तरुण भारत

खानापूर-हल्याळ मार्गावरील बससेवा नंदगडपर्यंत

ग्रामपंचायत सदस्यांच्या मागणीमुळे तातडीने अंमलबजावणी

प्रतिनिधी / खानापूर

खानापूर-हल्याळ, खानापूर-कित्तूर-धारवाड मार्गावरून धावणाऱया बससेवा नंदगड गावातील बस स्टॉपवर न येता परस्पर जात होत्या. यामुळे नंदगड गावातील प्रवाशांची तसेच विद्यार्थी वर्गांची मोठी अडचण झाली होती. अखेर जि. पं. सदस्य जितेंद्र मादार यांच्या नेतृत्वाखाली ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांनी मंगळवारी खानापूर आगार प्रमुख चंद्रशेखर लोखंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. व प्रत्येक बस नंदगड गावातील स्टॉपपर्यंत येण्याची व्यवस्था न केल्यास दुपारी 2 वाजल्यापासून रास्ता रोको करण्याचा इशारा देताच, खानापूर आगार प्रमुखांनी तातडीने याची दखल घेऊन प्रत्येक बस नंदगड स्टॉपपर्यंत जाण्याची व्यवस्था केली. तसेच यासाठी तात्पूरता कंट्रोलरही ठेवण्याची अंमलबजावणीही केली. यासंदर्भात मंगळवारी जि. पं. सदस्य व सर्व ग्रा. पं. सदस्यांनी आगारप्रमुख चंद्रशेखर लोखंडे यांना निवेदन दिले.

या निवेदनात असे म्हटले आहे की, यापूर्वी खानापूर-हल्याळ, खानापूर-धारवाड-कित्तूर-कारवार मार्गावरील सर्व बस नंदगड गावातील बसस्टॉपपर्यंत येऊन जात होत्या. पण लॉकडाऊननंतर या सर्व बससेवा गावातील बसस्टॉपपर्यंत न येता, परस्पर जात असल्यामुळे नंदगडमधील प्रवाशांची व विद्यार्थी वर्गाची बरीच अडचण होत आहे.

वास्तविक, नंदगड हे ऐतिहासिक व व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे गाव आहे. गावची लोकसंख्या दहा हजारांहून अधिक आहे. व्यापार, उद्योग, शाळा, महाविद्यालय व परगावच्या नातेवाईकांकडे नंदगड गावातून जाणाऱया-येणाऱया प्रवाशांची संख्या मोठी आहे. दररोज या ठिकाणाहून बेळगाव, हल्याळ, हुबळी, धारवाड, कारवार, कित्तूर आदी भागात ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या वाढत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरच्या गावातील बसस्टॉपपर्यंत न येता बाहेरच्या बाहेर जात आहेत. यामुळे ग् प्रवाशांना 1 कि. मी. हून अधिक अंतर चालत येण्याची वेळ ओढवली आहे. यामुळे महिला तसेच विद्यार्थी वर्गाला मोठी अडचण झाली आहे. यामुळे या मार्गावरची प्रत्येक बस नंदगड गावातील स्टॉपपर्यंत येण्यासाठी बसचालक, वाहकांना सूचना द्यावी, तसेच याच्या अंमलबजावणीसाठी कंट्रोलरची नियुक्ती करावी, नंदगड-बेळगाव वस्तीची बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

आगारप्रमुख चंद्रशेखर लोखंडे यांना निवेदन देऊन जि. पं. सदस्य जितेंद्र मादार यांनी परिवहन खात्याचे विभागीय अधिकारी चंद्रा यांच्याशीही मोबाईलद्वारे संपर्क साधून या अडचणीची माहिती दिली.  निवेदन देताना ग्रा. पं. अध्यक्षा विद्या मादार, उपाध्यक्ष मन्सूर ताशिलदार, सदस्य सिद्धाप्पा नाईक, निखहतप्रवीण ताशिलदार, चंद्रू वड्डर, दीपा पाथर्डे, निर्मला जोडंगी, नशिमा बेगर हेरेकर, संदीप पारिश्वाडकर, नीता देगावकर, प्रदीप पवार, संगीता वड्डीमणी, प्रणाली तोरगल, सुजाता हुलबते, आयशा सैय्यद, यल्लाप्पा गुरव, लक्ष्मण मोटेकर, बसव्वा हत्तरवाड, महमदअकील चंदगडकर, नागेंद्र पाटील व इतर उपस्थित होते.

Related Stories

अपुऱया-अनियमित बससेवेचा ग्रामीण भागाला फटका

Amit Kulkarni

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

Patil_p

उपनगरांत नेहरुनगर आघाडीवर

Omkar B

संकेश्वरातील जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केंव्हा ?

Patil_p

रयत गल्लीतील पाणी समस्या सोडविण्यात यश

Amit Kulkarni

नंदगड जेसीएस शाळेच्या विलीनीकरणाला विरोध

Patil_p
error: Content is protected !!