सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विवाहित हिंदू महिलेच्या संपत्तीवर तिचे वडील आणि वडीलांचे वारसदार यांचाही अधिकार आहे. त्यांना यापासून वेगळे ठेवता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचाच अर्थ असा की विवाहित हिंदू महिलेच्या संपत्तीवर तिच्या माहेरच्यांचाही अधिकार कायद्याप्रमाणे आहे.
हिंदू वारसा कायद्याच्या अनुच्छेद 15 (अ) (ड) नुसार हिंदू विवाहित महिलेच्या माहेरचे नातेवाईक, म्हणजेच तिचे वडील, भाऊ, बहिणी, आई इत्यादी लोकही तिच्या संपत्तीचे वारसदार ठरतात. हिंदू वारसा कायदा त्यांना हा अधिकार देतो. या नातेवाईकांना या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही, असे या निर्णयात सांगण्यात न्या. अशोक भूषण आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांनी स्पष्ट केले.
एका हिंदू विवाहित महिलेने तिच्या संपत्तीतील काही वाटा तिच्या भावाच्या मुलांना दिला होता. त्याला या महिलेल्या दिराच्या मुलांनी विरोध केला. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहचले. कनिष्ठ व उच्च न्यायालयाने हा वाटा देण्याची कृती कायदेशीर असल्याचा निर्णय दिला. त्यावर दिराच्या मुलांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. कुटुंब ही एक व्यापक संकल्पना आहे. त्यात महिलेचे माहेर आणि सासर या दोन्ही घरांमधील नातेवाईकांचा समावेश होतो. त्यामुळे विवाहित महिलेच्या माहेरचे नातेवाईकही तिच्या संपत्तीचे वारसदार ठरतात. त्यांच्या अधिकाराला विरोध केला जाऊ शकत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.