तरुण भारत

कोल्हापूर : टोप खणीचा सातबारा महापालिकेच्या नावावर !

संजीव खाडे / कोल्हापूर

टोप (ता. हातकणंगले) येथील साडेसोळा एकर जागेतील खणीचा सातबारा कोल्हापूर महापालिकेच्या नावावर झाल्यानंतर गुरूवारी जागेच्या मोजणीची प्रक्रिया पार पडली.  भूमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱयांनी महापालिका अधिकाऱयांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने मोजणी प्रक्रिया पूर्ण केली. टोप खणीच्या जागेत इनर्ट मटेरियल टाकून महापालिका भविष्यात लँड फिल साईट (भूभरण क्षेत्र) विकसित करणार आहे.

कोल्हापूर शहरातील कचऱयाच्या निर्गतीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून गंभीर बनत आहे. शहराबरोबर उपनगरातील वाढत्या नागरीकरणामुळे कचऱयाचे प्रमाणही वाढत आहे. सध्या कसबा बावडा येथील जागेत झूम प्रकल्प सुरू आहे.   शहरात दररोज संकलित होणारा कचरा तेथे डंप केला जातो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. तसेच कचऱयापासून वीज निर्मिती, खत निर्मिती करण्यात येते. मध्यंतरीच्या काळात कचऱयाचे वाढते प्रमाण, अन्यत्र पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने झूम प्रकल्पावर निर्माण झालेले कचऱयाचे डोंगर आरोग्य विषयक चिंता वाढविणारे ठरले होते. दरम्यानच्या काळात महापालिकेने अन्य जागांचा शोध सुरू ठेवला होता. टाकाळा येथील खण देखील इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी लँड फिल साईट म्हणून विकसित करण्यात आली. त्याआधी म्हालसवले येथील खणीचा पर्याय होता. तो विरोधामुळे मागे पडला. त्यानंतर टोपच्या खणीचा पर्याय पुढे आला पण त्याला स्थानिक ग्रामपंचायतीने विरोध केला. प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडे गेले. तेथे महापालिकेच्या बाजून निकाल देताना लवादाने पर्यावरण आणि प्रदूषण विषयक नियम आणि अटी घातल्या. पण लवादाच्या विरोधात टोप ग्रामपंचायतीने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. तेथे झालेल्या सुनावणीत लवादाच्या अटीनुसार लँड फिल साईट विकसित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 16 मे 2018 रोजी कोल्हापूर महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर खणीच्या जागेवर महापलिकेचे नाव लावण्याची महसुली प्रक्रिया सुरू होती. ती झाल्यानंतर गुरूवारी जागा मोजणी करण्यात आली. हातकणंगले भूमिअभिलेख विभागाचे परीक्षक भूमापक पाटील (वाठार तर्फ वडगाव-हायवे वाठार), महसूल विभागाच्या वतीने मंडल अधिकारी गणेश बरगे, चौगुले आणि त्यांचे सहकारी, महापालिकेच्या वतीने पशूवैद्यकीय अधिकारी तथा घनकचरा प्रकल्पाचे नोडल ऑफिसर डॉ. विजय पाटील, सर्व्हेअर शाम शेटे, प्रवीण बावडेकर, आरोग्य निरीक्षक मनोज लोट मोजणीवेळी उपस्थित होते. मोजणीवेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. भोसले यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 45 पोलीस कर्मचाऱयांच्या ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता.

असे होणार टोप खणीत भूभरण

16.5 एकर जागेच्या सीमेवर पाच फूट उंचीची संरक्षक भिंत बांधली जाणार, खणीत जाण्यासाठी रस्ता बांधला जाणार, वीज यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, कार्यालय इमारतीची उभारली केली जाणार. ही कामे पूर्ण दोन तीन वर्षात पूर्ण झाल्यानंतर  इनर्ट मटेरियल टाकून भूभरण क्षेत्र अर्थात लँड फिल साईट विकसन सुरू होणार.

इनर्ट मटेरियल म्हणजे काय?

प्रक्रिया करून शिल्लक राहिलेला कचरा किंवा ज्यावर प्रक्रिया होत नाही असा कचरा अर्थात माती, खर माती आणि दगड रूपी कचऱयाला इनर्ट मटेरियल  म्हणतात. त्याचा पर्यावरण, मानवी आरोग्याला धोका निर्माण होत नाही. 

2060 पर्यंत टोप खण इनर्टने भरणार

इर्नट मटेरियलच्या रूपाने टोप खणीत संपूर्ण भूभरण क्षेत्र म्हणून विकसित होण्यास पुढील चाळीस वर्षांचा कालावधी लागेल असा महापालिकेचा अंदाज आहे. त्यामुळे 2060 पर्यत कोल्हापूरचा कचऱयाचा प्रश्न सुटणार आहे.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण आणि नागरी आरोग्याचा विचार करून घातलेल्या अटी, शर्तीनुसार टोप खणीत केवळ इनर्ट मटेरियल टाकले जाईल. पर्यावरण आणि नागरिकांच्या संरक्षणाची काळजी घेतली जाईल. -डॉ. विजय पाटील, नोडल ऑफिसर घनकचरा प्रकल्प, कोमनपा.

Related Stories

चौथी माळ : करवीर निवासिनीची आज ‘ओमकाररुपिणी’ स्वरूपात पूजा

triratna

कोल्हापूर विमानतळास भारत सरकारचा वाटर डायजेस्ट अवॉर्ड

triratna

कोल्हापूर : मलकापूर शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

triratna

सिमाभागातील विद्यार्थ्यांसाठी 1 जानेवारी पासून शैक्षणिक संकुल

triratna

गोकुळकडून सिध्‍दगिरी हॉस्‍पीटलला व्‍हेंटिलेटर प्रदान

triratna

डीपी युनिटचे काम कागदावर आणि पगार खात्यावर

triratna
error: Content is protected !!