कोरोनाच्या वाढत्या संख्येचा परिणाम
प्रतिनिधी / बेळगाव
मागील 11 महिन्यांपासून मिरज-लोंढा या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. एक्स्प्रेस रेल्वे धावत असल्या तरी पॅसेंजर अद्याप धावण्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. मार्च महिन्यापासून पॅसेंजर सुरू करण्यासाठी सेंट्रल रेल्वेने तयारी सुरू केली होती. परंतु महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याने पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
मिरज-हुबळी, मिरज-लोंढा, मिरज-कॅसलरॉक या मार्गांवर पॅसेंजर रेल्वे धावत होत्या. यामुळे स्थानिक नागरिकांना अत्यंत कमी खर्चात प्रवास करता येत होता. पॅसेंजर रेल्वे प्रत्येक लहान रेल्वे स्थानकावर थांबत असल्यामुळे लहान व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार या सर्वांनाच पॅसेजर रेल्वे सोयीची ठरत होती. परंतु कोरोनामुळे सामाजिक अंतर राखता येणार नसल्याने तातडीने पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या.
नैर्त्रुत्य रेल्वेच्या काही पॅसेंजर रेल्वे प्रायोगिक तत्त्वावर हुबळीपर्यंत धावत आहेत. परंतु बेळगाव रेल्वे स्थानकावर अद्याप एकही पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात आलेली नाही. बेळगावमधून धावणाऱया पॅसेंजर रेल्वे सेंट्रल रेल्वेच्या असल्याने अद्याप त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे सेंट्रल रेल्वेने मिरज रेल्वे स्थानकातून रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मार्च महिन्यात पॅसेंजर रूळावर येण्यासाठीचा मार्ग मोकळा केल्याची माहिती उपलब्ध झाली होती.
पॅसेंजरचा प्रवास अद्याप दूर
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. बऱयाच शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. त्यामुळे मिरज येथून सुरू होणाऱया पॅसेंजर रेल्वेला अद्याप कालावधी लागणार आहे. त्यामुळे पॅसेंजरचा प्रवास करणाऱयांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.