तरुण भारत

टायरअभावी 200 एसटी बसेस जाग्यावर!

प्रतिनिधी/ रत्नागिरी

एसटी महामंडळाकडे एमआरएफ आणि जेके कंपनीच्या टायरचा कोटा असतो.  यातील एमआरएफचा कोटा संपल्याने व कोटय़वधींची थकबाकी असल्याने जे. के. कंपनीने एसटी महामंडळाला टायरचे वितरण थांबवले आहे. रत्नागिरी विभागातील कार्यशाळेत एकही टायर शिल्लक नसल्याने तब्बल 180 एसटी डेपोत उभ्या करून ठेवण्याची नामुष्की विभागावर आली आहे.

Advertisements

गेल्या काही महिन्यांपासून एसटीला संबंधित कंपन्यांकडून टायर पुरवठा बंद झाला आहे. ही समस्या लवकरात-लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले होते. मात्र हा प्रश्न अद्यापही ‘जैसे थे’च आहे. मुळात एसटी महामंडळ तोटय़ात असल्याने लॉकडाऊन काळात कर्मचारी-अधिकाऱयांचे वेतनही 3-3 महिने उशीरा झाले होते. अशाही स्थितीत रत्नागिरी विभागाने माल वाहतुकीतून तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी विभागाला महिन्याला 350 ते 400 टायर लागतात. अनेक गाडय़ांचे टायर बदलण्याची गरज आहे. मात्र रत्नागिरी जिल्हय़ात टायरच शिल्लक नसल्याने गेल्या 2 महिन्यांपासून सुमारे 200 एसटींचे टायर खराब झाल्याने त्या उभ्या ठेवण्याची वेळ विभागावर आली आहे.

वर्षभरापूर्वी डिझेल पैसे थकल्याने 2 दिवस डिझेल साठा बंद होता. त्या मागोमाग टायरचे संकट उभे राहिले आहे. आता रत्नागिरी विभागातील एकाही आगाराकडे टायर शिल्लक नाही. प्रारंभी इतर विगागांकहून टायर घेऊन तात्पुरती व्यवस्था झाली होती. मात्र आता इतर जिल्हय़ांकडेही टायर शिल्लक नसल्याने मोठी समस्या उभी राहिली आहे.

लांजात 14 बसेस जाग्यावर

टायर उपलब्ध नसल्याने लांजा आगारातील 59 पैकी तब्बल 14 एसटी बसेस 11 फेब्रुवारीपासून डेपोत धूळखात उभ्या आहेत. यामुळे नियमित 216 फेऱयांपैकी 70 फेऱया बंद ठेवण्याची नामुष्की आगारावर आली आहे. याबाबत आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी विभागीय कार्यालयाकडे 40 टायरची मागणी केल्याचे व फेब्रुवारी अखेरपर्यंत टायर उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. बंद गाडय़ांमध्ये 4 शिवशाही बसचा समावेश आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ा बंद ठेवण्याबरोबरच लांजा-रत्नागिरी मार्गावर 6 पैकी केवळ 2 फेऱया सोडल्या जात आहेत. एक बस सुमारे 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवते. 14 गाडय़ा उभ्या राहिल्याने आगाराचे दररोज सुमारे सव्वा 2 लाख रुपयांचे उत्पन्न घटले आहे.  

वेळापत्रक कोलमडण्याच्या मार्गावर

या टायर टंचाईतून परिवहन मंत्री अनिल परब व महामंडळ कसा मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेके कंपनीने थकबाकी दिल्याशिवाय टायर पुरवठा करणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे समजते. यामुळे रत्नागिरी विभागाचे वेळापत्रक सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच 180 गाडय़ांना टायरअभावी ब्रेक लागल्याने ते पुरते कोलमडण्याच्या मार्गावर आहे.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात नवे १०६ पॉझिटिव्ह तर ४२ रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

लांजात 34 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Patil_p

कोरोनाग्रस्ताचा मध्यरात्री पोबारा

Patil_p

रत्नागिरी (दापोली) : वीज ग्राहकांना वीज बिलांचा भूर्दंड कायम

Abhijeet Shinde

प्रतीक्षा संपली, कोरोना लस दाखल

NIKHIL_N

वादळ नाही, तर त्याच्याशी झुंज महत्वाची!

NIKHIL_N
error: Content is protected !!