तरुण भारत

मुंबईचा ओडिशावर विजय, बिपीन सिंगची हॅट्ट्रिक

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आयएसएल लीग फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेल्या सामन्यात मुंबई सिटी एफसीने एका दमदार विजयाची नोंद करताना दुबळय़ा ओडिशा एफसीचा 6-1 गोलानी पराभव केला. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला.

या सामन्यात मुंबई सिटी एफसीच्या बिपीन सिंगने शानदार हॅट्ट्रिकची नोंद केली. बार्थोलोमियाँव ओगबेचेने दोन तर एक गोल गोडार्डने केला. पराभूत ओडिशा एफसीच्या एकमेव गोलाची नोंद डायगो मॉरिसियोने केली. या विजयाने मुंबई सिटीला तीन गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 19 सामन्यांतून अकरा विजय, चार बरोबरी आणि चार पराभवाने 37 गुण झाले व त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले. पराभूत ओडिशाचा हा स्पर्धेतील बारावा पराभव. त्यांचा फक्त एक विजय आणि सहा बरोबरीने 9 गुण झाले व ते शेवटच्या स्थानावर आहेत.

या सामन्यावर निर्विवादपणे वर्चस्व जरी मुंबई सिटी एफसीने ठेवले असले तरी पहिला गोल मात्र ओडिशा एफसीने नोंदविला. सामन्याच्या नवव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर डायगो मोरिसियोने मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंगला भेदले आणि आघाडी घेतली. अहमद जाहूने डायगो मॉरिसियोला पाठीमागून धक्का देऊन पाडल्याबद्दल ओडिशाला पेनल्टी फटका बहाल झाला होता. ओडिशाची ही आघाडी मात्र जास्त वेळ टिकली नाही. अहमद जोहूच्या पासवर बार्थोलोमियाँव ओगबेचेनेने अर्शदीप सिंगला भेदून गोल केला आणि बरोबरी साधली. त्यानंतर आक्रमणांची मालिका रचून मुंबई सिटी एफसीने सात मिनिटांत तीन गोल केले. प्रथम बिपीन सिंगने दुसरा गोल करून मुंबईला आघाडीवर नेले. लगेच अहमद जोहूच्या पासवर बार्थोलोमियाँव ओगबेचेने तर मध्यंतराला एक मिनिट शिल्लक असताना गोडार्डने मुंबईचा चौथा गोल केला. दुसऱया सत्रात मुंबई सिटी एफसीने आणखी दोन गोल नोंदविले. प्रथम 47व्या मिनिटाला बार्थोलोमियाँव ओगबेचेने दिलेल्या पासवर बिपीन सिंगने पाचवा गोल केल्यानंतर 86व्या मिनिटाला बिपीन सिंगने संघाचा सहावा गोल केला. यंदा आयएसएल स्पर्धेत हॅट्ट्रिक नोंदवणारा बिपीन सिंग पहिला खेळाडू ठरला. या सामन्यात मुंबई सिटीने पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमविली. 84व्या मिनिटाला अहमद जाहूची पेनल्टी ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंगने आपल्या डाव्या बाजूने झेपावत अडविली.

Related Stories

पणजी मनपावर बाबुशचेच वर्चस्व

Amit Kulkarni

राज्यात ‘लॉकडाऊन’चे आशादायी परिणाम

tarunbharat

आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींकडून उद्या सुनावणी

Patil_p

कमनशिबी केरळ ब्लास्टर्सची जमशेदपूर एफसीशी बरोबरी

Amit Kulkarni

दुकाने खुली केली तरी ग्राहक नाही

tarunbharat

म्हादईप्रश्नी गोव्यावर अन्याय होऊ देणार नाही

tarunbharat
error: Content is protected !!