तरुण भारत

सोनम, दीपक, रवि , जितेंदर यांची माघार

दुखापती, आजारपणामुळे रोम कुस्ती स्पर्धेतून माघारीचा निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

सराव करताना डोक्याला झालेल्या अनपेक्षित दुखापतीमुळे रोममध्ये होणाऱया यूडब्ल्यूडब्ल्यू मानांकन मालिकेतील कुस्ती स्पर्धेतून भारताच्या सोनम मलिकला माघार घ्यावी लागली तर ऑलिम्पिकला जाणाऱया दीपक पुनिया व रवि दाहिया यांनीही विविध कारणांसाठी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

भारतीय पथक बुधवारी सकाळी इटलीकडे रवाना झाले असून गुरुवारपासून ही स्पर्धा ग्रीको रोमन प्रकाराने सुरू होत आहे. भारताचे प्रमुख मल्ल बजरंग पुनिया व विनेश फोगट यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. चाचणी स्पर्धेत साक्षीचा पराभव करून भारतीय संघात 62 किलो वजन गटात स्थान मिळविणारी सोनम गेल्या आठवडय़ात लखनौमधील राष्ट्रीय शिबिरावेळी ऑलिम्पिक कांस्यविजेत्या साक्षी मलिकसमवेत सराव करीत असताना जखमी झाली होती. तिला दुखापत झालेय याची तिला जाणीवही झाली नव्हती. डोक्यावरून रक्ताचे ओघळ सुरू होऊन ते मॅटवर पडल्यानंतर दोघींच्याही ते लक्षात आले. ‘त्यात कुणाचीही चूक नव्हती, कुस्तीमध्ये असे प्रकार होत असतात. मुद्दामहून तसे कोणी करीत नाही. कारण त्यावेळी पराभव होण्याची किंवा गुण गमविण्याची कोणतीच भीती नसते. काही वेळा नकळत अशा जखमा होऊ शकतात,’ असे सोनमचे प्रशिक्षक अजमेर मलिक म्हणाले. ‘डोक्याला जखम झालेल्या ठिकाणी पाच टाके घालण्यात आले आहेत. तिला परत आणल्यानंतर स्थानिक डॉक्टरांकडून सोमवारी तिची तपासणी करून घेण्यात आली आहे. तिची जखम अजून भरलेली नसल्याने इतक्यातच टाके काढता येणार नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तिला स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले आहे. दुखापत व वेदना सहन करीत ती कुस्ती खेळू शकणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना व्हायरसच्या मोठय़ा ब्रेकनंतर पहिल्याच स्पर्धेत भाग घेण्याची संधी रवि दाहिया (57 किलो गट), दीपक पुनिया (86 किलो गट), जितेंदर किन्हा (74 किलो गट) यांनाही या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. दोन आठवडय़ाआधी सोनपत येथील सराव शिबिरावेळी रविच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती तर दीपकला डेंग्यू किंवा विषमज्वर झाला असण्याची शंका व्यक्त करण्यात आली. ‘गुडघ्याची सूज अजून पूर्ण कमी झालेली नाही. या स्पर्धेसाठी मी तयारी करीत होतो, पण आता नाईलाज झाला आहे. सूज बऱयाच अंशी कमी झाली असली तरी गुडघा पूर्ण बरा झाला नसल्याचे मी खेळू शकणार नाही,’ असे रवि म्हणाला. ‘गेला आठवडाभर मला ताप आला आहे. तपासणी केली असल्याने कोव्हिडची लागण झालेली नाही हे स्पष्ट झाले असून डेंग्यू किंवा विषमज्वर असण्याची शंका वाटत असल्याने आम्ही अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत,’ असे दीपकने सांगितले. जितेंदरने आपल्या खांद्याला दुखापत झाल्याचे सांगून माघार घेतली आहे. या स्पर्धेसाठी भारताने 34 जणांची यादी जाहीर केली होती.

Related Stories

ऍशेस मालिकेतील कसोटी केंद्रामध्ये बदल

Patil_p

भारताचे सहा मुष्टियोद्धे अंतिम फेरीत

Patil_p

सौरभ गांगुलीवर नव्याने अँजिओप्लॅस्टी, प्रकृती ‘स्थिर’

Amit Kulkarni

लंकेचे विंडीजला 375 धावांचे आव्हान

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर वनडे मालिका विजय

Patil_p

राष्ट्रीय सराव शिबिरात भारतीय टेबल टेनिसपटूंचे पुनरागमन

Patil_p
error: Content is protected !!