पहाडी मल्लाचा अस्त
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटकचे प्रसिद्ध मल्ल, डबल कर्नाटक केसरी चंद्रू करवीनकोप्प (वय 70) यांचे सोमवारी गोकर्ण येथे हृदयविकाराने निधन झाले.
चंदू करवीनकोप्प हे देवदर्शनासाठी गोकर्ण येथे गेले होते. तेथे त्यांना छातीत वेदना होऊ लागल्याने त्यांना तातडीने तेथील स्थानिक इस्पितळात दाखल करण्यात आले. पण त्याचा उपयोग न होता त्यांचे निधन झाले.
चंद्रू करवीनकोप्प हे डबल कर्नाटक केसरी होते. त्यांनी पाकिस्तानचा भोला पंजाबी, विष्णू जोशीलकर, कर्तारसिंग, अर्जुन खानापूर, बाळू पाटील-बुडवेकर कोल्हापूर, सरदार खुशाल, बुद्धसिंग दिल्ली व भावकान्ना मुतगे यांच्यावर विजय प्राप्त केला होता.
कर्नाटकाचे पहाडी मल्ल म्हणून त्यांना ओळखला जात होते. 6 फुट 5 इंच उंची व 126 किलो वजन असलेले पै. चंद्रू बेळगावच्या दर्गा तालमीत सराव करत होते. त्यांनी 2 एप्रिल 1988 रोजी शेवटची कुस्ती बाला रफीक कोल्हापूर यांच्याबरोबर लढली होती. या कुस्तीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी कुस्तीला रामराम ठोकला
होता.
त्यांच्या पार्थिवावर के.के. कोप्प येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक केसरी रत्नकुमार मठपती, आंतरराष्ट्रीय मल्ल शिवाजी चिंगळे, कल्लाप्पा शिरोळ, मारूती सातनाळे, बाळाराम पाटील, विश्वनाथ पाटील, चेतन बुद्धण्णावर, कलगौडा नवलकट्टी व बल्लू पैलवानांसह कर्नाटकातील अनेक मल्ल, कुस्ती शौकीन, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.