अवघ्या दुसऱयाच दिवशी भारताचा दणकेबाज विजय, कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी कालावधीतील आणखी एक विजय,


अहमदाबाद / वृत्तसंस्था
नव्याकोऱया नरेंद्र मोदी स्टेडियमवर अक्षर पटेलच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळय़ात अलगद सापडलेल्या इंग्लिश क्रिकेट संघाचा भारताने दुसऱया दिवशीच 10 गडी राखून धुव्वा उडवला आणि कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एका सोनेरी पानावर भारताने आपली मोहोर उमटवली. डावखुरी फिरकी गोलंदाजी टाकणाऱया अक्षर पटेलने सामन्यात अवघ्या 70 धावांमध्येच 11 फलंदाज गारद करण्याचा पराक्रम गाजवल्यानंतर भारताने येथील तिसरी कसोटी अवघ्या दोन दिवसातच जिंकली आणि 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
इंग्लंडला येथे दुसऱया डावात सर्वबाद 81 या भारताविरुद्ध आपल्या निचांकी धावसंख्येची नामुष्की पत्करावी लागली आणि इथेच जणू त्यांच्या पराभवाची दास्ताँ लिहिली गेली. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव सर्वबाद 112 धावांवर आटोपल्यानंतर भारताला पहिल्या डावात 145 धावा करता आल्या. त्यामुळे, त्यांच्याकडे 33 धावांची आघाडी होती. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 81 धावांमध्येच आटोपला आणि यामुळे भारतासमोर दुसऱया डावात 49 धावांचे अगदी किरकोळ आव्हान होते, ते त्यांनी सहजपणे पार केले.
विजयासाठी 49 धावांचे तुलनेने माफक पण, या खेळपट्टीवर आव्हानात्मक लक्ष्य असताना रोहित शर्माने 25 चेंडूत नाबाद 25 व शुभमन गिलने 21 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या आणि भारताने 7.4 षटकातच एकही गडी न गमावता इंग्लंडला धूळ चारत ऐतिहासिक विजय संपादन केला.
जो रुटचे 8 धावात 5 बळी
तत्पूर्वी, जो रुटच्या स्वप्नवत भेदक माऱयामुळे इंग्लंडने भारताचा पहिला डाव अवघ्या 145 धावांमध्येच उखडला होता. इंग्लिश कर्णधाराने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी साकारताना 6.2 षटकात 8 धावांमध्येच 5 फलंदाज गारद केले आणि त्याला सहकारी डावखुरा फिरकीपटू जॅक लीचने (20 षटकात 4/54) समयोचित साथ दिली.
भारतीय संघ एकवेळ या लढतीत 3 बाद 114 अशा भरभक्कम स्थितीत होता. पण, नंतर त्यांची फलंदाजी रूटसमोर जणू पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत राहिली आणि यजमानांनी आपले शेवटचे 7 फलंदाज अवघ्या 31 धावांमध्येच गमावले. भारताने या लढतीत 33 धावांची आघाडी घेतली होती, ती येथे निर्णायक ठरली.
रोहित-अजिंक्यनंतर घसरगुंडी
फलंदाजांसाठी दुःस्वप्न ठरलेल्या या खेळपट्टीवर रोहित शर्मा (96 चेंडूत 66) उत्तम बहरात होता. मात्र, तो बाद झाला, त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे (7) परतला आणि भारतीय संघाची जणू घसरगुंडीच सुरु झाली. रहाणे डावखुऱया मंदगती गोलंदाजांविरुद्ध फारसे यश मिळवू शकत नाही, याची पुनरावृत्ती येथेही झाली. लीचचा थेट यष्टीच्या रोखाने जाणारा चेंडू रहाणेच्या पॅडवर आदळल्यानंतर मैदानी पंच नितीन मेनन यांना त्याला बाद ठरवण्यासाठी फारसा विचार करावा लागला नाही.
वास्तविक, भारतीय संघाने या खेळपट्टीवर अतिशय आश्वासक सुरुवात केली होती. पण, नंतर अचानक ही खेळपट्टीच भारतासाठी आव्हान ठरु लागली आणि एकवेळ जसा इंग्लंडचा पहिला डाव गडगडत गेला, त्याप्रमाणे भारताच्या पहिल्या डावाला देखील गळती लागली. रोहितचा लीचच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला आणि मैदानी पंचांचा निर्णय अंपायर्स कॉल म्हणून रिव्हय़ूमध्येही कायम राहिला.
एकदा रोहित बाद झाल्यानंतर रुटने गोलंदाजीची मुख्य धुरा स्वीकारली आणि मायकल क्लार्कने ज्याप्रमाणे 2004 मध्ये मुंबई कसोटीत 9 धावात 6 बळी घेतले होते, त्या भेदकतेने येथे अहमदाबादमध्ये गोलंदाजी साकारत रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर (0), अक्षर पटेल (3) यांना ठरावीक अंतराने बाद करत भारताच्या डावाला पहिला सुरुंग लावला. एकवेळ तर रुटचे गोलंदाजी पृथक्करण 3 षटके, 3 निर्धाव व एकही धाव न देता 3 बळी, असे अचंबित करणारे होते. मैदानावरील रफमध्ये चेंडू टाकत त्याने डावखुऱया फलंदाजांचे बळी घेत दणकेबाज सुरुवात केली होती.
रुट बहरात असताना माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉनने भारतीय फलंदाज यॉर्कशायरच्या ऑफस्पिनर्सची गोलंदाजी खेळू शकत नाही, असे खोचक ट्वीट केले. भारताच्या पहिल्या डावातील शेवटच्या टप्प्यात रविचंद्रन अश्विन (17) व इशांत शर्मा यांनी थोडीफार फटकेबाजी केली.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव : सर्वबाद 112.
भारत पहिला डाव : रोहित शर्मा पायचीत गो. लीच 66 (96 चेंडूत 11 चौकार), शुभमन गिल झे. क्रॉली, गो. आर्चर 11 (51 चेंडूत 2 चौकार), चेतेश्वर पुजारा पायचीत गो. लीच 0 (4 चेंडू), विराट कोहली त्रि. गो. लीच 27 (58 चेंडूत 3 चौकार), अजिंक्य रहाणे पायचीत गो. लीच 7 (25 चेंडूत 1 चौकार), रिषभ पंत झे. फोक्स, गो. रुट 1 (8 चेंडू), रविचंद्रन अश्विन झे. क्रॉली, गो. रुट 17 (32 चेंडूत 3 चौकार), वॉशिंग्टन सुंदर त्रि. गो. रुट 0 (12 चेंडू), अक्षर पटेल झे. सिबली, गो. रुट 0 (2 चेंडू), इशांत शर्मा नाबाद 10 (20 चेंडूत 1 षटकार), जसप्रित बुमराह पायचीत गो. रुट 1 (12 चेंडू). अवांतर 5. एकूण 53.2 षटकात सर्वबाद 145.
गडी बाद होण्याचा क्रम
1-33 (गिल, 14.6), 2-34 (पुजारा, 15.5), 3-98 (विराट, 32.2), 4-114 (रहाणे, 38.2), 5-115 (रोहित, 40.1), 6-117 (रिषभ पंत, 41.1), 7-125 (वॉशिंग्टन सुंदर, 45.1), 8-125 (अक्षर, 45.3), 9-134 (अश्विन, 49.2), 10-145 (बुमराह, 53.2).
गोलंदाजी
जेम्स अँडरसन 13-8-20-0, स्टुअर्ट ब्रॉड 6-1-16-0, जोफ्रा आर्चर 5-2-24-1, जॅक लीच 20-2-54-4, बेन स्टोक्स 3-0-19-0, जो रुट 6.2-3-8-5.
इंग्लंड दुसरा डाव : झॅक क्रॉली त्रि. गो. पटेल 0 (1 चेंडू), डॉम सिबली झे. पंत, गो. पटेल 7 (25 चेंडू), जॉनी बेअरस्टो त्रि. गो. पटेल 0 (2 चेंडू), जो रुट पायचीत गो. पटेल 19 (45 चेंडू), बेन स्टोक्स पायचीत गो. अश्विन 25 (34 चेंडूत 3 चौकार), ओली पोप त्रि. गो. अश्विन 12 (15 चेंडूत 2 चौकार), बेन फोक्स पायचीत गो. पटेल 8 (28 चेंडू), जोफ्रा आर्चर पायचीत गो. अश्विन 0 (2 चेंडू), जॅक लीच झे. रहाणे, गो. अश्विन 9 (22 चेंडूत 1 चौकार), स्टुअर्ट ब्रॉड नाबाद 1 (7 चेंडू), जेम्स अँडरसन झे. पंत, गो. वॉशिंग्टन सुंदर 0 (3 चेंडू). एकूण 30.4 षटकात सर्वबाद 81.
गडी बाद होण्याचा क्रम
1-0 (क्रॉली, 0.1), 2-0 (बेअरस्टो, 0.3), 3-19 (सिबली, 8.3), 4-50 (स्टोक्स, 17.2), 5-56 (रुट, 18.5), 6-66 (ओली पोप, 21.6), 7-68 (आर्चर, 23.2), 8-80 (फोक्स, 28.2), 9-80 (जॅक लीच, 29.4), 10-81 (अँडरसन, 30.4).
गोलंदाजी
अक्षर पटेल 15-0-32-5, रविचंद्रन अश्विन 15-3-48-4, वॉशिंग्टन सुंदर 0.4-0-1-1.
भारत दुसरा डाव : रोहित शर्मा नाबाद 25 (25 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), शुभमन गिल नाबाद 15 (21 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 9. एकूण 7.4 षटकात बिनबाद 49.
गोलंदाजी
जॅक लीच 4-1-15-0, जो रुट 3.4-0-25-0.
भारताच्या पहिल्या डावात एकच षटकार, तो ही दहाव्या फलंदाजाचा!
यजमान भारताचा पहिला डाव अवघ्या 145 धावांमध्ये गुंडाळला गेला, आश्चर्य म्हणजे त्या डावात केवळ एकच षटकार फटकावला गेला आणि तो षटकारही खेचला, दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या इशांत शर्माने!
इशांतने यावेळी लीचच्या गोलंदाजीवर डावातील 50 व्या षटकात पुढे सरसावत लाँगऑफच्या दिशेने पहिला षटकार फटकावला. भारताच्या पहिल्या डावातील हा एकमेव षटकार ठरला. भारताने याशिवाय, या पहिल्या डावात 20 चौकार फटकावले, त्यातील 11 चौकार फक्त रोहित शर्माचेच होते.
जेव्हा जॉनी बेअरस्टो पहिल्या चेंडूवर बचावला व दुसऱया चेंडूवर बाद झाला!
इंग्लंडच्या दुसऱया डावाला डावाला सुरुंग लावण्याचे कर्तव्य पार पाडण्याचा विडा अक्षर पटेलने जणू पहिल्या चेंडूपासूनच उचलला होता. त्याने पहिल्या चेंडूवर क्रॉलीचा त्रिफळा उडवला. अर्थात, त्यानंतर पुढील दोन चेंडूत खरे नाटय़ रंगले, कारण, या दोन चेंडूंवर बेअरस्टो एकदा बाद होण्याच्या उंबरठय़ावर पोहोचला तर दुसऱया चेंडूवर खरोखरच बाद झाला. दुसऱया चेंडूवर बेअरस्टोला पंचांनी पायचीत दिले. मात्र, त्याने याविरोधात डीआरएस मागितला आणि रिव्हय़ूत चेंडू यष्टीच्या वर असल्याचे आढळून आले. अर्थात, अक्षर पटेलची भेदकता तिसऱया चेंडूवर राऊंड द विकेट मारा करताना पुन्हा फळली आणि बेअरस्टो त्रिफळाचीत होत तंबूत परतला. 2 चेंडूत शून्यावर परतणाऱया बेअरस्टोला यामुळे पहिल्या चेंडूवरील जीवदान अजिबात कामी आले नसल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या डावातही तो शून्यावर बाद झाला असल्याने त्याला या सामन्यात ‘चष्मा’ मिळाला.
भारताचेही शेवटचे 7 बळी 47 धावात तंबूत!
एकीकडे, इंग्लंडचे दोन्ही डाव अनुक्रमे 112 व 81 धावात उखडले गेले असताना दुसरीकडे, भारताचा पहिला डावही 145 धावांमध्येच आटोपला. अर्थात, भारताने या पहिल्या डावात 2 बाद 98 अशी आश्वासक स्थिती प्राप्त केली होती. पण, रोहित, रहाणे ही भरवशाची जोडी बाद झाली आणि पाहता पाहता भारताचे शेवटचे 7 फलंदाज अवघ्या 47 धावांमध्येच गारद झाले.
पंचगिरीबद्दल इंग्लंडची सामनाधिकाऱयांकडे तक्रार
इंग्लिश कर्णधार जो रुट व संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी पंचगिरीत ‘सातत्य’ नसल्याची तक्रार सामनाधिकारी जावगल श्रीनाथ यांच्याकडे केली. मैदानी पंचांबद्दल इंग्लिश कर्णधारांचे प्रश्न रास्त होते, अशी माहिती श्रीनाथ यांनी दिली. या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा संघ तिसरे पंच सी. शमशुद्दीन यांच्या दोन निर्णयांवर नाराज होता. यात बेन स्टोक्सने गिलचा झेल टिपला, तो निर्णय व बेन फोक्सचा रोहित शर्माला यष्टीचीत करण्याचा निर्णय, असे दोन निर्णय इंग्लंडच्या विरोधात गेले होते.
भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या उंबरठय़ावर
या विजयासह भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या मानांकन यादीत दुसऱया स्थानी झेप घेतली असून यामुळे त्या स्पर्धेतील फायनलमध्ये स्थान निश्चित करण्याच्या आशाअपेक्षाही अर्थातच उंचावल्या आहेत. जूनमध्ये इंग्लिश भूमीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल होणार असून न्यूझीलंडने त्यासाठी पहिले स्थान निश्चित केले आहे. इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या लढतीत आता भारताने केवळ बरोबरी प्राप्त केली तरी त्या फायनलमधील विराटसेनेचे स्थान निश्चित होणार आहे.
मोदी स्टेडियमवरील दोन दिवसांचा ‘खेळ’
दिवस / षटके / धावा / बळी
पहिला दिवस / 81.4 / 211 / 13
दुसरा दिवस / 58.2 / 176 / 17.