तरुण भारत

निर्दोष भजन

(अध्याय दुसरा)

भगवंतांच्या स्वरूपामध्ये दृष्टी तन्मय होऊन गेली म्हणजे भक्ताच्या हृदयात सर्वांबद्दल समबुद्धी निर्माण होते. अशा स्थितीचे नाव परमसमाधी होय! मी देह आहे ही भावना नष्ट झाली की सर्व प्रकारचा अहंकार नाहीसा होतो. ती निर्दोष परमसमाधी होय.

चोखा बैसला निवांत, विठ्ल नाम उच्चारीत असे या अवस्थेचे वर्णन चोखोबराय करतात. जेव्हा भगवंत भक्तांचे व्यवहार पार पाडतो, त्यांना नेमून दिलेली कामे करतो, तेव्हा भगवंत त्यांचा अंकित झालेला असतो व त्यांनी भक्तांची केलेली कामे ही परब्रह्म होत असतात. हेच ‘निर्दोष भजन’ होय. असे निर्दोष भजन घडायला लागले की भक्त जे करेल तेच महापूजन, तो बोलेल तेच भगवंतांचे महास्तवन, त्याची कर्मे नारायणरूप होत असतात. असे म्हणतात इथे भक्ताचे आणि नारायणाचे मन एकच झालेले असते. हाच शुद्ध भागवतधर्म होय. याचे आचरण करणाऱया भक्ताला कसलेही भय नसते आणि कसे असेल?

स्वतः भगवंत पाठीमागे सुद्धा नाही तर बरोबरीने चालत आहेत. आणखी काय पाहिजे? पण असे भाग्यवंत अत्यंत विरळ! बाकीच्यांच्या वाटय़ाला सदोदित कसली ना कसली तरी भीती वाटणे येत असते, कारण जे काय घडत आहे ते मी करतो असे वाटत असते, मग केले आहे ते बरोबर का चूक, ही खात्री नसते. त्यामुळे भीती वाटू लागते आणि नैराश्याने ग्रासलेला माणूस दुःखी होतो.

आता यावर उपाय काय, तर भगवत भजन हाच एकमेव उपाय यावर आहे. आता भीती नष्ट करण्यासाठी भगवत भजनाचा काय उपयोग असे काही महाभाग विचारतील. तर त्यावर उत्तर असे की, ज्यांची भीती नष्ट झालेली आहे त्यांची जबाबदारी भगवंतांनी घेतलेली आहे आणि जो आपला आप्त असतो तोच आपली जबाबदारी घेतो त्यामुळे आपण आणि भगवंत वेगळे आहोत असे समजणे हेच भयाचे कारण आहे. त्यामुळे कितीही विद्वान असला तरी जोपर्यंत तो माझी भक्ती करत नाही, तोपर्यंत तो भयमुक्त होत नाही. जन्म मरणाच्या भयाने नाना प्रकारच्या दुःखाच्या राशी लोक सोशीत असतात. फक्त हरिभक्तांचा त्याला अपवाद असतो. भक्तीचा महिमा खरोखर अगाध आहे. त्यासाठी सद्गुरुचरणांची सेवा मनोभावे करावी. सद्गुरु सर्वथा परमात्मा व तत्वतः परब्रह्म असतात. सद्गुरुंची भेट व्हायला सद्भाग्य असावे लागते. ‘निष्काम पुण्याचा अति मोठा संचय, तीव्र वैराग्याची जोड  आणि योग्य काय, अयोग्य काय याचा विचार करून वागण्याची आवड इतक्मया गोष्टी एकत्र येतात तेव्हा सद्गुरुंची कृपा प्राप्त होते.

यावरून सद्गुरुचा महिमा ध्यानी येतो. आईवडील एकाच जन्मी तुमची काळजी घेतात तर सद्गुरु जन्मोजन्मी तुमची काळजी घेतात. तुमचा गर्भवास चुकवतात. म्हणून गुरु हा सर्वतोपरी पूज्य असतो. देवही सद्गुरुंच्या तुलनेस पुरत नाहीत. गुरुंना ब्रह्म समजून अनन्यभावाने जे बुद्धिमान भक्त सद्गुरुचरणांची सेवा करतात ते जनार्दनाचे आवडते होतात.

क्रमशः

Related Stories

मन उलगडताना…

Patil_p

विरोध जिवंत आहे!

Patil_p

भित्यापाठी ब्रह्मराक्षस…!

Patil_p

गेल्या शतकातला चीन

Patil_p

निरर्थक गदारोळ

Patil_p

कोरोना महामारी आणि तरुण पिढी

Patil_p
error: Content is protected !!