अनैतिक संबंधातून खून,उळवीजवळ दरीत मृतदेह फेकला
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या बारा दिवसांपूर्वी बेळगाव येथून बेपत्ता झालेल्या सोमनट्टी, ता. बेळगाव येथील तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. जोयडा तालुक्मयातील उळवीजवळ दरीत त्याचा मृतदेह आढळून आला असून खून झालेल्या तरुणाच्या पत्नीनेच आपल्या सख्ख्या भावोजीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातून पतीचा काटा काढला आहे. पत्नीसह चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.सागर गंगाप्पा पुजेरी (वय 23) रा. सोमनट्टी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सागर हा महाद्वार रोड येथील चोण्णद स्टील्समध्ये हमाली करत होता. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेला सागर कामावरही पोहोचला.
दुपारी 2 पर्यंत काम करून त्यानंतर खानापूरला जात असल्याचे मालकांना सांगून तो कामाच्या ठिकाणावरून बाहेर पडला होता.
यासंबंधी सागरचे वडील गंगाप्पा पुजेरी यांनी 16 फेब्रुवारी रोजी येथील मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद देऊन आपला मुलगा बेपत्ता झाल्याचे सांगितले होते. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी या बेपत्ता प्रकरणाचा तपास हाती घेतला असता सोमवारी त्याला कलाटणी मिळाली. सागरचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळाप्पा भगवंताप्पा दिन्नी, बसवराज यल्लाप्पा उप्पार दोघेही राहणार कोळय़ानट्टी, मंजुनाथ पिराप्पा बिडी, रा. संपगाव, सागरची पत्नी निलम्मा सागर पुजेरी या चौघा जणांविरुद्ध भादंवि 302, 364, 342, 109, 504, 506, सहकलम 34 बरोबरच ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार केवळ आठ महिन्यांपूर्वी सागर व निलम्मा यांचा विवाह झाला होता. लग्नानंतरही सागरची पत्नी निलम्मा हिचे बाळाप्पा दिन्नी या आपल्याच नात्यातील तरुणाशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधातून सागरचा काटा काढण्यासाठी अपहरण करून गळा आवळून त्याचा खून करण्यात आला आहे. खुनानंतर त्याचा मृतदेह उळवीजवळील दरीत टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत. सोमवारी सागरचा मृतदेह आढळून आला आहे.