तरुण भारत

न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर रोमांचक विजय

 दुसरी टी-20 जिंकून मालिकेत 2-0 ने आघाडी, सामनावीर गुप्टिलची फटकेबाजी, सँटनरचे 4 बळी

वृत्तसंस्था / डय़ुनेडिन

अनुभवी फलंदाज मार्टिन गुप्टिलला दीर्घ कालावधीनंतर मिळालेल्या फॉर्मनंतर तडकावलेल्या 97 धावा तसेच कर्णधार केन विल्यम्सनचे अर्धशतक आणि सँटनर, नीशम यांच्या भेदक माऱयाच्या आधारावर न्यूझीलंडने येथे झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर केवळ 4 धावांनी रोमांचक विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. गुप्टिलला सामनावीराचा बहुमान मिळाला.

ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी मिळाल्यावर गुप्टिल, विल्यम्सन यांची अर्धशतके व नीशमने तडकावलेल्या नाबाद 45 धावांमुळे न्यूझीलंडने 20 षटकांत 7 बाद 219 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 8 बाद 215 धावांवर रोखत न्यूझीलंडने चार धावांनी विजय मिळविला. यावेळी सँटनर व नीशम यांची गोलंदाजी निर्णायक ठरली. दोन्ही संघांनी छोटय़ा सीमारेषेचा लाभ उठवत एकूण 30 षटकारांची आतषबाजी करीत 10.9 धावा प्रति षटकाच्या गतीने एकूण 434 धावांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियातर्फे मार्पुस स्टोईनिसने चमकदार फलंदाजी केली. त्याने 37 चेंडूत 7 चौकार, 5 षटकारांसह 78 धावा फटकावल्या. मात्र गुप्टिलची 50 चेंडूतील 97 धावांची फटकेबाजी न्यूझीलंडच्या विजयाची पायाभरणी करणारी ठरली. नंतर त्यांचा स्पिनर मिशेल सँटनरने 31 धावांत 4 बळी घेतले तर ऑस्ट्रेलियातर्फे केन रिचर्डसनने 43 धावांत 3 बळी मिळविले. न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी नीशमनेही चमक दाखविली. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना त्याने 2 बळी मिळवित ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवण्यात यश मिळविले. त्याने फलंदाजीतही केवळ 16 चेंडूत एक चौकार, 6 षटकारांचा पाऊस पाडत नाबाद 45 धावा झोडपल्या.

गुप्टिलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम

गुप्टिलने आपल्या खेळीत 6 चौकार व 8 षटकार ठोकून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार नोंदवण्याचा भारताच्या रोहित शर्माचा विक्रम मागे टाकला. रोहितने 127 षटकार मारले तर गुप्टिलचे आता 132 षटकार झाले आहेत. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची त्याने चौफेर धुलाई केली. मात्र तिसऱया टी-20 शतकापासून तो केवळ तीन धावांनी दूर राहिला. डॅनियल सॅम्सला षटकार मारण्याच्या प्रयत्नात स्टोईनिसने त्याचा झेल टिपला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. त्याने या खेळीत केवळ 27 चेंडूत अर्धशतकी मजल मारत टीकाकारांची तेंडे बंद केली. विल्यम्सनने त्याला पूरक साथ देत 35 चेंडूत 53 धावा फटकावल्या. सर्वाधिक षटकारांच्या यादीत इंग्लंडचा मॉर्गन (113) तिसऱया, न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो (107) चौथ्या, विंडीजचा ख्रिस गेल (105) पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय अन्य तीन फलंदाजांनी शंभरहून अधिक षटकार नोंदवले आहेत.

ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. पण नंतर ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि अखेरीस विजयासाठी त्यांना चार धावा कमी पडल्या. स्टोईनिस व सॅम्स यांनी सातव्या गडय़ासाठी 92 धावांची भागीदारी करून विजयाची संधी निर्माण केली होती. पण त्यांची कामगिरी पुरेशी ठरली नाही. सॅम्सने 15 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारासह 41 धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड 20 षटकांत 7 बाद 219 : गुप्टिल 97 (50 चेंडूत 6 चौकार, 8 षटकार), विल्यम्सन 53 (35 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), नीशम नाबाद 45 (16 चेंडूत 1 चौकार, 6 षटकार). गोलंदाजी ः केन रिचर्डसन 3-43, सॅम्स 1-46, झाय रिचर्डसन 1-39, ऍडम झाम्पा 1-43.

ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 8 बाद 215 : स्टोईनिस 78 (37 चेंडूत 7 चौकार, 5 षटकार), जोश फिलिप 45 (32 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), सॅम्स 41 (15 चेंडूत 2 चौकार, 4 षटकार), वेड 24 (15 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), अवांतर 8. गोलंदाजी ः सँटनर 4-31, नीशम 2-10, सोधी 1-41, साऊदी 1-47.

Related Stories

भारतीय मिश्र रिले संघाला रौप्य ऐवजी सुवर्णपदक

Patil_p

रेसिंग पॉईंटच्या पेरेझचे पहिले एफ वन जेतेपद

Patil_p

जोकोविच, रेऑनिक उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

भारताचे सहा मुष्टियोद्धे अंतिम फेरीत

Patil_p

मुंबई संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश

Patil_p

रिसेकी, कॉलिन्स, टॉमलिजेनोव्हिक विजयी

Patil_p
error: Content is protected !!