तरुण भारत

मराठी भाषा दिन

नेमेचि येणारा मराठी दिन आला, साजरा झाला आणि गेला. शासनाने आम्हाला संदेश दिले. मुलांना-नातवंडांना इंग्रजी शाळेत घालणाऱया लेखकांनी-नेत्यांनी मराठी शाळा ओस किंवा बंद पडल्याबद्दल खेद व्यक्त केले आणि पालकांना आवाहन केले की मुलांना मराठी शाळेत घाला. मराठी भाषा अभिजात केव्हा होणार म्हणून काहींनी गर्जना केल्या. मराठी भाषा अभिजात ठरल्यावर नेमके काय होणार आहे, कोणते दुकान लागणार आहे हे गुपित मात्र कोणी सांगितले नाही, सांगणार नाहीत. सामान्य वाचकांनी त्याच ठरावीक कविता उद्धृत करून वर्तमानपत्रातले पत्रांचे रकाने सजवले. काहींनी समाजमाध्यमातल्या भिंती रंगवल्या. अमुकच तारखेला मराठी दिन साजरा का करायचा, कुसुमाग्रज कोण लागून गेले वगैरे नेहमीच्या विषयांवर सालाबादप्रमाणे पोकळ आणि फुसके वाद घालून झाले.

‘मराठी वर्ड्स रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं’ हा विनोद दरवषी केला नाही तर मराठी भाषा दिनाचा समारंभ साजरा होत नाही अशी अनेक मराठी माणसांची समजूत असते. त्यामुळे समाजमाध्यमांवर हा विनोद देखील असंख्य लोकांनी भक्तिभावाने शेअर केला.

Advertisements

केबलवाल्याने टीव्हीवर दिवसभर काही अश्रुपातकर मराठी सिनेमे दाखवले. जेवता जेवता आम्ही ते बघण्याचा (प्रत्येकी पाच पाच मिनिटे) प्रयत्न केला. तोवर जेवण गार होते आहे म्हणून बायको करवादली. मुकाटय़ाने चार घास खाल्ले आणि हात धुवून वामकुक्षीसाठी बिछान्याकडे प्रस्थान केले. पंखा लावून पडल्या पडल्या एक वर्तमानपत्र चाळू लागलो असताना एका मराठी वाहिनीच्या जाहिरातीवर नजर पडली. हर! हर! रात्री 9 पी. एम. वाजता सदर वाहिनी ‘डान्स मचवणार आहे’ अशी आमच्या ज्ञानात भर पडली. पण रात्री 9 पी. एम. वाजता म्हणजे काय? आम्हाला रात्री 9 वाजता किंवा 9 पी. एम. या दोनच वेळा ठाऊक आहेत. ते जाऊ देत. ‘डान्स मचवणे’ म्हणजे काय? आमच्या घरात शब्दरत्नाकर, मोल्सवर्थ आणि भाटवडेकरांचा व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश आहेत. इंटरनेटवर दाते-कर्वे शब्दकोश आहे. ‘डान्स मचवणे’चा अर्थ एकाही शब्दकोशात आढळला नाही. जॉन केनेडींचा खून झाला होता तेव्हा दैनिक मराठाच्या पहिल्या पानावर हेडलाईन होती  ‘अमेरिका हे खुन्याचे राष्ट्र आहे, हे राष्ट्र भूतलावरून नष्ट होवो!’ मनाच्या पडद्यावर मराठी वाहिन्यांबद्दल असाच काही मजकूर प्रकट झाला आणि बघता बघता गाढ झोप लागली.

Related Stories

दिवाळीचा आनंदोत्सव

Patil_p

उत्तर प्रदेशः भाजपचे जहाज वादळात

Patil_p

गाणे बसवले जात असताना…

Patil_p

अनलॉकच्या दिशेने

Patil_p

भारतीय कला जोपासणे अतिशय गरजेचे

Patil_p

आदिवासी जमातींची श्रीमंती

Patil_p
error: Content is protected !!