तरुण भारत

हैदराबादने एटीकेला बरोबरीसाठी झुंजविले

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

सामन्यातील 85 मिनिटे दहा खेळाडूंनिशी खेळणाऱया हैदराबाद एफसीने पहिल्या स्थानावरील एटीके मोहन बागानला 2-2 असे बरोबरीत रोखून प्रत्येकी एक गुण विभागून घेतला. आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील ही महत्वपूर्ण लढत वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आली.

हैदराबाद एफसीने दोन्ही वेळा आघाडीचे गोल नोंदविले. त्यांच्या आरिदाने सांताना आणि बदली खेळाडू रोलंड आल्बर्गने तर एटीके मोहन बागानसाठी मानवीर सिंग आणि प्रीतम कोटालने गोल नोंदविले. या निकालाने आता एटीके मोहन बागानचे अग्रस्थान कायम राहिले. त्यांचे आता 19 सामन्यांतून 12 विजय, 4 बरोबरी आणि 3 पराभवाने 40 गुण झाले आहेत. हैदराबाद एफसीचे 19 सामन्यांतून 6 विजय, 10 बरोबरी आणि 3 पराभवाने 28 गुण झाले व त्यांचे चौथे स्थान कायम राहिले. आता या निकालाने एफसी गोवा, हैदराबाद एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात प्ले-ऑफमधील तिसऱया आणि चौथ्या स्थानासाठी जबरदस्त चुरस अजुनही कायम आहे. एफसी गोवाचे 19 सामन्यांतून 30, हैदराबादचे 28 तर नॉर्थईस्टचे 18 सामन्यांतून 27 गुण झाले आहेत.

पहिल्या सत्रातील खेळावर उभय संघांचे समान वर्चस्व आढळून आले. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला हैदराबाद एफसीच्या चिंगलेनसाना सिंगला घिसाडघाईच्या खेळाबद्दल रेफ्रीने रेड कार्ड दाखविले व मैदानाबाहेर काढले. यामुळे उर्वरीत 85 मिनिटांचा खेळ हैदराबाद एफसीला दहा खेळाडूनिशी खेळावी लागला. त्यानंतर सामन्याच्या आठव्या मिनिटाला आरिदाने सांतानाने गोल करून हैदराबाद एफसीला आघाडीवर नेले. एटीकेचा बचावपटू प्रीतम कोटालने केलेल्या चुकीचा फायदा घेत आरिदानेने मारलेला फटका गोलात गेला. स्पर्धेत आरिदानेचा हा दहावा गोल होता. लगेच दोन मिनिटांनी हालीचरण नर्झारीने दिलेल्या पासवर लिस्टन कुलासोचा गोल करण्याचा यत्न एटीकेचा बचावपटू प्रीतम कोटालने उत्कृष्ट बचाव करून चेंडू बाहेर टाकला.

एटीके मोहन बागानचा 17 व्या मिनिटाला गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकला. यावेळी झेवियर हर्नांडिसच्या क्रॉसवर रॉय कृष्णाचा हेडर गोलमध्ये जाताना किंचित चुकला. हालीचरणचा गोल करण्याचा प्रयत्न एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यने अडविल्यानंतर लिस्टन कुलासोने मध्यंतराला तीन मिनिटे शिल्लक असताना गोल करण्याची नामी संधी गमविली. यावेळी त्याने आरिदाने याच्याकडून मिळालेल्या पासवर संदेश झिंगान आणि टिरी या एटीकेच्या दोन्ही बचावपटूंनी चकविले, मात्र मोकळा असलेल्या हालीचरणला पास न देता त्याने कमजोर फटका हाणला आणि चेंडू सरळ गोलरक्षक अरिंदमच्या हातात मारला.

दुसऱया सत्रात 57 व्या मिनिटाला डेव्हीड विलियम्सच्या पासवर मानवीर सिंगने हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणीला उजव्या बगलेतून फटका मारून चकविले आणि बरोबरी साधली. हैदराबादने 73 व्या मिनिटाला परत एकदा गोल करून आघाडी घेतली. लिस्टन कुलासोच्या स्थानावर आलेल्या बदली खेळाडू रोलंड आल्बर्गने आरिदानेच्या पासवर डाव्या पायाने जबरदस्त फटका मारला आणि अरिंदमला भेदत दुसरा गोल केला. हैदराबाद जिंकणार असे वाटत असतानाच जयेश राणेने दिलेल्या पासवर प्रीतम कोटालने हेडरवर गोल करून एटीकेसाठी सामना 2-2 असा बरोबरीत आणला.

Related Stories

डिचोलीतील व्हिनस इथोक्सीथेर्स कंपनीमधील कामगारांवर घरी बसण्याची पाळी

Patil_p

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांकडून पत्रादेवी चेक नाक्मयाची पाहणी

Omkar B

मातृछायेच्या कार्याला हातभार म्हणजे जीवनातील खरे भाग्य !

Patil_p

घन कचरा व्यवस्थापनासाठी फोंडा शहरात अभिनव प्रयोग

Amit Kulkarni

खलाशांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नांचे राज्यपालांकडून आश्वासन

Omkar B

काँग्रेसचे पाचही आमदार 30 टक्के पगार मुख्यमंत्री मदत निधीला देतील

Omkar B
error: Content is protected !!