तरुण भारत

सद्गुरुची लक्षणे

(अध्याय तिसरा)

भवसागर पार करून जायचे तर त्यासाठी काय उपाय असे जनकराजांनी विचारल्यावर, राजाच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देण्यासाठी अत्यंत बुद्धिमान असे अर्षभ प्रबुद्ध पुढे आले असून माया तरून जाण्याचा सुगम उपाय ते सांगत आहेत.

ते म्हणाले, आपण चित्तात जे धरतो त्याचेच मनात विचार येतात. आपले चित्त विषयांनी जर भरून गेले तर त्यात वैराग्य आणि ज्ञान यांचा कधी उदय होत नाही. विषय हे तात्पुरते आणि विनाशी आहेत. पण लोकांना त्यातच परमसुख वाटते.

‘मन रंगत द्रव्य दारा’ हेच खरे! त्यामुळेच माया पाठीशी लागते. स्त्रियांबद्दलची वाईट वासना पुरुषाला काहीही करायला लावते.

 पैसा हा त्याहून वाईट आहे. एक वेळ कुकर्मामध्ये स्त्री तुम्हाला साथ देणार नाही पण पैसा हा कसाही वापरता येतो. स्वर्गप्राप्तीसाठी लोक निरनिराळे यज्ञ याग करतात पण त्यातून मिळालेले पुण्य संपले की, पुन्हा पृथ्वीवर रवानगी होते. म्हणजे स्वर्गसुखसुद्धा विनाशी आहे. तिथे इतर सुखांची काय कथा? लोकांच्या डोक्मयात विषयसेवन हीच गोष्ट कायम घोळत असते आणि त्यांची कधीच तृप्ती होत नाही. हीच मायेची मोहक अशी शक्ती आहे. आता यावर उपाय म्हणजे सद्गुरुंना दृढ श्रद्धेने शरण जाणे.

 आता आपोआप पुढचा प्रश्न असा येतो की, सद्गुरु कसे ओळखावेत? यावर प्रबुद्ध म्हणाले, अगोदर मी तुम्हाला गुरुंची लक्षणे सांगतो. निरनिराळय़ा कलेत निरनिराळे लोक निष्णात असतात काही वेदाध्यायन सांगतात, काही ज्योतिष सांगतात, काही व्याख्याने देतात असे अनेक प्रकारचे गुरु असतात, अशा लोकांचे बोल ऐकून काही काळ लोक भुलतात, पण ते खरे नव्हे!

याला अतिशय सुंदर दृष्टांत नाथमहाराज देतात. ते म्हणतात, उसाच्या घाण्यातून रस खालच्या भांडय़ात पडत असतो आणि घाणा मात्र तोंडात चिपाडे घेऊन करकर आवाज करत फिरत असतो. तशी या गुरुजनांची अवस्था! आपला संसार उत्तम चालावा, मानमरातब वाढावा एवढीच यांची अपेक्षा. आपल्या शिष्यांना आत्मप्राप्ती कशी होईल याची त्यांना बिलकुल फिकीर नसते. म्हणून जो शिष्याला ईश्वराच्या अनुभवाची प्राप्ती करून देतो त्याला सद्गुरु म्हणतात असे वेदशास्त्रात सांगितले आहे.

सद्गुरुची लक्षणे याप्रमाणे सांगता येतील. तो सर्व प्राणीमात्रांशी अत्यंत दयाळूपणाने वागतो, शिष्याची संसार बंधने तोडतो, अहंकाराची ठाणी उठवतो, स्वतःच्या गुरुत्वाचा अहंभाव अणुमात्रही बाळगत नाही. शिष्याकडून सेवा करून घ्यावी असे त्याच्या मनातसुद्धा येत नाही. उलट शिष्याकडे पूज्यत्वाने पाहणे हा सद्गुरुंचा स्वभाव आहे. शिष्याला पुत्रासमान समजावे असे श्रुतिवाक्मय आहे म्हणून तो शिष्यामध्ये ब्रह्म किंवा भगवंत पाहतो. त्याच्या गुरुत्वाची मोठी खूण म्हणजे त्याच्या अंगी अखंड शांती असते. सद्गुरुंचे हेच भूषण आणि लक्षण होय! सद्गुरुंची अशी लक्षणे सांगून झाल्यावर प्रबुद्ध म्हणाले, ‘राजा सद्गुरुंना साजेसा सत्शिष्य कसा असतो ते पण जाणून घे.’

क्रमशः

Related Stories

मरणात खरोखर

Patil_p

भीमकी झाली रोमांचिता

Patil_p

कारणेन हि जायन्ते……(सुवचने)

Patil_p

श्यामरंग

Patil_p

डिप्रेशन..

Patil_p

क्षमा जयति न क्रोधो…(सुवचने)

Patil_p
error: Content is protected !!