तरुण भारत

गोमंतकीयांनाही आता ‘टोल’ चा भुर्दंड

फास्टॅग नोंदणीसाठी वाहनमालकांना केंद्राचे संदेश,अन्यथा दंडनीय गुन्हा ठरवून कारवाईचाही इशारा,वरिष्ठ वाहतूक अधिकाऱयाकडून वृत्तास दुजोरा

जय उत्तम नाईक / पणजी

राज्यात सध्यस्थितीत कोणत्याही रस्त्यासाठी टोल आकारणी होत नसली तरीही राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत येथे चालू असलेली बांधकामे पाहता येत्या एक दोन वर्षात गोमंतकीयांनाही रस्त्यांच्या वापरासाठी टोल फेडावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय रस्ता आणि महामार्ग मंत्रालयाने गोव्यात नोंदणीकृत वाहनांनाही फास्टॅग नोंदणी करण्यासंबंधी पाठविलेल्या संदेशावरून हे स्पष्ट झाले आहे व वाहतूक खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने त्यास दुजोराही दिला आहे.

केंद्र सरकारने देशभरात लागू केलेल्या नवीन मोटर वाहन कायद्यातील अनेक जाचक नियम आणि प्रचंड दंडाच्या तरतुदीमुळे आधीच वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली होती. परिणामस्वरूप अनेक राज्यांनी अद्याप एकतर त्याची अंमलबजावणी केलेली नाही किंवा चालढकल चालविली आहे. अशा परिस्थितीत आता केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 नुसार फास्टॅग सक्तीचे करण्यात आले असून वाहनमालकांना आणखी एक आर्थिक भुर्दंड झेलावा लागणार आहे.

 किमान किंमत भरून नोंदणी करावी

मंत्रालयाने पाठविलेल्या संदेशात पुढे, सदर नोंदणी न करणे हा केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 नुसार दंडनीय गुन्हा असल्याचा इशारा दिला असून ’आजच फास्टॅग घ्या’ असे सूचविले आहे. त्यासंबंधी सदर वरिष्ठ वाहतूक अधिकाऱयास विचारले असता, ’आज ना उद्या हे होणारच होते. आता सदरच्या संदेशामुळे ते सिद्धच झाले आहे’, असे ते म्हणाले. तसेच ’पुढील कारवाई व दंड टाळण्यासाठी प्रत्येक वाहन मालकाने किमान किंमत भरून निदान नोंदणी तरी करून ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

फास्टॅग अत्त्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली

फास्टॅग ही रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन तंत्रज्ञावर आधारित इलेक्ट्रॉनिक टोल गोळा करणारी प्रणाली. केंद्रीय रस्ता आणि महामार्ग प्राधिकरणाकडून तिचे संचलन होते. त्याद्वारे टोलची रक्कम वाहनमालकाच्या बँक खात्यातून थेट टोल मालकाच्या खात्यात जमा करणे शक्य होते. त्यासाठी वाहन मालकास सरकारी मान्यताप्राप्त केंद्रातून फास्टॅग विकत घ्यावा लागतो. सदर टॅग संबंधित वाहनाच्या पुढील काचेवर ठराविक ठिकाणी चिकटविण्यात येतो. असे वाहन नाक्यावर पोहोचले असता टोल भरण्यासाठी अन्य वाहनांच्या गर्दीत रांगेत थांबावे लागत नाही. त्यांच्यासाठी खास उपलब्ध करण्यात आलेल्या लेनमधून थेट जाता येते.

टॅग स्कॅन झाल्यानंतर टोल फेडला जातो

या लेनमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन यंत्रणेद्वारे वाहनावरील टॅग स्पॅन होतो आणि लगेच टोलची रक्कम वाहनमालकाच्या खात्यातून वजा होते. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होते व 3 सेकंदांच्या आत वाहन नाका पार करून जाऊ शकते. या पद्धतीमुळे एकतर वाहन चालकाचा वेळ वाचणार आहे. त्याशिवाय सुटय़ा पैशांवरून होणारी घासाघीस, वाद, (प्रसंगी भांडणे सुद्धा) संपणार आहेत. भरीस फिरते विक्रेते, भिकारी यांच्या कटकटीतूनही मुक्ती मिळणार आहे.

प्रारंभीच्या काळात फास्टॅगच्या विक्रीसाठी देशातील पेट्रोलपंपवर केंद्रे स्थापन करण्यात आली. त्यासाठी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी केंद्र सरकारकडे समझोता करार केला होता. आता अनेक राष्ट्रीयकृत बँकातूनही फास्टॅग ची विक्री करण्यात येत आहे.

प्रत्यक्षात फास्टॅग तंत्रज्ञान वर्ष 2014 पासूनच प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आले होते. अहमदाबाद-मुंबई आणि दिल्ली-मुंबई या ‘सुवर्ण चतुष्कोण’ महामार्गावर सर्वप्रथम टोल वसुली करण्यात आली होती. त्यानंतर जुलै 2015 मध्ये चेन्नई-बंगळूर महामार्गावर या तंत्रज्ञानातून टोल आकारणीस प्रारंभ झाला. अशा प्रकारे  एकेक करत नोव्हेंबर 2016 पर्यंत देशात सुमारे 347 ठिकाणी तर सप्टेंबर 2019 पर्यंत सुमारे 500 टोल प्लाझावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

फास्टॅग नसल्यास दुप्पट आकारणी

डिसेंबर 2019 पासून देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग सक्तीचे करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्या तारखा वेळोवेळी बदलत गेल्या. हल्ली हल्ली म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून अंमलबजावणी करण्याचे सुद्धा निश्चित करण्यात आले होते. तोही मुहूर्त चुकवत शेवटी 15 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी प्रारंभ झाली आहे. त्यानुसार आता देशातील एकुणएक नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य झाले आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनास नाक्यावरील कोणत्याही लेनमधून जाता येणार नाही. तरीही एखाद्या वाहनाने तेथून जाण्याचे प्रयत्न केल्यास दंडस्वरुपात दुप्पट रक्कम आकारणी करण्यात येईल. या कामासाठी प्रत्येक नाक्यावर ’मार्शल’ नियुक्त करण्यात येणार असून त्यांच्या दिमतीला असंख्य सीसीटीव्ही पॅमेरेही 24 तास कार्यरत राहणार आहेत.

त्याचबरोबर एवढी सर्व यंत्रणा कार्यान्वित करूनही एखाद्या टोलनाक्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांना ताटकळत राहावे लागल्यास ठराविक अंतरापर्यंतच्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही, अशी माहितीही प्राप्त झाली आहे.

गोव्यात सध्या पाच राष्ट्रीय महामार्ग

गोव्यातून सध्या पाच राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यातील महामार्ग क्र. 748 ची गोव्यातील लांबी 69.55 कि. मी. आहे. महामार्ग क्र. 66 ची गोव्यातील लांबी 137.55 कि. मी. आहे. महामार्ग क्र. 366 ची गोव्यातील लांबी 16.45 कि. मी. आहे. महामार्ग क्र. 566 ची गोव्यातील लांबी 38.45 कि. मी. आहे. महामार्ग क्र. 748 एए ची गोव्यातील लांबी 30.09 कि. मी. आहे. या सर्व रस्त्यांच्या वापरासाठी भविष्यात टोल वसुली होण्याची शक्यता असल्याचे सदर वाहतूक अधिकाऱयाने सांगितले.

Related Stories

ऑनलाईन अभ्यासक्रमा विरोधात सत्तरीतील महिला आक्रमक

Omkar B

दहा रुपायांसाठी 50 हजारांना लुबाडले

Patil_p

सीएमएम अरेनामध्ये ख्रिसमसनिमित्त ऑफर

Omkar B

साखळी ते विठ्ठलापूर पुलाचे काम युध्दपातळीवर

Amit Kulkarni

एनसीबीने हेमंत साहाच्या आवळल्या मुसक्या

Amit Kulkarni

महिला पोलिसाने राय येथे पद्यातून केली जनजागृती

Omkar B
error: Content is protected !!