तरुण भारत

पृथ्वी शॉचे नाबाद द्विशतक, यादवचे शतक

वृत्तसंस्था / जयपूर

कर्णधार पृथ्वी शॉचे नाबाद द्विशतक तसेच सुर्यकुमार यादवच्या शानदार शतकाच्या जोरावर गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ड गटातील सामन्यात मुंबईने पाँडेचेरीचा 233 धावांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेत पृथ्वी शॉने वैयक्तिक सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदविला आहे. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानचा 44 धावांनी तर दिल्लीने हिमाचलप्रदेशचा 6 गडय़ांनी पराभव केला.

इलाईट ड गटातील सामन्यात पाँडेचेरीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईने 50 षटकांत 4 बाद 457 धावा जमविल्या. त्यानंतर पाँडेचेरीचा डाव 224 धावांत आटोपला.

मुंबई संघाच्या 21 वर्षीय शॉने आतापर्यंत पाच कसोटी आणि पाच वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले असून त्याने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत वैयक्तिक सर्वोच्च नाबाद 227 धावांचा विक्रम करताना 2019 साली गोवा संघाविरूद्ध संजु सॅमसनने नोंदविलेला नाबाद 212 धावांचा विक्रम मागे टाकला. गुरूवारच्या सामन्यात शॉने 152 चेंडूत 5 षटकार आणि 31 चौकारांसह नाबाद 227 धावा झोडपल्या. लिस्ट ए सामन्यात वनडेत दुहेरी शतक नोंदविणारा शॉ हा आठवा भारतीय फलंदाज आहे. या स्पर्धेत आतापर्यंत चार द्विशतके नोंदविली गेली आहेत. या स्पर्धेत पृथ्वी शॉचे हे दुसरे शतक आहे. त्याने दिल्लीविरूद्धच्या सलामीच्या सामन्यात नाबाद 105 धावा झळकविल्या होत्या. अ दर्जाच्या फलंदाजांच्या यादीत जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविणारा शॉ हा पहिला कमी वयाचा कर्णधार आहे. शॉने दक्षिण आफ्रिकेच्या ग्रीम पोलॉकचा नाबाद 222 धावांचा विक्रम मागे टाकला आहे.

मुंबई संघातील सुर्यकुमार यादवने 58 चेंडूत 4 षटकार आणि 22 चौकारांसह 133 धावा झोडपल्या. यादव आणि शॉ यांनी तिसऱया गडय़ासाठी 201 धावांची भागिदारी केली. आदित्य तरेने 7 चौकारांसह 56 धावा जमविल्या. पाँडेचेरीतर्फे पंकज सिंगने दोन तर सुरेशकुमारने 1 गडी बाद केला. त्यानंतर पाँडेचेरीचा डाव 224 धावांत आटोपला. मुंबई संघातर्फे प्रशांत सोळंकीने 48 धावांत 5 तर शार्दुल ठाकूरने 31 धावांत 2 गडी बाद केले. पाँडेचेरी संघातील रोहितने 63 धावा जमविल्या.

महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानचा 44 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 50 षटकांत 6 बाद 277 धावा जमविल्या. केदार जाधवने नाबाद 101 तर नेहारने 55 धावा जमविल्या. राजस्थानतर्फे बिश्नोईने 55 धावांत 3 तर चौधरीने 1 गडी बाद केला. त्यानंतर राजस्थानचा डाव 233 धावांवर आटोपला. महिपालने 88, सलमान खानने 68 धावा जमविल्या महाराष्ट्रातर्फे प्रदीप दाढेने 48 धावांत 4 तर चौधरीने 33 धावांत 2 गडी बाद केले.

या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात दिल्लीने हिमाचल प्रदेशचा 6 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात हिमाचलप्रदेशने 50 षटकांत 8 बाद 251 धावा जमविल्या. निखिलने नाबाद 100 तर जैस्वालने 34 धावा केल्या. दिल्लीतर्फे कुलवंतने तसेच सिमरजीत सिंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यानंतर दिल्लीने 4 बाद 252 धावा जमवित विजय नोंदविला. के शर्माने नाबाद 67 तर ललित यादवने नाबाद 52 धावा झळकविल्या. हिमाचल प्रदेशतर्फे डागरने 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : मुंबई 50 षटकांत 4 बाद 457, पाँडेचेरी सर्वबाद 224,महाराष्ट्र 50 षटकांत 6 बाद 277, राजस्थान सर्वबाद 233,हिमाचल प्रदेश 50 षटकांत 8 बाद 251, दिल्ली 4 बाद 252.

Related Stories

दक्षिण अफ्रिकेच्या फुटबॉलपटूचे वाहन अपघातात निधन

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबीला ‘दे धक्का’

Patil_p

जेसॉन होल्डरसाठी ‘टर्निंग पॉईंट’

Patil_p

टूर दि फ्रान्स स्पर्धा 29 ऑगस्टपासून

Patil_p

स्वायटेक-बेन्सिक अंतिम लढत

Patil_p

विल्यम्सनचे झुंजार द्विशतक, न्यूझीलंडचा 519 धावांचा डोंगर

Patil_p
error: Content is protected !!