तरुण भारत

ऑनलाईन बसपास प्रक्रिया विद्यार्थ्यांना ठरतेय डोकेदुखी

जुन्या बसपासची मुदत 28 फेब्रुवारीला संपणार : तांत्रिक समस्यांमुळे विद्यार्थी हैराण

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनामुळे बऱयाच काळासाठी बंद असलेल्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे बसपासची मागणीही वाढली. मात्र, यंदा परिवहनने पहिल्यांदाच ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू केल्याने ती विद्यार्थ्यांना डोकेदुखी ठरत आहे.   त्यामुळे विद्यार्थ्यांनी बसपासकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ 24 हजार विद्यार्थ्यांनीच बसपास मिळविले आहेत.

शाळा सुरू झाल्याने बसपासच्या आधारे प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, जुन्या बसपासची मुदत दि. 28 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे 1 मार्चपासून विद्यार्थ्यांना नवीन बसपास मिळविणे अनिवार्य आहे. मात्र, ऑनलाईन बसपास प्रकियेमुळे विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने बसपास मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. ऑनलाईन बसपास काढताना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सेवा सिंधू संकेतस्थळावर बसपाससाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळविताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलमध्ये असलेल्या तांत्रिक समस्यांमुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. परिवहनने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचा प्रवास जुन्या बसपासवरच सुरू आहे. मात्र, 1 मार्चपासून विद्यार्थ्यांना नवीन बसपास बंधनकारक आहे. 

आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे बंधनकारक असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सायबर कॅफे, कर्नाटक वन, अटलजी जनस्नेही केंद्र आदी ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. ऑनलाईन अर्ज करताना शाळेची शुल्क पावती, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड आदी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागत आहेत. दरम्यान, पोर्टल व्यवस्थित चालत नसल्याने प्रमाणपत्र अपलोड करताना अडचणी निर्माण होत आहेत. 

पूर्वीची बसपास प्रक्रिया सुटसुटीत

यापूर्वीची बसपास प्रकिया विद्यार्थ्यांना सुटसुटीत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत बसपास मिळायचे. विहीत नमुन्यातील अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून दिल्यास बसपास उपलब्ध व्हायचे. मात्र, यंदा प्रक्रिया पूर्णपणे बदल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळविताना अडचणी निर्माण होत आहेत. यंदा परिवहनने अवलंबिलेली ऑनलाईन प्रक्रिया विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे.

Related Stories

ऐनापूर येथे गांजा विकणाऱया दोघा जणांना अटक

Patil_p

एस.जी.बाळेकुंद्री कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

Patil_p

महात्मा फुले मार्केटचे प्रवेशद्वार केले सील

Patil_p

कामगार संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक

Patil_p

भाविकांच्या देणगीतून मरगाई मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णत्वास

Amit Kulkarni

चोरटय़ांकडून ग्रामीण भागातील मंदिरांना लक्ष्य

Patil_p
error: Content is protected !!