प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील कृष्णानगर परिसरात एका महिलेच्या गळय़ातील 30 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी युवकांनी हिसकावून चोरुन नेल्याची घटना दि. 28 रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात इंदूबाई आप्पा काळे वय 60 रा. संगमनगर, विठ्ठलकृपा कॉलनी, कृष्णानगर, सातारा यांनी तक्रार दिली आहे. दि. 28 रोजी रात्री 8 च्या सुमारास त्या घराच्या परिसरात चालत असताना अचानकपणे काळय़ा रंगाच्या दुचाकीवरुन दोन अनोळखी युवक आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या चोरटय़ा युवकाने काळे यांच्या गळय़ातील 30 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावले व तेथून पोबारा केला.
काही सेकंदात ही घटना घडली. काळे यांना प्रतिकार करण्यासही वेळ मिळाला नाही. त्यांनी आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक जमा झाले. मात्र, तोपर्यंत चोरटय़ांनी दुचाकीवरुन पळ काढला होता. या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले या जबरी चोरीचा पुढील तपास करत आहेत.