तरुण भारत

यजमान न्यूझीलंडची विजयी सलामी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 53 धावांनी एकतर्फी विजय, डेव्हॉन कॉनवे नाबाद 99

ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था

Advertisements

डेव्हॉन कॉनवेने अवघ्या 59 चेंडूत नाबाद 99 धावांची आतषबाजी केल्यानंतर पहिल्या टी-20 सामन्यात यजमान न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया संघावर 53 धावांनी सहज मात केली आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 184 धावा केल्या तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 17.3 षटकात सर्वबाद 131 धावांवरच आटोपते घ्यावे लागले. डेव्हॉन अर्थातच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

दक्षिण आफ्रिकेतील जन्म असलेल्या डेव्हॉन कॉनवेची यापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 65 इतकी होती. ती त्याने मागे टाकली. वास्तविक, तो फलंदाजीला उतरला, त्यावेळी न्यूझीलंडची 2 बाद 11 अशी दैना उडाली होती. मात्र, त्याने लवकरच जम बसवला आणि अखेरपर्यंत तो नाबाद राहिला. न्यूझीलंडने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडने आपल्या डावात शेवटच्या षटकाला सुरुवात केली, त्यावेळी कॉनवे 87 धावांवर नाबाद होता. येथे त्याने एकेरी धाव घेतल्यानंतर पुढे स्ट्राईक मिळाल्यानंतर 1 चौकार व 1 षटकार वसूल केला. डावातील व षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना तो 98 धावांवर होता. मात्र, येथे शेवटच्या चेंडूवर तो एकच धाव घेऊ शकला आणि कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या शतकापासून त्याला  अवघ्या एका धावेने वंचित रहावे लागले. 

न्यूझीलंडची आघाडीला पडझड

कॉनवे क्रीझवर येण्यापूर्वी मात्र न्यूझीलंडच्या आघाडीवीरांना ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज डॅनिएल सॅम्स, झाय रिचर्डसन व केन रिचर्डसन यांनी सातत्याने झगडत ठेवले. सॅम्सने पहिल्या षटकातील तिसऱयाच चेंडूवर प्रतिस्पर्धी सलामीवीर मार्टिन गप्टीलला बाद केले आणि त्यानंतर कर्णधार केन रिचर्डसनला (12) देखील तंबूचा रस्ता दाखवला. झाय रिचर्डसनने टीम सेफर्डचा त्रिफळा उडवल्यानंतर न्यूझीलंडची 3 बाद 19 अशी मोठी पडझड झाली होती.

त्यानंतर क्रीझवर कॉनवेने प्रारंभी जम बसवण्यावर भर दिला आणि त्यानंतर फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने ग्लेन फिलीप्ससमवेत (30) चौथ्या गडय़ासाठी 74 तर जिम्मी नीशमसमवेत (26) पाचव्या गडय़ासाठी 47 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. पुढे मिशेल सॅन्टनरसह त्याने 44 धावा जोडल्या, त्यावेळी यात सॅन्टनरचा वाटा अवघ्या 7 धावांचा होता. ऑस्ट्रेलियातर्फे डॅनिएल सॅम्स व झाय रिचर्डसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाचीही खराब सुरुवात

विजयासाठी 185 धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाची देखील खराब सुरुवात झाली. पहिल्याच षटकात कर्णधार ऍरॉन फिंच व जोश फिलीप बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाची 2 बाद 8 अशी दाणादाण उडाली. विशेष म्हणजे या उभयतांचेही झेल 99 धावा जमवणाऱया कॉनवेने टिपले. न्यूझीलंडची नव्या चेंडूवरील जोडी टीम साऊदी व ट्रेंट बोल्ट यांनी हॅग्ले ओव्हलवरील या सामन्यात फ्लडलाईट्सवर स्विंग करण्यात कमालीचे यश प्राप्त केले. मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची 3 बाद 16 अशी आणखी बिकट स्थिती झाली. मॅक्सवेलला नीशमने बाद केले, त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ 4 बाद 19 असा आणखी अडचणीत सापडला.

फलंदाजीत बढतीवर आलेल्या मिश मार्श व स्टोईनिस यांनी थोडाफार प्रतिकार केला. मात्र, ही जोडी फुटली आणि ऑस्ट्रेलियाची 5 बाद 56 अशी आणखी दैना उडाली. न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोधीने पुढे मार्श (45), स्टोईनिस (8), ऍस्टॉन ऍगर (23) व सॅम्स (1) यांना बाद करत सामन्यात 28 धावात 4 बळी असे पृथक्करण नोंदवले. यापैकी ऍगर व सॅम्स केवळ दोन चेंडूंच्या अंतरात बाद झाले.

ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क दक्षिण आफ्रिका दौऱयावर असतील, असे गृहित धरत त्यांना या मालिकेतून विश्रांती दिली. पण, हा दौराच आता रद्द झाला आहे.

सलग पाच अर्धशतके नोंदवणारा कॉनवे न्यूझीलंडचा पहिला फलंदाज

न्यूझीलंडतर्फे टी-20 मध्ये सलग पाच अर्धशतके नोंदवणारा पहिला फलंदाज होण्याचा मान नाबाद 99 धावा फटकावणाऱया कॉनवेने मिळविला. त्याने याआधी झालेल्या मागील चार टी-20 लढतीत नाबाद 93, नाबाद 91, 69 व 50 धावा जमविल्या होत्या. भारताचा माजी फलंदाज सेहवाग, पाकचा कामरान अकमल, झिम्बाब्वेचा हॅमिल्टन मासाकादझा, इंग्लंडचा जोस बटलर, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर या अन्य देशातील फलंदाजांनीही हा पराक्रम केला आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड ः 20 षटकात 5 बाद 184 ः डेव्हॉन कॉनवे 59 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारासह नाबाद 99, ग्लेन फिलीप्स 34 चेंडूत 3 षटकारांसह 30, जेम्स नीशम 15 चेंडूत 3 चौकारांसह 26, केन विल्यम्सन 12. अवांतर 9. डॅनिएल सॅम्स 2-40, झाय रिचर्डसन 2-31, स्टोईनिस 1-17).

ऑस्ट्रेलिया ः 17.3 षटकात सर्वबाद 131 ः मिशेल मार्श 33 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 45, मॅथ्यू वेड 12 चेंडूत 1 षटकारासह 12, ऍडम झाम्पा 8 चेंडूत नाबाद 13. अवांतर 9. ईश सोधी 4-28, टीम साऊदी 2-10, ट्रेंट बोल्ट 2-22, जेमिसन-सॅन्टनर प्रत्येकी 1 बळी).

Related Stories

वांद्रे प्रकरण : हरभजन सिंग म्हणाला…

prashant_c

झगडणाऱ्या पंजाब किंग्ससमोर आज मुंबई इंडियन्सचे आव्हान

Amit Kulkarni

अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटला रजा

datta jadhav

विराटची आरसीबी कर्णधारपदावरुन हकालपट्टी करा! – गौतम गंभीर

Patil_p

इंग्लिश क्रिकेट हंगाम जुलैपर्यंत स्थगित

Patil_p

इस्ट बंगाल प्रशिक्षकाचा राजीनामा

Patil_p
error: Content is protected !!