तरुण भारत

चांगल्या विचारांचे उमेदवार पालिकेवर निवडले जावेत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलेले मत, कुंकळ्ळी पालिकेच्या नव्या व्यावसायिक इमारतीचे उद्घाटन, 15 कोटी खर्चून उभारणी

प्रतिनिधी / कुंकळ्ळी

Advertisements

कुंकळ्ळी येथील नगरपालिकेने 15 कोटी रु. खर्चून उभारलेल्या नव्या व्यावसायिक इमारतीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते 18 रोजी स्थानिक आमदार व मुरगाव पीडीएचे अध्यक्ष क्लाफासियो डायस व माजी आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. चांगल्या विचारांचे लोक पालिकेवर निवडले जावेत. पालिका मंडळ हे लोकांसाठी वावरणारे असावे. त्यासाठी मतदारांनी चांगल्या विचारांच्या योग्य उमेदवारांची निवड करावी आणि आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी, असे आवाहन यावेळी बोलताना सावंत यांनी केले.

यावेळी जी-सुडाचे सचिव तारीक थॉमस, सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर, जी-सुडाचे प्रकल्प अभियंता हुसेन शेख, कुंकळ्ळी नगरपालिका प्रशासक फॉरिना कुलासो ई फर्नांडिस, कुंकळ्ळी नगरपालिका मुख्याधिकारी व्हायलेट गोम्स यांची उपस्थिती होती. तसेच पालिकेच्या मावळत्या मंडळातील पॉलिता कारनेरो, किरण नाईक, लेविता मास्कारेन्हस, सुकोरिना कुतिन्हो, आंजेला पैंगीणकर, प्रेमदीप देसाई, उद्देश गावकर, मारियो मोराईस, विदेश देसाई हेही व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.           

आमदार डायस यांच्या कार्यालयासाठी या इमारतीत जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सुरुवातीलाच बोलताना स्पष्ट केले. कुंकळ्ळीसाठी अग्निशामक दल स्थानकाची घोषणाही त्यांनी केली. यासाठी लागणारी जमीन दोन महिन्यांत देण्याची तरतूद केली जाईल. गोवा मुक्तीला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे केंद्राने 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून 1 कोटीपर्यंतचा प्रकल्प पालिकेला मंजूर केला जाईल. पालिकेला तसा प्रस्ताव पाठवावा लागेल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

कुंकळ्ळी लढय़ाचा इतिहास पाठय़पुस्तकात येणार

कुंकळळीच्या लढय़ाचा इतिहास पाठय़पुस्तकात पुढील वर्षपर्यंत समाविष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्नरत असून कोविडमुळे विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले. हा नवा प्रकल्प कुंकळ्ळी पालिकेच्या उत्पन्नात भर टाकणारा आहे. या प्रकल्पासंदर्भात पालिकेने योग्य निर्णय घेऊन व्यावसायिकांना साहाय्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत, तर गोवा सरकारने स्वयंपूर्ण गोवा धोरण अवलंबिले असून त्याची सुरुवात पंचायत पातळीपासून केली आहे. गोवा मुक्तीला 60 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारचा प्रयत्नरत आहे. वीज समस्यांच्या बाबतीत शहरांपेक्षा ग्रामीण स्थिती वेगळी आहे. त्यामुळे येणाऱया प्रकल्पाला विरोध करून चालणार नाही. पायाभूत साधनसुविधा विकास होणे तितकेच आवश्यक आहे, असे सावंत यांनी पुढे सांगितले. स्वयंपूर्ण मित्र पंचायतीप्रमाणे पुढे नगरपालिकेत दर सोमवारी येतील. यासंबंधी सरकारने पाऊस टाकले आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण सहकार्य : डायस

आमदार डायस यांनी मुख्यमंत्री सावंत यांची प्रशंसा करताना कुंकळ्ळी मतदारसंघात त्यांचे सहकार्य मोलाचे ठरले असल्याचे सांगितले. मागील कित्येक वर्षे जे एकाही सरकारला जमले नव्हते ती चांदरच्या भुयारी मार्गाची लोकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण करून दिली. मुख्यमंत्र्यांनी पूर्ण सहकार्य दिल्याने मतदारसंघात विकासकामे पूर्ण करण्यात आपणास यश आले. भाजपात प्रवेशाचा आपला निर्णय योग्य होता. मतभेद विसरून लोक आता भाजपकडे आपुलकीने पाहत आहेत, असे सांगून गिरदोली जिल्हा पंचायत मतदारसंघात निवडून आलेल्या उमेदवाराचे उदाहरण त्यांनी दिले. पालिका निवडणुकीसाठी अनेक उमेदवार तयारीत आहेत. आपण सर्वांना आश्वासन देऊ शकत नाही. मतदारांनी योग्य त्या उमेदवारांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राजन नाईक यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी नगरविकासमंत्री स्व. फ्रान्सिस डिसोझा यांचे जाहीर आभार मानले. आपल्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिली व 14 कोटीही मंजूर केले. नंतर हे काम पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनीही सहकार्य दिले. तसेच जी-सुडाचे अधिकारी, ठेकेदार झटले. नव्या इमारतीमुळे पालिकेच्या कर्मचाऱयांचा प्रश्न सुटणार आहे, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे एनआयटी हा प्रकल्प कुंकळ्ळीत होत आहे. यामुळे कुंकळ्ळीचे नाव सर्वत्र जाईल. विद्यार्थ्यांनी एनआयटीत प्रवेश मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. अभियंता विनय देसाई यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी व्हायलेट गोम्स यांनी आभार मानले.

Related Stories

एमव्हीआर कंपनी विरोधात पेडणेत तीव्र संताप

Omkar B

कर्नाटक : गोव्यातील कन्नड भवनासाठी 10 कोटी अनुदान

Sumit Tambekar

इथॅनला राष्ट्रीय रौप्य; विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची मिळविली पात्रता

Amit Kulkarni

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारपासून गोवा दौऱयावर

Amit Kulkarni

मडगावात महिला काँग्रेसतर्फे रु.25 किलो दराने कांदय़ाची विक्री

Patil_p

भाजपा संधी देतो, पळवित नाही !

Omkar B
error: Content is protected !!