तरुण भारत

चिपी विमानतळ मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करण्यासाठी प्रयत्न

  त्रुटी काढलेली कामे पूर्ण

डी. जी. सी. ए. चे पथक दाखल

धावपट्टी, अन्य सुविधांची पाहणी सुरू

..तर मार्चच्या पहिल्या आठवडय़ात विमानसेवा सुरू

प्रतिनिधी / परुळे:

चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

डी. जी. सी. ए. ने धावपट्टी व अन्य कामे, परिसराबाबत ज्या त्रुटी काढल्या होत्या. ती सर्व कामे आय. आर. बी. या ठेकेदार कंपनीने पूर्ण केली आहेत. दरम्यान, डी. जी. सी. ए. या विमानतळ प्राधिकरणाचे पथक चिपी येथे दाखल झाले असून त्यांनी धावपट्टी व अन्य सुविधांची पाहणी सुरू केली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत हे पथक चिपी येथे सर्व्हे करणार आहे. सर्व्हेनंतर धावपट्टी व विमानतळाला हवाई वाहतुकीस परवानगी दिली, तर मार्चच्या पहिल्या आठवडय़ात चिपी येथून विमानसेवा सुरू होईल, असे संकेत मिळाले आहेत.

महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग विमानतळावरुन विमानसेवा सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, डी. जी. सी. ए. च्या पाहणी दौऱयात धावपट्टीच खराब झाल्याचे उघड झाले होते. अन्य कामे अपूर्ण होती. वीज व मशिनरीचे कामही प्रलंबित असल्याने डी. जी. सी. ए. ने विमानतळावरुन प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली नव्हती.

            मुख्यमंत्र्यांनी घेतल्या आढावा बैठका

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी यांनी विमानतळावरील कामांचा वारंवार आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे दोनवेळा आय. आर. बी., एमआयडीसी, महसूल व अन्य अधिकाऱयांच्या बैठका घेऊन कामांचा आढावा घेतला. कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली होती.

              डी. जी. सी. ए. चे पथक दाखल

डी. जी. सी. ए. च्या पथकाने यापूर्वी केलेल्या पाहणीत धावपट्टी खराब झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच अन्य काही त्रुटी आढळल्या होत्या. त्या त्रुटी पूर्ण केल्या का? धावपट्टी योग्य पद्धतीने केली का?, याची चाचणी पथकाने गुरुवारपासून घेण्यास सुरुवात केली. विमानतळ कधी सुरू होणार, हे आता डी. जी. सी. ए. च्या अहवालावरच अवलंबून आहे.

              सर्व त्रुटी दूर करून कामे पूर्ण

आय. आर. बी. चे जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे यांच्याशी संपर्क साधला असता, डी. जी. सी. ए. ने यापूर्वीच्या पाहणीत ज्या त्रुटी काढल्या होत्या. ती कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आम्ही पूर्ण क्षमतेने कामे केली असून आम्हाला विमानसेवा सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी आशा आहे. परवानगी मिळाली, तर विमानसेवा सुरू करण्यास वेळ लागणार नाही. विमानसेवा सुरू करण्याची तयारी झाल्याचे ते म्हणाले.

            पेट्रोल साठय़ासाठी मोठी टाकी चिपीत दाखल

विमानतळावर विमानासाठी पेट्रोल इंधनाचा साठा करण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असून गुरुवारी दुपारी इंडियन ऑईल कंपनीची मोठी टाकी चिपीत दाखल झाली. अंडरग्राऊंड बांधकामातही इंधन साठा केला जाणार आहे.

Related Stories

उद्यापर्यंत गडगडाटासह पाऊस

NIKHIL_N

ऐन हंगामात खतपुरवठा ‘वेटिंग’वर

NIKHIL_N

सरपंच, ग्रामसेवकांना बुधवारपासून कोरोना लस

NIKHIL_N

अपादग्रस्त जहाजातील 30 बॅरल ऑईल बाहेर काढण्यात यश

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट

NIKHIL_N

कोकण रेल्वेतून 70 टक्के प्रवासीच करताहेत प्रवास

NIKHIL_N
error: Content is protected !!