तरुण भारत

व्यापारी संघटनांचा आज ‘भारत बंद’

इंधन दरवाढ, जीएसटी तरतुदींचा निषेध नोंदवणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

व्यापाऱयांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सकडून (सीएआयटी) शुक्रवार, 26 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या देशव्यापी बंदला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविल्याने व्यापारी यंत्रणा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बंदच्या माध्यमातून दिवसेंदिवस होत असलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि जीएसटी तरतुदींचा निषेध नोंदवला जाणार आहे. या बंददरम्यान देशातील सर्व व्यापारी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

मुख्यत्वेकरून वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) तरतुदींच्या आढाव्याच्या मागणीसाठी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. देशभरातील 8 कोटी पेक्षा अधिक व्यापारी संपावर जाणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटनेच्या नेतृत्वाखाली जीएसटीतील काही तरतुदी मागे घेणे तसेच ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर बंदी घालण्याच्या मागणीवरून भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. या दिवशी देशभरातील सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहतील, असा दावा संघटनेने केला आहे. देशाच्या विविध भागात व्यापारी संघटनांच्या नेतृत्त्वाखाली रास्तारोको करण्यात येणार आहे. या माध्यमातून इंधनावरील करात कपात करून पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्याची मागणीही बुलंद केली जाणार आहे.

विविध संघटनांचा बंदला पाठिंबा देशातील वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने या बंदला पाठिंबा देण्याबरोबरच वाहतुकीचा चक्काजाम करण्याचीही घोषणा केली आहे. याचबरोबर मोठय़ा संख्येत अनेक राष्ट्रीय व्यापारी संघटनांनीही व्यापार बंदला पाठिंबा दर्शविला असून यात ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ ऍल्युमिनियम यूटेंसिलस मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पाइसिस ट्रेडर्स असोसिएशन, ऑल इंडिया वुमन एंटेरप्रिनियर्स असोसिएशन, ऑल इंडिया कॉम्प्युटर डिलर असोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इत्यादींचा समावेश आहे.

कर्नाटकात ट्रक मालकांचा आज संप

बेंगळूर दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यभरात ट्रक बंद ठेवण्यात येणार आहेत. कर्नाटक राज्य ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष षण्मुगप्पा यांनी याविषयी माहिती दिली. 1 कि. मी. ट्रक धावण्यासाठी मालकांना 36 रुपये खर्च येत आहे. राज्यभरातून 40 हजार ट्रक विविध ठिकाणी ये-जा करत असतात. परराज्यात डिझेलचे दर कमी आहेत. त्यामुळे राज्यातही डिझेलवरील कर 3 रुपयांनी कमी करावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. टोल, विमासह इंधनाचे दर वाढविण्यात आल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी सांकेतिकपणे संप पुकारण्यात येत आहे. सरकारने आपल्या मागण्यांसंदर्भात चर्चेसाठी पुढाकार न घेतल्यास 15 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

Related Stories

टोळधाडीचा सामना करण्यास कर्नाटक सरकार सज्ज

Rohan_P

शहतूत धरणासंबंधी भारत-अफगाणिस्तान यांच्यात करार

Patil_p

एका तासात शाहीन बाग साफ होईल!

Patil_p

12 राज्यांमधील पोटनिवडणूक जाहीर

Patil_p

राज्यसभा उपसभापतिपदासाठी राजदचे मनोज झा उमेदवार

Patil_p

राम जन्मभूमी ट्रस्ट : एक विश्वस्त दलित समाजातील : अमित शहा

prashant_c
error: Content is protected !!