तरुण भारत

शाळेचे वर्ग दिवसभर झाले सुरू

11 महिन्यांनी 6 वी ते 8 वीचे  वर्ग भरले पूर्ण दिवस : विद्यार्थ्यांना झाला आनंद

प्रतिनिधी / बेळगाव

राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग पूर्ण दिवस सुरू झाले. तब्बल 11 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांचे पूर्णवेळ वर्ग भरले. कोरोना संबंधित सर्व नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. आता दररोज नियमित वर्ग भरणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आनंद होता.

मार्च 2020 मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या. या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. त्यानंतर 8 ते 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कॉलेजसोबत 9 वी व 10 वीचे वर्ग भरविण्यात आले. तसेच 6 वी पासूनचे वर्ग एक दिवसाआड काही तासच भरविण्यात येत होते.

यामुळे पूर्णवेळ शाळा केव्हा भरणार याची प्रतीक्षा विद्यार्थी करीत होते. राज्य सरकारने सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर शाळांनीही तशी तयारी सुरू केली.

सोमवारी शाळा भरल्यानंतर थर्मल स्क्रिनिंग करूनही विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यात आले. त्यांना मास्कची सक्ती करण्यात आली होती. सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना वारंवार करण्यात येत होत्या. बऱयाच महिन्यांनंतर पुन्हा दिवसभर शाळा भरल्याने विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.

शाळा सुरू होण्याची वाट पाहत होतो : श्रुतिका पाटील (विद्यार्थिनी)

तब्बल 11 महिन्यांनंतर पुन्हा एकदा दिवसभर शाळा भरली. शाळेत येवून शिक्षण घेण्याचा आनंद काही निराळाच असतो. त्यामुळे पूर्ण दिवसभर शाळा केव्हा सुरू होणार याची आम्ही वाट पाहत होतो. कोणतीही शंका आल्यास त्याचे उत्तर ताबडतोब शिक्षकांकडून मिळत असल्याचे तिने सांगितले.

शाळा सुरू झाल्यामुळे खूप छान वाटते : समृद्धी पाटील (विद्यार्थिनी)

शाळा सुरू नसल्याने ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. परंतु बऱयाच विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने त्यांना शिक्षणाच्या समस्या येत होत्या. पालकांकडे मोबाईल असल्याने ते घरी आल्यानंतर अभ्यास करावा लागत होता. यामुळे केव्हा शाळा सुरू होणार याची आम्ही वाट पाहत होतो. शाळा सुरू झाल्यामुळे खूप छान वाटत असल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

Related Stories

आता बेळगाव मधून चेन्नईला थेट विमानसेवा

Patil_p

नंदगडमध्ये हमीभावाने भात खरेदीसाठी नोंदणी सुरू

Omkar B

विनायकनगरमधील रस्त्यांसाठी एक कोटीचा निधी

Patil_p

वडगाव येथील बालकाचा डेंग्यूने घेतला बळी

Rohan_P

सुळगे (ये.) येथे नव्या चेहऱयांना संधी

Patil_p

सिव्हिलमधून 19 तर केएलईतून दोघे डिस्चार्ज

Patil_p
error: Content is protected !!