तरुण भारत

पुनरपि जननं

आमच्या घराजवळ ‘अपोलो’ नावाचे चित्रपटगृह होते, सध्या सुरू नाही, नंतर कदाचित होईलही. अपोलोने काळाचे अनेक खेळ पाहिले आहेत. आम्ही शाळेत असताना तिथले दर मजेदार होते. पाच आणे, बारा आणे, सव्वा रुपया वगैरे! चित्रपटगृहाचा अंतर्भाग रुबाबदार होता. समोर मखमली पडदा. चित्रपट सुरू होण्याआधी तो पडदा बाजूला होई. आतल्या शुभ्र पडद्यावर आधी आगामी चित्रपटांच्या, आसपासच्या भागातील दुकानांच्या जाहिराती, नंतर ‘इंडियन न्यूज’ दाखवली जाई. या इंडियन न्यूजच्या शेवटी क्रीडाविषयक वार्तापत्र असे. त्याचे विशिष्ट संगीत वाजू लागले की ‘आता चित्रपट सुरू होणार’ म्हणून प्रेक्षक सरसावून बसत. मग सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र… त्यावरचा ‘रिळांचा आकडा’ प्रेक्षक कोरसमध्ये पुटपुटत. बहुतांश प्रमाणपत्रांखाली अपर्णा मोहिले अशी देवनागरीत सही बघितलेली आठवते.

‘अपोलो’च्या आवारात खारे दाणे-फुटाणे आणि पाणीपुरी विकणाऱया दोन गाडय़ा होत्या. रविवारच्या दुपारी एक आणा देऊन खारे दाणे-फुटाणे घ्यायचे आणि ते खात खात शोकेसमध्ये लावलेली पोस्टर्स न्याहाळायची हा आमचा आवडता छंद होता. आम्ही दहावीत असताना ‘समाज को बदल डालो’ नावाचा चित्रपट आला. त्यात कम्युनिस्टांचा प्रचार आहे असा आक्षेप घेऊन लोकांनी बंद पाडला होता. 

‘शाळेत असताना केव्हा तरी आमचे शालेय जीवन संपता संपता राज कपूरचा ‘तीसरी कसम’ चित्रपट आला. ‘अपोलो’मधला तो शेवटचा चित्रपट, त्याचा शेवटचा म्हणजे रात्री नऊचा खेळ बघायला आम्ही भावंडे गेलो होतो. बारा वाजता बाहेर पडलो तेव्हा चित्रपटाची पोस्टर्स उतरवली जात होती आणि आवारात मोठे ट्रक उभे होते. चित्रपटगृह पाडण्याची तयारी चालू होती. काळजात कसेसेच झाले.

काही वर्षांनी ‘अपोलो’चा पुनर्जन्म झाला. शशी कपूरच्या एका सिनेमाने उद्घाटन झाले. नंतर आम्ही तिथे अनेक चित्रपट पाहून महाविद्यालयीन जीवन सार्थ केले. चित्रपट बघताना प्राण, मदन पुरी वगैरे खलनायकांच्या कारवायांपासून नायकाला सावध करणे, नायकाने खलनायकाला मारल्यावर आनंदाने ओरडणे वगैरे सर्व बालीश प्रकार केले. एका चित्रपटात तर धर्मेंद्र खलनायक होता आणि त्याला राजेंद्रकुमारने यथेच्छ बदडले होते!

काळाच्या ओघात एक-पडदा चित्रपटगृहे ओस पडत गेली. कोरोनाच्या साथीने त्यावर शेवटचा घाव घातला. ‘अपोलो’ची वास्तू अजून शाबूत आहे. केव्हा तरी चमत्कार होवो आणि त्या वास्तूत प्राण फुंकले जावोत.

Related Stories

बेळगावचा ‘गोडवा’ जपण्यासाठी मुख्यमंत्र्यांची साखरपेरणी

Patil_p

काँग्रेस ऍक्शनमध्ये

Patil_p

स्मरण स्वातंत्र्यशलाकांचे

Patil_p

कोरोनावरील उपचार अन् औषधे

Patil_p

2020: वर्ष काळोखाचे

Patil_p

बेटी बचाओ, बेटी पढाओ…

Patil_p
error: Content is protected !!