीसुद्धा सरकारनेच करावी? सध्याची वाढती आकडेवारी बघितली तर चिंताही वाढते. मात्र सरकारी यंत्रणा रुग्णसंख्येतील फक्त टक्केवारी सांगणार. दोन दिवसांपूर्वी मुंबईत 400 रुग्ण होते आज 700 झाले म्हणजे 30 टक्क्यांनी रुग्ण वाढले. अशा टक्केवारीच्या भाषेत सरकारी कोरोना वृत्त सांगून त्यातील गंभीरता सामान्यांच्या अंगी येणार नाही. आरोग्य विभाग कोरोना चाचणी करण्यास सुचवते. मात्र चाचणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यास यंत्रणा कमी पडत आहे. चाचणी करणारे देखील एक्सरे काढणे किंवा पर्यायी तपासण्या करण्यावर भर देतात. मुख्य कोरोना चाचणी फार कमी प्रमाणात केली जात आहे.

असे होत असताना कोरोना प्रतिबंधात्मक लसदेखील आली. ही लस देण्याचे सरकारने ठरवले. यात प्राथमिकतेची वर्गवारी करून 16 जानेवारीपासून लसीकरणला सुरुवातही झाली. मात्र लसीकरणाचे काम धीम्या गतीने सुरु आहे. ज्याप्रमाणे गटांची प्राथमिकता ठरली त्याप्रमाणेच लसीकरणाचा टप्पा ठरवून पूर्ण करण्याचा कालावधी देखील ठरला. मात्र ठरवलेल्या लाभार्थी संख्येचा टप्पा गाठण्यास बराच कालावधी जाईल असे सध्याच्या लसीकरण मोहिमेतून दिसून येत आहे. सुरुवातीला कर्मचाऱयानीच लसीच्या उपयुक्ततेवर सांशकता घेऊन अडथळा निर्माण केला. तर आता जसे लाभार्थी वर्ग वाढवत असताना कोविन ऍपमधील गोंधळामुळे लसीकरणाचे संदेशच पोहचत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या राज्यातील विशेषतः मुंबईतील वाढती रुग्ण संख्या पाहून लसीकरणाचा वेग वाढण्याबाबत तज्ञच सांगत आहेत. याप्रमाणे संथ लसीकरण सुरु राहिल्यास सामान्यांपर्यंत लस कधी पोहचणार? वाढत्या रुग्णसंख्येला वेळेत पूर्ण होणारे लसीकरणदेखील एक उत्तर होऊ शकते. मात्र लसीकरणातदेखील ढिलाईचे चित्र दिसून येत आहे. सध्या बहुतांश उद्योग टप्प्याटप्प्याने आता सुरू होत असताना कोरोनासंदर्भात प्राथमिक काळजी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व चाचण्यामध्ये ढिलाई न करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे रुग्ण वाढ रोखली जाईल.

राम खांदारे

Related Stories

खादी आउटलेटमधून 1.2 कोटींची कमाई

Patil_p

सरकारकडून एसी आयातीवर निर्बंध

Patil_p

71 टक्के भारतीयांचा चिनी उत्पादनांवर बहिष्कार

Patil_p

स्टेट बँक लवकरच येस बँकेची हिस्सेदारी घेणार

tarunbharat

आयुष्याच्या तीन टप्प्यांवर करावयाची गुंतवणूक

Patil_p

सेन्सेक्सची प्रथमच 45,000 वर झेप

Patil_p
error: Content is protected !!