तरुण भारत

आंध्रचा धुव्वा उडवित पंजाबचा पहिला विजय

विजय हजारे करंडक स्पर्धा – मनदीप सिंगचे नाबाद अर्धशतक, कौलचे 4 बळी

वृत्तसंस्था/ इंदोर

Advertisements

कर्णधार मनदीप सिंगचे जलद अर्धशतक, वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल व बरिंदर सरन यांच्या भेदक माऱयाच्या बळावर पंजाबने विजय हजारे करंडक वनडे स्पर्धेतील  गट ब मधील सामन्यात आंध्र प्रदेशवर सात गडय़ांनी मात करून पहिला विजय नोंदवला.

पहिले दोन सामने गमविणाऱया पंजाबने येथे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कौल, सरन व संदीप शर्मा या वेगवान त्रिकुटाने शानदार गोलंदाजी केली. त्यांना मयांक मार्कंडे व हरप्रीत ब्रार या फिरकी द्वयीने पूरक साथ दिल्याने आंध्रचा डाव 48.1 षटकांत 175 धावांत आटोपला. कौलने 27 धावांत 4, सरनने 29 धावांत 3 बळी घेताना अश्विन हेब्बार, क्रांती कुमार (25), कर्णधार हनुमा विहारी (2) यांना बाद केले आणि त्यांची स्थिती 3 बाद 52 अशी केली. लेगस्पिनर मार्कंडेने (2-35) नितिश कुमार रेड्डी (30) व रिकी भुई (21) यांचे बळी मिळविले. हरप्रीत ब्रारने नंतर शोएब मोहम्मद खानला (10) बाद करीत आंध्ा्रला 6 बाद 109 असे अडचणीत आणले. वेगवान गोलंदाज सरण पुन्हा गोलंदाजीस आल्यावर त्याने गिरीनाथ रेड्डी व हरिशंकर रेड्डी यांना तीन चेंडूंच्या फरकाने बाद केल्यावर कौलने करण शिंदेचा (27) कडवा प्रतिकार मोडून काढला. चीपुरापल्ली स्टीफन (नाबाद 4) व एस. आशिष (23) यांनी 25 धावांची भर घातल्याने आंध्रला पावणेदोनशेची मजल मारता आली.

त्यानंतर अभिषेक शर्मा व प्रभसिमरन सिंग यांनी पंजाबला 59 धावांची सलामी देत चांगली सुरुवात करून दिली. शर्मा 32 धावांवर बाद झाला. प्रभसिमरनने कर्णधार मनदीपसमवेत 30 धावांची भर घातल्यानंतर हरिशंकर रेड्डीने प्रभसिमरनला बाद करीत ही जोडी फोडली. त्यानेही 32 धावा केल्या. मनदीपने मात्र शानदार फलंदाजी करीत अर्धशतक पूर्ण केले. त्याआधी गुरकीरत सिंग मान 16 धावा काढून बाद झाला. 3 बाद 113 अशा स्थितीनंतर मनदीपने सनविर सिंगसमवेत आणखी पडझड होऊ न देता विजयाचे उद्दिष्ट 14 षटके असतानाच गाठून दिले. मनदीपने नाबाद 64 तर सनविरने नाबाद 30 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक ः आंध्रप्रदेश 48.1 षटकांत सर्व बाद 175 ः नितिश कुमार  रेड्डी 30, करण शिंदे 27, क्रांती कुमार 25, सिद्धार्थ कौल 4-27, बरिंदर सरन 3-29. पंजाब 36 षटकांत 3 बाद 176 ः मनदीप सिंग नाबाद 64, अभिषेक शर्मा 32, प्रभसिमरन सिंग 32, शोएब मोहम्मद खान 2-38.

Related Stories

स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, नाही आठवत!

Patil_p

बांगलादेश विजेते, भारताला उपविजेतेपद

Amit Kulkarni

ला लीगा स्पर्धेतील सामना बरोबरीत

Patil_p

राजस्थान-पंजाबचे प्रशिक्षक, दोघेही चिंतेत!

Patil_p

वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची बाधा

Patil_p

प्रवीणने घेतली रौप्यपदकाची उंच उडी!

Patil_p
error: Content is protected !!