तरुण भारत

आता लाकडी घाण्याकडे वळू लागली पावले

मुतगा येथे नव्या जोमाने प्रारंभ : कडक उन्हाळ्याला प्रारंभ झाल्याने नागरिक वळले रसवंतीगृहाकडे

युवराज पाटील / सांबरा

सध्या कडक उन्हाळ्याला प्रारंभ झाला असून, नागरिकांची पावले शीतपेयांसह रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत. अशातच उसाचा ताजा रस तोही लाकडी घाण्यावर काढलेला असेल तर नागरिकांसाठी अधिक उत्तमच यात वाद नाही. अशाच प्रकारचे रसवंतीगृह सध्या मुतगे येथे सुरू करण्यात आले आहे. बैलाच्या साहाय्याने लाकडी घाण्यातून दर्जेदार रस काढण्यात येत असल्याने नागरिकांची तेथे गर्दी होत आहे. अशा प्रकारचा प्रयोग अलीकडच्या 15-20 वर्षांत पहिल्यांदाच बेळगाव तालुक्यात करण्यात आला आहे.

सध्या उन्हाळा वाढला असून नागरिक उसाचा रस, थंडगार ताक, नारळ पाणी व लिंबू पाणी आदी शीतपेये घेण्यावर भर देत आहेत. रस्त्यावरून ये-जा करताना तर उन्हापासून त्रास कमी करण्यासाठी म्हणून उसाचा रस जास्त उपयुक्त ठरतो. मुतगे येथील शेतकरी गुंडू हणमंत कणबरकर यांनी उसाचा लाकडी घाणा घातला असून बैलाच्या साहाय्याने उसाचे गाळप करून नागरिकांना दर्जेदार रस देत आहेत. बैलाच्या साहाय्याने ऊस गाळण्याचा हा प्रकार या भागात पहिलाच आहे. हे पाहण्यासाठी नागरिक कुतूहलाने त्या ठिकाणी गर्दी करत
आहेत.

अहमदनगर येथून आणला घाणा

याबाबत रसवंतीगृह चालक गुंडू कणबरकर यांना विचारले असता ते म्हणाले की, एकदा आम्ही अहमदनगरला गेलो होतो. त्या ठिकाणी बैलांच्या साहाय्याने लाकडी घाण्यातून उसाच्या रसाचे गाळप सुरू होते. तेथील रस पिल्यानंतर इतका छान वाटला की, आपणही हा व्यवसाय बेळगाव येथे सुरू करावा, असे वाटले. ही प्रेरणा घेऊन उसाचा लाकडी घाणा त्यांनी अहमदनगर येथून आणला व सध्या मुतगे येथील आपल्या जागेमध्ये त्यांनी हा व्यवसाय थाटला आहे. बैलाच्या साहाय्याने उसाचे गाळप करण्यात येत असल्याने त्यांना खर्चही कमी येत आहे. स्वतःच्या शेतातील जवारी उसाचा वापर केला असल्याने ग्राहकांना अत्यंत दर्जेदार रस मिळू लागला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तेथे गर्दी वाढू लागली आहे. गुंडू कणबरकर व त्यांचा मुलगा महेश हे दोघेही हा व्यवसाय चालवत आहेत. महेश हा कॉलेज सुटल्यानंतर आपल्या वडिलांना या व्यवसायात हातभार लावत आहे.

शेती सांभाळत व्यवसाय

स्वतःची शेती सांभाळत हा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून, उन्हाळा हळूहळू वाढू लागला आहे. पुढील काळात रसवंतीगृह चांगल्या प्रकारे चालतील, असा अंदाज आहे. सध्या पूर्व भागात हा एक कुतूहलाचा विषय बनला असून घाणा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

Related Stories

अमलझरीत बिरदेव यात्रा उत्साहात

Patil_p

नववर्षाचे जल्लोषात उत्साही ‘सु’स्वागत

Patil_p

म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या खटल्याची

Patil_p

रेशीम, सुती साडय़ांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

Patil_p

बेळगावात आणखी 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

बेंगळूर: ख्रिस्त विद्यापीठाला परीक्षा न घेण्याचा सरकारकडून सल्ला

triratna
error: Content is protected !!