तरुण भारत

सर्वांच्या नजरा सभापतींच्या निर्णयाकडे

आमदार अपात्रता याचिकेवर आज सुनावणी : काँग्रेसच्या दहा, मगोच्या दोन आमदारांचा प्रश्न

प्रतिनिधी / पणजी

काँग्रेस पक्षातून विभक्त होऊन भारतीय जनता पक्षात विलीन झालेले 10 आमदार तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे भाजपमय झालेल्या दोन आमदारांच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी आज 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा. सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर सुरु होणार आहे. दोन्ही पक्षात झालेली ही उभी फूट विलिनीकरण की निव्वळ पक्षांतर हे ठरवण्याकडे कस लागणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पक्षांतर बंदी कायद्याच्या तसेच भारतीय घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे कलम 191 (2) अंतर्गत सभापती याचिकादार आणि प्रतिवाद्यांची बाजू ऐकून घेणार आहेत. ही सुनावणी सभापतींच्या चेंबरमध्ये होईल असे विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांनी पक्षकारांना नोटीस बजावताना कळविले आहे.

सुदिन ढवळीकरांचा पहिला मान

सभापतींसमोर पहिली सुनावणी सकाळी 10.30 वाजता ठेवण्यात आली आहे. अपात्रता याचिका क्र. 1/2019 चे याचिकादार रामकृष्ण उर्फ सुदिन माधव ढवळीकर यांनी स्वतः अथवा वकील किंवा त्यांच्या प्रतिनिधीमार्फत बाजू मांडावी असे त्यांना कळविण्यात आले आहे. बाजू मांडण्याचा पहिला मान त्यांना देण्यात आला आहे.

आजगावकर, पाऊसकर यांना नोटिस

या याचिकेत प्रतिवादी म्हणून मनोहर त्रिंबक आजगावकर व दीपक पाऊसकर यांना नोटीस देण्यात आली आहे. वादी आणि प्रतिवाद्यांना फक्त अर्धातास देण्यात आला असून हजेरी न लावल्यास त्यांच्या गैरहजेरीत निवाडा दिला जाईल, याची दखल घ्यावी, असे त्यांना कळवण्यात आले आहे.

दुसरी सुनावणी 11 वाजता

अपात्रता याचिका क्र. 3/2019 ची सुनावणी सकाळी 11 वा. ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वेळेवर हजर रहाण्याचे याचिकादार गिरीश चोडणकर यांना कळविले आहे. या याचिकेत आमदार चंद्रकांत कवळेकर, आंतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, क्लाफासिओ डायस, विल्प्रेड डिसा, नीळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस व टोनी आंतोनिओ फर्नांडिस प्रतिवादी आहेत.

सभापतींसमोरील तांत्रिक अडचणी

याचिकेवरील सुनावणी घेण्यासाठी किमान 30 दिवसांची नोटीस देणे आवश्यक होते, पण सभापतींनी दि. 4 फेब्रुवारी 2021 रोजी नोटीस बजावून दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सुनावणी ठेवून पक्षकारांना तयारी करण्यास फक्त 22 दिवसांचा अवधी दिला. त्यामुळे तांत्रिक हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे.

सुनावणी तहकूब होणार नाही

अपात्रता याचिकेवरील सुनावणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून याचिकादार गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्याची जबाबदारी सभापतींवर असून सुनावणी पुढे ढकलण्याची अथवा बाजू मांडण्यास वेळ देण्याची मागणी सभापती स्वीकार करू शकणार नाहीत. त्यामुळे सुनावणी तहकूब होण्याची शक्यता कमी वर्तविली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयातील वकील येणार

काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी ऍडव्होकेट जनरल कार्लुस आल्वारिस फरेरा बाजू मांडणार आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील तथा घटनातज्ञ अभिषेक सिंघवी सभापतींसमोर बाजू मांडण्यास येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या वतीने ऍड. एस. एन. जोशी यापूर्वी सभापतींसमोर हजर राहिले होते. आता वकील बदलला जाण्याची शक्यता आहे.

आमदार अपात्रता प्रकरणाचा घटनाक्रम

  • 1. दि. 4 जून 2019 : सभापती म्हणून राजेश पाटणेकर यांनी ताबा घेतला.
  • 2. दि. 28 जून 2019 : मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी आपल्या दोन आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका सादर केली.
  • 3. दि. 8 ऑगस्ट 2019 : गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसच्या 10 आमदारांविरुद्ध सभापतींसमोर अपात्रता याचिका सादर केली.
  • 4. दि. 15 सप्टेंबर 2019 : सभापतींनी प्राथमिक सुनावणी घेतली.
  • 5. दि. 24 जानेवारी 2020 : सभापतींनी वादी प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या व सुनावणी दि. 13 फेब्रुवारी 2020 रोजी होणार असल्याचे कळविले.
  • 6. दि. 13 फेब्रुवारी 2020 : उत्तर सादर करण्यास प्रतिवादी आमदारांनी 5 आठवडय़ांची मुदत मागून घेतली.
  • 7. दि. 16 मार्च 2020 : कोविड 19 लॉकडाऊनमुळे सभापतींनी सुनावणी तहकूब केली.
  • 8. दि. 4 फेब्रुवारी 2021 : नोटीस बजावून दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सुनावणी ठेवण्यात आली. 26 फेब्रुवारी 2021 ः आजच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा.

Related Stories

इतिहास अभ्यासासाठी शस्त्रांची भूमिका महत्वाची

Amit Kulkarni

कडव्या झुंजीनंतर जमशेदपूरचा बेंगलोरवर 3-2 असा विजय

Amit Kulkarni

सत्तरीतील कोरोना पोझीटिव्ह रुग्णाच्या संख्येत वाढ .एकुण संख्या 11

Omkar B

विरोधी पक्षनेते कामत यांच्याकडून केपेतील उमेदवार नाईक यांची भेट

Amit Kulkarni

दादरा नगरमधील ते 41 दिवस…

Omkar B

योग शिक्षक आचार्य राजेशकुमार ठक्कर गोव्याचे प्रभारी

Patil_p
error: Content is protected !!