प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या जय मल्हार हौसिंग सोसायटीपासून ते पीरवाडीपर्यंतच्या भागात कचरा गोळा करणाऱया घंटागाडीला सप्टेंबर महिन्यापासून बिलच मिळाले नाही. त्यामुळे कचरा गोळा करण्याचे काम त्या घंटागाडीने बंद केले आहे. पालिका कचरा उचलत असली तरीही घंटागाडी येत नसल्याने नागरिकांच्यासमोर कचऱयाची समस्या उभी आहे. आरोग्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शहराच्या पूर्व भागामध्ये पिरवाडीपासून ते जयमल्हार हौसिंग सोसायटीसह अनेक कॉलन्या आहेत. त्या कॉलन्या पूर्वी खेड ग्रामपंचायतीकडे होत्या. त्या भागातील कचरा गोळा करण्यासाठी खेड ग्रामपंचायतीची एक कचरा गाडी हे काम करत होती. सातारा पालिकेच्या हद्दीत हा भाग आल्यापासून घंटागाडी चालकास बिल मिळाले नाही, असे घंटागाडी चालकाचे म्हणणे आहे. त्यामुळे अलिकडेच्या काही दिवसांपासून घंटागाडीच त्या भागात फिरत नाही. घराघरात तसाच कचरा साठून राहतो. अनेक नागरिक जातायेता कचरा ओढय़ाच्या कडेला टाकतात. परंतु बील काढण्यात यावे, कचऱयाची समस्या सोडविण्यात यावी, यासाठी माजी सभापती मिलिंद कदम यांनी अनेकदा पालिकेत भेटी घेतल्या आहेत.