वसंत व्याख्यानमालेतर्फे प्रा. माधुरी शानभाग यांचे ‘शब्दांच्या अलिकडले’ या विषयावर व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
जीवनाच्या एका टप्प्यावर प्रत्येकाला आपल्या जीवनाचे ‘मर्म’ कळते. तेंव्हा शब्दबद्ध करायला हवेत. त्यासाठी प्रारंभापासून निरीक्षणे नोंदवायला हवीत. त्यातून उत्तम लेखन होऊ शकते. त्यासाठी कष्ट हवेतच. पण आपली वैचारिक समृद्धी वाया घालवू नका, असे मत प्रा. माधुरी शानभाग यांनी व्यक्त केले.
वसंत व्याख्यानमालेतर्फे राज्य मराठी विकास संस्थेतर्फे बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसाहाय्य योजनेंतर्गत प्रा. माधुरी शानभाग यांचे ‘शब्दांच्या अलिकडले’ या विषयावर व्याख्यान झाले. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा प्रा. मीना खानोलकर व उपाध्यक्षा स्वरुपा इनामदार होत्या.
प्रा. शानभाग म्हणाल्या, विचार ही एकच गोष्ट चिरंतन राहणारी आहे. तंत्रज्ञानासह सर्व क्षेत्रात क्रांती झाली आहे. याचे मूळ कारण कोणीतरी त्यावर विचार करून कृती केलेली असते. रिचर्ड फेनमन म्हणतात, तिथे तळाला भरपूर जागा आहे. हा तळ म्हणजे सुक्ष्मातील सुक्ष्मकडे (नॅनोटेक्नॉलॉजी) जाणे होय. त्यांनी 1970 साली जे म्हटले ते आज वास्तवात आले आहे. म्हणजेच केव्हातरी व्यक्त केलेला विचार आज प्रत्यक्षात आला आहे.
आपल्या मनातील विचार शब्दबद्ध करून ठेवायला हवेत. त्यातून ताण कमी होतो. साचलेपणाचा निचरा होतो. त्यासाठी शब्दांची आराधना करायला हवी. बहुसंख्य नामवंत व्यक्तींना साधारण पन्नाशीला आले की त्यांना आपल्या मनातील विचार शब्दबद्ध करावेत, असे नक्कीच वाटते आणि म्हणूनच उत्तक साहित्यकृती घडू शकतात.
विचारांचे महत्त्व हेच की, सर्व विचार शब्दबद्ध करत गेल्यास आपल्याला स्वतःची वाट सापडते. प्रारंभी चाचपडायला होईलसुद्धा. पण नंतर आत्मविश्वासाने वाटचाल सुरू होईल हे नक्की. बालपणी जे वाचन केले त्यातील विचार मोठेपणी शब्दबद्ध होऊन प्रकटले. म्हणूनच वाचन व श्रवण खूप महत्त्वाचे आहे. जे शब्दांच्या अलीकडून आपल्याला शब्दांच्या पलीकडे जाता येते, असे त्यांनी नमूद केले.
उत्तम वाचनाची सवय लावून घेण्यासाठी कविता वाचाव्यात. ज्यामुळे ताल, लय याचबरोबर अल्पाक्षराचे महत्त्व समजते. चित्रमय, दृष्यमय शैली समजण्यासाठी नाटकांचे वाचन करायला हवे. लेखन करताना काही भाग अल्पाक्षरी, काही दृष्यमय तर आध्यात्मिक वाचनाच्या बैठकीमुळे साहित्यकृतीलाही उंची प्राप्त होते. आत्मचरित्रांचे वाचन हे आपल्यासाठी दिशादर्शक ठरते. त्यांचे जगणे आपल्याला कळतेच. पण विचारांची दिशा कळते. म्हणून आत्मचरित्रे वाचायची सवय लावून घ्या, असा सल्ला प्रा. शानभाग यांनी दिला.
कादंबरी वाचन करणे आवश्यक
एखादे पात्र उभे करायचे असल्यास कादंबरी वाचन आवश्यक आहे. मनातील विकृत विचारसुद्धा कसे व्यक्त होतात हे रत्नाकर मतकरींच्या लेखनातून पहायला मिळते. मानवी भावभावना, नियतीचे खेळ, वैचित्र्य हे सर्व लेखनातून शब्दबद्ध करून ठेवणे आवश्यक आहे. शब्दाच्या अलीकडे जे आहे ते शब्दबद्ध केले की नक्कीच शब्दांच्या पलीकडे जाता येते, असे सांगून प्रा. माधुरी शानभाग यांनी समारोप केला.
प्रारंभी स्वरुपा इनामदार यांनी प्रास्ताविक केले. धनश्री नाईक यांनी ईशस्तवन सादर केले. नमिता कुरुंदवाड यांनी वक्त्यांचा परिचय करून देऊन सूत्रसंचालन केले. प्रा. मीना खानोलकर यांनी वक्त्यांचा सत्कार करून अध्यक्षीय समारोप केला. शिल्पा लांडगे यांनी आभार मानले.