तरुण भारत

राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात आता सिंहांची गर्जना

भुतरामहट्टी येथील मिनी झूमध्ये तीन सिंह दाखल; जंगलच्या राजाचे होणार दर्शन

प्रतिनिधी / बेळगाव

शहरापासून अवघ्या आठ-दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात तीन सिंह दाखल केले असून आता पर्यटकांना सिंहांची गर्जना ऐकू येणार आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने वन्यप्राणी आणि पक्षी ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार गुरुवारी पहाटे या प्राणी संग्रहालयात तीन सिंह दाखल झाले असून या सिंहांची होल्डींग रुममध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आता या बरोबरच वाघ, चित्ता, अस्वल, गवीरेडे, कोल्हे, हरिण हे वन्यप्राणीही दाखल होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 बेंगळूर शेजारी असलेल्या बन्नेरघट्टा बायोलॉजीकल पार्क येथून दोन नर तर एक मादी असणारे नकुल, कृष्ण आणि निरुपमा अशी नावे ठेवलेले सिंह आणण्यात आले आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांचे योग्य संवर्धन व्हावे, याकरिता संग्रहालयात नियोजनबद्ध बांधणी करण्यात आली आहे. तब्बल 34 एकरात हा मिनी झू पसरला असून यामध्ये सिंहांसह वाघ, चित्ता, अस्वल व कोल्हय़ांसाठी विशेष होल्डिंग रूम व आवास कोठडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी बन्नेरघट्टा येथून आणलेल्या तीन सिंहांना ठेवण्यात आले असून आता बेळगावकरांना जंगलच्या राजांचे (सिंह) दर्शन होणार आहे.

म्हैसूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाचा विकास साधण्यात येत आहे. या निसर्गधामाचे आता मिनी प्राणी संग्रहालयात रुपांतर झाले असून या ठिकाणी वन्यप्राण्यांची व्यवस्था व्हावी, या करिता नियोजनबद्ध बांधणी करून निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून लवकरच या प्राणी संग्रहालयात सिंहांबरोबर आता वाघ, चित्ता अस्वल, गवीरेडे, कोल्हे, हरिण दाखल होणार आहेत. याशिवाय पक्षीही ठेवण्यासाठी विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच विविध जातींचे पक्षीही येथे आणण्यात येणार आहेत. सध्या तीन सिंह दाखल झाले तरी आणखी एक सिंह लवकरच दाखल होणार आहे. याकरिता केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

स्वप्न पूर्ण होणार

या मिनी झूमध्ये टायगर सफारी आणि टायगर घर निर्मितीची योजनाही आखण्यात आली आहे. हे कामदेखील पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे पर्याटकांना लवकरच टायगर सफारीचा आनंद लुटता येणार आहे. बेळगावकरांचे टायगर सफारीचे स्वप्न पूर्ण होणार असून पर्यटकांचीही संख्या वाढणार आहे.

Related Stories

डॉ.भूषण सुतार यांचा शांताई-क्रिश फौंडेशनतर्फे सत्कार

Patil_p

न्यायालयाच्या आवारासमोरच पक्षकार ताटकळत

Patil_p

आयकर विभागातर्फे कार्यक्रम

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 66 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Rohan_P

मण्णूरला जोडणाऱया मुख्य रस्त्याची दुर्दशा

Amit Kulkarni

मुलांच्या हक्काबाबत येळ्ळूरमध्ये जनजागृती

Omkar B
error: Content is protected !!