वार्ताहर / हिंडलगा
मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्यावतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष वैभव कदम होते.
प्रारंभी मान्यवरांचे भगवे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे दि मार्कंडेय को-ऑप. सोसायटी चेअरमन प्रसाद चौगुले यांच्या हस्ते व्यासपीठ पूजन झाले. एलईडी स्क्रीन पूजन भाजपा ग्रामीण माजी अध्यक्ष विजय कदम यांनी केले. दीपप्रज्वलन देवस्की पंच कमिटी अध्यक्ष अशोक चौगुले, जयवंत बाळेकुंद्री, अभियंते अरुण कदम, सचिन मंडोळकर, युवराज काकतकर व ग्राम पंचायत नुतन सदस्यांच्या हस्ते झाले. तालुका पंचायत माजी सदस्य एस. एल. चौगुले यांनी लाईव्ह सोशल मिडीया पूजन केले. तर अभियंते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते सन्मान चिन्हाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाची सुरुवात गावातील महिला व विद्यार्थीनींच्या स्वागतगीताने झाली. अध्यक्ष वैभव कदम यांनी प्रास्ताविक संघटनेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर मान्यवर व समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व पाळणा गीत झाले.
याप्रसंगी संघटनेच्यावतीने नूतन ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आले. तसेच किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत भरीव कामगिरी केलेला मण्णूर गावचा सुपूत्र व उदयोन्मुख धावपटू तुषार भेकणे याचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यानिमित्त बेळगाव येथील श्री तुळजाभवानी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शिवकालिन बहारदार असे श्रीमंत योगी महानाटय़ सादर करण्यात आले. याला उपस्थित हजारो शिवप्रेमींनी टाळ्यांच्या गजरात भरभरून साथ दिली. तर वैजनाथ चौगुले व तानाजी तरळे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी जनकल्याण परिवारचे संस्थापक एल. के. कालकुंद्री, विश्वनाथ चौगुले, भैरु सांबरेकर, रविंद्र चौगुले, शंकर सांबरेकर, सुनील मंडोळकर, अशोक चौगुले, चुडाप्पा मंडोळकर, मारुती काकतकर, संजय आनंदाचे, वैजनाथ डोणकरी, उमेश चौगुले, यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य, महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.