‘ग्लोबल लिडर’ असे संबोधत लसीकरण मोहिमेची वाहव्वा – अनेक देशांना केलेल्या मदतीबाबतही शाब्बासकी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याबरोबरच इतर देशांना लसींचा पुरवठा केल्यामुळे संयुक्त राष्ट्राने भारताचे कौतुक केले आहे. संयुक्त राष्ट्राने ‘ग्लोबल लिडर’ असे संबोधल्याने भारताने समाधान व्यक्त केले आहे. जगभरात लसी पुरवणाऱया भारताचे आम्ही आभार मानतो, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. केंद्रातील मोदी सरकारने कोरोना लसींसंदर्भात जागतिक स्तरावर मदत करण्यासाठी आम्ही कायमच तयार असल्याचे सांगत आतापर्यंत भारताने 50 हून अधिक देशांना कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य कर्मचाऱयांसोबतच इतर देशांना कोरोना लसींचे लाखो डोस पुरवणाऱया भारताचे संयुक्त राष्ट्रांनी कौतुक केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदुतांसाठी लसपुरवठा करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. संयुक्त राष्ट्राने भारताच्या या निर्णयाचे स्वागत केले असून कोरोनाविरुद्धच्या लढय़ामध्ये भारत हा जागतिक स्तरावर नेतृत्व करत असल्याचे सांगत भारताला ग्लोबल लिडर असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेस यांनी म्हटले आहे. गुटेस यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचेही आभार मानले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या सचिव असणाऱया टी. एस. तिरुमूर्ती यांनीही केला आहे.