तरुण भारत

पुन्हा उद्रेकाची लक्षणे

कोरोना विषाणूने भारतात पुन्हा डेके वर काढल्याचे दिसत आहे. साधारणतः 15 ऑक्टोबरपासून 15 फेब्रुवारीच्या चार महिन्याच्या काळात त्याची लाट टप्प्याटप्प्याने ओसरल्याचे पहावयास मिळत होते. त्यामुळे लोकांची भीती बऱयाच प्रमाणात कमी झाली होती. मात्र, याचा परिणाम आरोग्यविषयक नियमांकडे सरसकट दुर्लक्ष करण्यात झाला होता. लोक आणि काही प्रमाणात प्रशासनदेखील निष्काळजी झाल्याचे दिसत होते. मास्कचा उपयोग आणि शारीरिक अंतर राखणे हे दोन्ही बाबी जणू इतिहासजमा झाल्याप्रमाणे लोकांची वागणूक होती आणि अद्यापही आहे. प्रचंड गर्दीच्या मिरवणुका, जाहीर सभा, लग्न व इतर कार्यक्रम आदी पुन्हा पूर्वीच्या जोषात सुरू झाल्याचे दिसत होते. पण गेल्या दहा दिवसांमध्ये पुन्हा रंगाचा बेरंग होत असल्याचे अनुभवास येत आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये प्रतिदिन जवळपास पन्नास टक्के या वेगाने नव्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याशिवाय पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातूनही रूग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण होणे साहजिक आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी नव्या रूग्णसंख्येने जवळपास 9 हजारांची पातळी गाठून दोन महिन्यांपूर्वीच्या काळाची आठवण करून दिली. सरकारने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या एका आठवडय़ात रूग्णसंख्येत जवळपास 35 टक्क्यांची वाढ झाली असून मृतांची संख्याही वाढली आहे. तसेच उपचाराधीन रूग्णांची संख्या, जी साधारणतः 1 लाख 35 हजारांच्या घरात होती, ती 1 लाख 50 हजारांहून अधिक झाली आहे. याचाच अर्थ असा की नव्या रूग्णांची संख्या बरे होणाऱयांच्या संख्येपेक्षा जास्त होत आहे. अनेक तज्ञांनी ही कोरोनाच्या दुसऱया लाटेची लक्षणे असल्याचे स्पष्ट केले असून लोकांना व प्रशासनाला अधिक सावध राहण्याची आणि त्वरित उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. या साऱया स्थितीत समाधानाची एक महत्वपूर्ण बाब म्हणजे आज भारताकडे दोन लसी उपलब्ध असून त्या प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे अनुभवास येते. शिवाय जगात इतर देशांमध्येही आणखी तीन ते चार लसी उपयोगात आणल्या जात असून त्यांचा परिणामही चांगला दिसून येत आहे. चार महिन्यांपूर्वी लसीच्या उपलब्धतेविना जगासह भारताची स्थिती अंधारात चाचपडत असल्यासारखी होती. या स्थितीत आपण केव्हा बाहेर पडणार, किंबहुना बाहेर पडणार तरी की नाही, अशा शंकांनी साऱयांच्या मनात घर केले होते. तथापि, समाधानाची बाब अशी की तशा स्थितीत दुसरी लाट भारतात आली नाही. युरोप, अमेरिका व इतर बलाढय़ देशांनाही त्याच काळात कोरोनाच्या दुसऱया लाटेने छळले होते. पण त्या मानाने भारत सुरक्षित राहिला होता. काही बेजबाबदार आणि स्वच्छंदी लोकांचा अपवाद वगळता इतर लोक शक्य तितक्या प्रमाणात दक्षता घेत होते आणि नियमांचे पालनही करत होते. प्रशासनानेही योग्य त्या उपाययोजना करून त्यांचे क्रियान्वयन चालविले होतेच. याचा संयुक्त परिणाम म्हणून परिस्थिती आटोक्यात आल्याचे जाणवत होते. तथापि, याच समजुतीमुळे जी अक्षम्य ढिलाई लोकांकडून आणि विशेषतः राजकारण्यांकडून दाखविली गेली त्यामुळे हे दुखणे उलटण्याची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुन्हा कठोर उपाययोजना करण्याची आणि अतिदक्षता बाळगण्याची वेळ आली आहे. लसी उपलब्ध असल्या तरी कोरोनाचीही नवी नवी रूपे मानवावर हल्ला करीत आहेत. ती किती प्रमाणात घातक आहेत, याचे अद्याप निश्चित उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्गच होऊ नये याची दक्षता प्रत्येकाला घ्यावी लागेल. कोरोनाच्या पहिल्या उद्रेकाला प्रत्युत्तर म्हणून देशव्यापी लॉकआऊट करण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून कोरोना रूग्णांची संख्या बरीच कमी राहिली. तसेच केंद्र व राज्य सरकारलांना तयारी करण्यासाठी वेळही मिळाला. ही वस्तुस्थिती निश्चितच आहे. लॉकडाऊनची मागणी सर्वच राज्यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्याशी विचारविमर्श करूनच तो निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी लॉकडाऊनची आवश्यकता निश्चितच होती. मात्र, याचा स्वाभाविक परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेची गती मंदावली आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढदर नकारात्मक झाला. आता त्या प्रकारचा संपूण लॉकडाऊन करणे सरकारला शक्य होणार नाही. कारण अर्थव्यवस्था यापेक्षा अधिक मंदावू देणेही शक्य नाही. त्यामुळे स्वतःच दक्ष राहणे, तसेच इतरांच्याही आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करणे हाच प्रमुख उपाय आहे. लॉकडाऊन करायचाच असेल तर तो मर्यादित आणि स्थानिक पातळीवरच काही वस्त्यांपुरता किंवा प्रभागांपुरता केला जाऊ शकतो. त्यामुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम कोरोना संपेपर्यंत कटाक्षाने पाळणे अनिवार्य समजले पाहिजे. जे लोक बेदरकारपणा करतात आणि हे नियम पाळत नाहीत, त्यांना समाजाने हे नियम पाळावयास भाग पाडण्याची आवश्यकता आहे. कारण, असे बेमुर्वतखोर लोक संख्येने थोडे असले तरी ते साऱया समाजाचे आरोग्य धोक्यात आणू शकतात. तसेच, काही लोक सरकारने संमत केलेल्या लसींसंबंधीच शंका उपस्थित करत आहेत. तसेच लसी खपविण्यासाठी कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, अशीही विकृत भाषा केली जात आहे. यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत असून सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत असा अपप्रचार चेष्टा म्हणून सुद्धा करू नये. कारण त्यामुळे समाजाची अपरिमित हानी होऊ शकते. सध्याचा काळ राजकारण करण्याचा, एकमेकांची उणीदुणी काढण्याचा आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा नाही. उलट ज्यांना लस घेणे शक्य आहे, तसेच जे लोक लस घेण्यासाठी वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहेत त्यांनी अवश्य स्वतःचे लसीकरण करून घ्यावे. कारण तोच एक निश्चित स्वरूपाचा उपाय सध्या आपल्या हाती आहे. त्यामुळे त्या मार्गात कोणीही कोणत्याही प्रकारे बाधा येईल अशी वर्तणूक करू नये. कोणताही पुरावा नसताना असा अपप्रचार केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांनीच आपापले उत्तरदायित्व ओळखून त्यानुसार एकमेकांना सहकार्य करून कोरोनाला हरविणे हेच ध्येय मानले पाहिजे.

Related Stories

रेल्वेने 9 हजार कोटी टन मसाला निर्यात

Patil_p

कोकणवासियांना धसका चाकरमान्यांचा!

Patil_p

रामें जिंकिला ग्लह निर्धारिं

Patil_p

लोकशाही ‘म्यान’

Patil_p

बुडत्याचा पाय खोलात म्हणजे सध्याची काँग्रेस

Patil_p

गोव्याचा पर्यटन उद्योग संकटात…

Omkar B
error: Content is protected !!