तरुण भारत

पुदुच्चेरीचे काँग्रेस सरकार पराभूत

विश्वासदर्शक प्रस्ताव संमत करण्यात अपयश – मुख्यमंत्री व्ही. नारायणसामींचा राजीनामा

पुदुच्चेरी / वृत्तसंस्था

दक्षिण भारतात असणाऱया पुदुच्चेरी या छोटय़ा केंद्रशासित प्रदेशातील काँगेस सरकार कोसळले आहे. 30 सदस्यसंख्या असणाऱया या प्रदेशाच्या विधानसभेतील सत्ताधाऱयांच्या सहा आमदारांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये त्यागपत्रे सादर केल्याने त्या सरकारवर ही वेळ आली. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपालांकडे त्यागपत्र सोपविले आहे. आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

येत्या एप्रिल-मेमध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळसह या केंद्रशासित प्रदेशातही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधीच काही काळ काँग्रेसला हा धक्का बसला. नारायणसामी यांनी याचे खापर केंद्रीय भाजपवर फोडले. भाजपने लोकशाहीची हत्या चालविली असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यागपत्रांची मालिकाच…

गेल्या पंधरा दिवसांमध्ये सत्ताधारी काँगेसच्या आमदारांनी त्यागपत्रे देण्याची मालिकाच सुरू केली होती. दोन मंत्र्यांचाही त्यात समावेश होता. तीन दिवसांपूर्वी दोन आमदारांनी पदत्याग केल्यानंतर सरकार अल्पमतात आले. प्रभारी नायब राज्यपाल तामिळीसाई सुंदरराजन यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमतसिद्धतेसाठी सोमवार पर्यंतचा कालावधी दिला होता. सोमवारी सकाळी 10 वाजता विधानसभेच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. मात्र, विश्वासमतावर मतदान होण्यापूर्वीच मुख्यमंत्री आणि काही काँगेस सदस्यांनी सभात्याग केला. नंतर सभापती व्ही. पी. शिवकोझुंदू यांनी सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे घोषित केले.

मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीका

विश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री नारायणसामी यांनी भाजपला धारेवर धरले. आपले सरकार पाडविण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व कामाला लागले होते. आपल्या आमदारांना पद्धतशीरपणे गळाला लावण्यात आले. तथापि, प्रदेशातील जनता काँग्रेसच्या बाजूची असून योग्य वेळी ती भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.

काँगेसचे 5, द्रमुकचा 1

आतापर्यंत सत्ताधीश असणाऱया काँग्रेसचे 5 आमदार आणि या पक्षाला समर्थन दिलेल्या द्रमुक पक्षाचा 1 आमदार यांनी पदत्याग केला. या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेत 30 जागा आहेत. त्यापैकी 18 जागा सत्ताधारी युतीकडे होत्या. त्यातील सहा आमदारांनी पद सोडल्याने सत्ताधारी युतीकडे केवळ 12 जागा उरल्या. त्या बहुमतासाठी अपुऱया ठरल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र दिले.

भाजपची सत्तास्थापना नाही

काँगेस सरकार कोसळले असले तरी सध्याच्या परिस्थितीत भाजप सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नाही, असे पक्षाच्या नेतृत्वाने स्पष्ट केले. लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे लोकांचा कौल मिळाल्यानंतरच सरकार  स्थापनेचा विचार करता येईल, अशी भूमिका भाजपने घेतल्याने आता येथे राष्ट्रपती राजवटीशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही, असे जाणकारांचे मत आहे.

Related Stories

कोरोना मृतांच्या आकडय़ात घट

Patil_p

कोरोनाची भीती, 50 डॉक्टरांचा राजीनामा

Patil_p

पाकिस्तानला १० दिवसांत हरवू शकतो : मोदी

prashant_c

पर्युषण काळात मुंबईतील तीन जैन मंदिरे उघडणार

Patil_p

LOC वर भारतीय जवानांनी पाडले पाकिस्तानी क्वाडकॉप्टर

datta jadhav

तिन्ही दलांमध्ये समनव्य ठेवण्याची जबाबदारी : बिपिन रावत

prashant_c
error: Content is protected !!