तरुण भारत

ज्याने चूक केली, त्यानेच ती निस्तरावी

वाहतूकमंत्री गुदिन्होंची नगरविकासमंत्र्यांवर टीका : पालिका प्रभाग आरक्षण घोळ प्रकरण

प्रतिनिधी / वास्को

Advertisements

पालिका प्रभाग राखीवता प्रकरणात चूक झालेली असल्यास त्याला सरकार आणि सरकारचे सर्व घटक जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही. ज्यांनी ही चूक केली त्यांनीच ती निस्तरायला हवी, असे स्पष्ट करून कधी कधी काहीजण इतरांचे पाय खेचण्याच्या प्रयत्नात स्वतःच खाली कोसळत असतात, अशी कोपरखळी वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी कुणाचेही नाव न घेता मारली आहे. पालिका प्रभाग राखीवता प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पाश्वभूमीवर मंत्री माविन गुदिन्हो मंगळवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलले.

पालिका प्रभाग राखीवता मांडताना आपल्याला विश्वासत घेतले असते तर अधिक चांगल्याप्रकारे ही मांडणी करता आली असती असे स्पष्ट करून वाहतुकमंत्री व दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी यापूर्वीच नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्याविरूध्द अप्रत्यक्षरित्या नाराजीच व्यक्त केली होती. मंगळवारी संध्याकाळी चिखली येथे एका नाक्यावर सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना त्यांनी पुन्हा कुणाचेही नाव न घेता नगरविकासमंत्र्यांनाच लक्ष्य केले.

एकटय़ाच्या पापाचे वाटेकरी सर्वांनी का व्हावे

ते पुढे म्हणाले की, पालिका प्रभाव राखीवता प्रकरणात जे जे काही झालेले आहे, त्याची लोकांनाही पूर्ण कल्पना आहे. या प्रकरणात सरकारला दोष देता येणार नाही. सरकारमधील प्रत्येक घटक या प्रकाराला जबाबदार नाही. ज्यांनी हे प्रकार केले त्यांनीच ते भोगावे, इतरांनी त्यात का वाटेकरी व्हावे, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

चूक झालेली असल्यास सरकार योग्य तो निर्णय घेणारच आहे. या प्रकरणी आपण कुणाकडेही बोट दाखवणार नाही. परंतु कधी कधी दुसऱयांना मागे खेचण्याचा प्रयत्न करताना आपण खाली कोसळण्याचा प्रकार घडत असतो. त्यामुळे दुसऱयांबद्दल आपण चांगला विचार करायला हवा अशी कोपरखळीही मंत्री गुदिन्हो यांनी मारली.

प्रभाग राखीवता प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीवर काही परिणाम होईल काय, याची दखल आपले नेते निश्चितच घेतील व योग्य तो निर्णय पक्ष घेईल असेही मंत्री गुदिन्हो म्हणाले.

व्यावसायिकांना सांभाळताना पर्यटनही सांभाळायला हवे

यावेळी मंत्री गुदिन्हो यांनी दाबोळीतील रस्ते व नाक्यांवरील सुधारणांच्या कामांविषयी माहिती दिली. गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध बैठका होत असून त्यांच्यासाठी काय काय करता येईल याची चाचपणी करण्यात येत आहे. टॅक्सी व्यवसायिकांच्या प्रश्नावर सर्वांचे हित पाहूनच सामंजस्याने तोडगा काढण्यात येईल. गोवेकर व्यवसायिकांना सांभाळतानाच गोव्यातील पर्यटन व्यवसायही सांभाळायला हवा असे ते म्हणाले.

Related Stories

पुंकळ्ळी पालिका मंडळाची आज पहिली बैठक

Amit Kulkarni

धारबांदोडा येथे अपघातात दुचाकीचालक ठार

Patil_p

मोजक्याच खात्यांचे मर्यादीत कामकाज सुरू

Omkar B

खाण व्यावसाय सुरू करण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा

Omkar B

काँग्रेस यंदा 80 टक्के तरुण चेहरे देणार

Amit Kulkarni

फोंडा शहर लॉकडाऊनचा तुर्त विचार नाही !

Omkar B
error: Content is protected !!